0
उलगडा परतवाड्यातून अल्पवयीन चोरट्यास अटक, चार दुचाकी जप्त

अमरावती- शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांनी कहर केला आहे. ग्रामीण आणि शहरात दरदिवशी सरासरी दोन दुचाकींची चोरी होत असल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीवरून दिसून येत आहे. दरम्यान मंगळवारी (दि. ११) ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने परतवाड्यातून एका सोळा वर्षीय चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चार दुचाकी जप्त केल्या आहेत. या चोरट्याला घरी कबुतर पाळण्याचा छंद आहे. तोच छंद जोपासण्यासाठी त्याने चोऱ्या केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे.


आपल्याला कबुतरांची प्रचंड आवड असल्यामुळे ते घरी पाळले आहे. त्यांचे संगोपन करण्यासाठी, त्यांना खायला घालण्यासाठी पैशाची गरज होती, म्हणूनच आपण चोऱ्या करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. चोरट्याकडून पोलिसांनी जप्त केलेल्या चार दुचाकींपैकी एक दुचाकी वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली आहे तर तीन दुचाकी परतवाडा शहरातून चोरलेल्या आहेत. परतवाडा येथून त्याने २० नोव्हेंबर, सहा डिसेंबर आणि आठ डिसेंबरला अशा तीन दुचाकी चोरल्या आहेत. तसेच चांदूर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माधान येथे जावून एका पान टपरीत चोरी करून त्याने पान मटेरियल व रोख असा जवळपास साडेसात हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. तसेच शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कारंजा बहीरम येथेही त्याने २ डिसेंबरला रात्री दरम्यान पानटपरी फोडून जवळपास अकराशे रुपयांचा ऐवज लंपास केला होता. स्थानिक गुन्हेे शाखेचे पथक दुचाकी चोरांच्या शोधात असताना हा अल्पवयीन दुचाकी चोरत असल्याचे पोलिसांना लक्षात आले. त्यामुळे पोलिस त्याच्या शोधात होते. दरम्यान सोमवारी रात्री एलसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला दोन दुचाकी असल्याचे सांगितले. त्यानंतर आणखी दोन दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे या दुचाकी चोरटा लपवून ठेवत होता. त्याने त्या विक्री केल्या नव्हत्या. कबुतर आणण्यासाठी किंवा चोरीसाठी तो या दुचाकी वापरत होता. ही कारवाई एलसीबीचे पीआय सुनील किनगे, एपीआय किरण वानखडे, एपीआय नीलेश सुरडकर, त्र्यंबक मनोहर, सुनील मलातपुरे , प्रवीण अंबाडकर, बाबा ठाकरे, प्रमोद खर्चे, योगेश सांभारे आणि अ. सईद यांनी केली आहे.
वलगावात कबुतरांसह दुचाकी घेऊन पळाला
हा चोरटा काही दिवसांपूर्वी वलगावात कबुतर चोरण्यासाठी आला होता. त्याने एका ठिकाणी कबुतरांची चोरी केली मात्र कबुतर घेवून पळून जात असताना नागरिकांना जाग आली म्हणून हा कबुतर टाकून त्या ठिकाणाहून पळत सुटला. काही वेळानंतर त्याने वलगावातूनच एक युनिकॉर्न दुचाकी चोरली. आणखी किती ठिकाणी त्याने हात साफ केला याचा पोलिस शोध घेत आहेत.

आणखी गुन्हे उघड होणार
चार दुचाकी चोरीसह दोन पानटपरी फोडण्याचे गुन्हे या चोरट्याने कबुल केले आहे.आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.Bike stolen incidents in Amravati

Post a comment

 
Top