0
काेरेगाव भीमा प्रकरण आर्थिक मदत मिळाली, पण अद्यापही न्याय नाही

काेरेगाव भीमा- काेरेगाव भीमा, वढू, सणसवाडी या ठिकाणी यंदा १ जानेवारीला दाेन गटांत हिंसाचार उफाळून अनेकांची घरे, दुकाने, हाॅटेल, वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाली. मात्र, पीडितांनी आत्मविश्वासाने पुन्हा त्यांचे निवारे आणि व्यवसाय उभारत उमेदीने उठण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाने १०५ घरे व दुकानांना नुकसानीपोटी ७ काेटींची मदत केली. तर, २०० ते २२५ वाहनांच्या नुकसानीपोटी २ काेटींची मदत लवकरच केली जाणार आहे.

पुणे-अहमदनगर रस्त्यावर काेरेगाव भीमा ते सणसवाडीदरम्यान चारचाकी आणि दुचाकीचे शाेरूम असलेले 'छत्रपती ऑटाे' जमावाने जाळून त्याचे मालक जयेश शिंदे यांचा तब्बल दाेन ते अडीच कोटींचे नुकसान केले. शिंदे म्हणाले, २००४ मध्ये ११ हजार वर्गफूट जागेवर मी शोरूमची उभारणी केली. त्यात २८ जण विविध विभागांत काम करत हाेते. घटनेच्या दिवशी एका जमावाने फर्निचर व काचांची फाेडताेड करत शाेरूम पेटवून दिले. या वेळी शाेरूममध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या ७ कार व ९ दुचाकी तसेच फर्निचर, एसी, कागदपत्रे जळून खाक झाली. अगदी सुव्यवस्थित शाेरूम जाळले गेल्याने तसेच विमा संरक्षण नसल्याने तसेच बँकेचे कर्ज डाेक्यावर असल्यामुळे आत्महत्या करण्यापर्यंतचा विचार माझ्या मनात आला. या नैराश्यातून सावरण्यास २० ते २२ दिवस लागले. शिवाय, शासनाकडून इतक्या माेठ्या प्रमाणात मदत मिळेल की नाही, याची चिंता हाेती. दरम्यान, काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत राहिलाे. अखेर, पंचनामा हाेऊन १ काेटी ६५ लाखांची मदत मिळाली. शाेरूम बंद झाल्याने कामगार इतरत्र स्थलांतरित झाले असून जुन्या सहकाऱ्यांपैकी सुभाष करंडवाल व अनिल कांबळे यांनी पुन्हा २ हजार स्क्वेअर फुटांची जागा घेऊन त्यावर ७०० स्क्वेअर फुटात छत्रपती शाेरूमची उभारणी केली आहे. मी संबंधित व्यवसाय साेडून नवीन हाॅटेल सुरू करून पुढील वाटचाल करत आहे. १ जानेवारी राेजी माझ्या नव्या व्यवसायासाठी मी पोलिसांकडून संरक्षण मागितले असून ते यंदा सुरू ठेवणार आहे.

घर गेले अन् मुलगीही गेली, आता पुनर्वसनासाठी लढतोय
सुरेश सकट म्हणाले, माझे कार्यालय, घर, हाॅटेल २ जानेवारीला जमावाने जाळले. मुलगा जयदीप, मुलगी पूजा याचे प्रत्यक्षदर्शी हाेते. याप्रकरणी १५० जणांविराेधात गुन्हा दाखल झाला. प्रशासनाने घराचा परस्पर पंचनामा करून ३ लाख ४५ हजारांची ३ महिन्यांनंतर मदत दिली. माझ्या घरालगत असलेल्या एका शेडमुळे आपल्या ८-९ एकर जागेला भाव येत नसल्याचे सांगत वर्षभरापासून बिल्डर सुधीर ढमढेरे हा मला धमकावत हाेता. पोलिसांना हे अर्जाद्वारे कळवले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाले. मुलगी पूजाचा २२ एप्रिलला विहिरीत संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला. ९ जणांवर गुन्हा दाखल हाेऊन दोघांना अटक झाली. सध्या ते जामिनावर आहेत. आंदाेलन केल्यानंतर पुण्यातील कसबा पेठेत शासनाने २७० वर्गफुटांचे घर दिले. पण, अद्याप कायमस्वरूपी सुरक्षित पुनर्वसन झाले नाही.

पुन्हा सणसवाडीत राहणारच नाही
मूळच्या नांदेडच्या व मागील २० वर्षांपासून सणसवाडीत राहणाऱ्या रमा अशाेक आठवले म्हणाल्या, जमावाने माझे घर व फॅब्रिकेशन वर्कशाॅप जाळले. पतीलाही मारले. वर्कशाॅपमध्ये १३ जण कामाला होते. त्याच रात्री आम्ही जिवाच्या भीतीने पुण्यात आहे. राहण्यास निवाराही मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदाेलन केल्यानंतर पुण्यातील कसबापेठेत एक घर दिले. मात्र, ७ महिने उलटूनही कायमस्वरूपी पुनर्वसन केले नाही. घर व दुकान जाळल्याप्रकरणी १३ जणांविराेधात अॅट्राॅसिटीनुसार गुन्हा दाखल झाला. पण, कुणालाही अटक केली नाही. शासनाने ६० लाखांची मदत दिली. १ जानेवारीला सणसवाडीतील चाैकात नेहमीप्रमाणे मला अन्नदान करावयाचे आहे. मात्र, त्यासाठी प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. आता परत कधीच सणसवाडीत जाणार नाही.News about Koregaon Bhima

Post a Comment

 
Top