0
365 दिवसांत सूर्याभोवतीची अखंड प्रदक्षिणा घालणाऱ्या या ग्रहावर, या एका वर्षाच्या कालखंडात खूप काही बदल झालेले असतात.

धर्मव्यवस्थेच्या पाठबळावर फोफावणारी अर्थव्यवस्था जर व्यक्ति आणि समूहाची जीवनशैली घडवत असेल, तर चिंतक-लेखक-कलावंत जीवनशैलीस विवेक आणि विचारांची दिशा देण्याचे काम करतात. युवाल नोह हरारी हे जागतिक कीर्तीचे इतिहासतज्ज्ञ, मानववंश अभ्यासक याच उद्देशाने माणसाच्या आचार-विचारांचा ऐतिहासिक पट उलगडून दाखवतात. त्यांचे विचार ऐकणे, त्यांचा बौद्धिक सहवास लाभणे देशोदेशीच्या अभ्यासकांमध्ये प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. स्थानिक ते वैश्विक असे विस्तीर्ण विचारविश्व जोडणाऱ्या हरारी यांनी नुकताच मुंबई येथे जाणकार-तज्ज्ञांशी मनमोकळा संवाद साधला. त्या निमित्ताने एका आधुनिक प्रज्ञावंत "सेपिअन'च्या विचारविश्वाचा वेध घेणाऱ्या लेखमालेचा हा पू्र्वार्ध...

ब्लर्ब : हरारी यांनी माणसाबद्दल असलेली आपली आस्था अद्याप सोडलेली नसून माणसे ज्याप्रमाणे कमालीची मूर्ख असतात, त्याचप्रमाणे ती कमालीची हुशारही असतात, हे ऐतिहासिक सत्य उलगडून दाखविले आहे. माणसाच्या हुशारीवर हरारी यांचा अद्यापही विश्वास असल्याने ते सभोवतालच्या परिस्थितीकडे जगबुडी म्हणून न पहाता बेसावधपणातून आलेली परिस्थिती म्हणून पहातात...
वर्ष सरत आले म्हणजे माणसे भावूक होतात. सरत्या वर्षात काय कमाविले काय गमाविले, याचा हिशेब प्रत्येकाजवळच असतो. तीनशे पासष्ट दिवसांत सूर्याभोवतीची अखंड प्रदक्षिणा घालणाऱ्या या ग्रहावर, या एका वर्षाच्या कालखंडात खूप काही बदल झालेले असतात. आपल्या आयुष्यावर या वर्षाने काय प्रभाव टाकला, हे जसे एखाद्या माणसाला मोजता येणे शक्य असते, तसे या एका वर्षात माणसाने पृथ्वीवरती काय प्रभाव टाकला, हेही मोजणे शक्य असते. गेल्या पन्नास वर्षात पृथ्वीवर घडून येणाऱ्या असंख्य नैसर्गिक घडामोडींमध्ये माणसाचा थेट वा अप्रत्यक्षरित्या सहभाग राहिला आहे. यापूर्वी कोट्यावधी वर्षे या ग्रहाची मालकी कुणा एका प्रकारच्या प्रजातीकडे नव्हती, ती तशी नव्हती म्हणून इथल्या जीवणांवर, प्राणीमात्रांवर वा हवामानावर कुणा एका प्रजातीची सत्ता नव्हती. अवघ्या दोन लाख वर्षांपूर्वी या ग्रहावर प्रगत जीव म्हणून जन्माला आलेल्या माणूसप्राण्याची सुरुवातीची एक लाख तीस हजार वर्षे तशी निसर्गाचा समतोल राखूनच होती. अवघ्या सत्तर हजार वर्षांपूर्वी या आजच्या माणूसप्राण्याच्या बुद्धीक्षमतेचा वेगाने विकास व्हायला लागला आणि बारा हजार वर्षांपूर्वी त्याने शेतीचा शोध लावून या ग्रहाचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात केली.

आफ्रिकेत जन्मलेल्या या प्रजातीने इतर सर्व प्रजातींवर आपली थेट अधिसत्ता प्रस्थापित केली आहे. आता कुठल्या जीवांनी इथे जगायचे आणि कुठल्या नाही याचे निर्णय प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या थेट माणसाच्या हातात आले आहेत. माणसाने रचलेल्या राष्ट्रसंकल्पना आणि भांडवलवादाचा जोरावर गेल्या काही दशकांत लाखो हेक्टर जंगले तोडली, धरणे बांधून जवळजवळ सगळ्या नद्यांच्या गळ्याला फास लावला, शेकडो प्रजातींचे अस्तित्व थेट शिकार करुन नामशेष करुन टाकले तर हजारो इतर प्रजातींच्या नष्ट होण्यात अप्रत्यक्षरित्या सहभाग घेतला. काही ठिकाणी नुसता श्वास घेणेही अवघड व्हावे, इतपत हवा प्रदूषित झाली आहेत, तर असंख्य नद्यांना थेट गटारीचे स्वरुप आले आहे. या समस्येवर तोडगा शोधा, प्रदूषण कमी करा, असे कळकळीने सांगूनही माणसांच्या कानी, हा आवाज पोहचलेला नाही, ज्यांच्यापर्यंत तो पोहचला आहे, त्यांना नेमकी काय कृती करावी, हे समजत नाहीये आणि ज्या लोकशाही व्यवस्थेतून हे प्रश्न सोडविण्याची अपेक्षा आहे, त्या व्यवस्थांच्या राजकारण्यांना या समस्येविषयी काहीही घेणेदेणे नाही.
सोशल मीडियाच्या वापरातून गेले काही वर्षे लोकशाही निवडणुकांची व्यवस्थाच बदलली असून लोकांचे मत मिळविण्यासाठी त्यांच्या सारासार बुद्धीला मोडीत काढून, टोकाची भावनिक आव्हाने करुन आणि मुख्य समस्यांपासून गाफील ठेवून राजकारणी आपला स्वार्थ साधत आहेत. प्रखर राष्ट्रवादाची भावनिक आवाहने करुन निवडून आलेले कितीतरी राष्ट्रप्रमुख आता दुसऱ्या देशाला धमक्या देत असून, त्यांची विधाने कधीकाळच्या सार्वजनिक नळांच्या पाण्यावर कचकाचा भांडणाऱ्या लोकांनाही लाज येईल इतपत असभ्य आहेत.
याच काळात तंत्रज्ञानाने नवे शोध लावण्याचा वेग प्रचंड वाढला आहे, बायोटेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करुन माणसाच्या बौद्धिक आणि शारिरिक मर्यादेवर मात करुन एक नवाच दैवीशक्ती असणारा माणूस जन्माला येण्याच्या शक्येतेकडे माणसाची वाटचाल सुरु अाहे. हे प्रयोग यशस्वी झाल्यास मानवजातीचा इतिहास कायमचा बदलून जाणार आहे. हे बदल चांगले की वाईट आणि ते करावे की नको, आणि या बदलांचा फायदा समस्त मानवजातीला होणार आहे, की फक्त मूठभर बलशाली लोकांना याचे स्पष्ट उत्तर कुणाकडेही नाही. दरम्यान, भावनिक आवाहने करुन सत्तेत आलेले राजकारणी या प्रश्नांकडे रितसर डोळेझाक करुन इतर राष्ट्रांकडे आपल्या तोफा रोखीत आहे, व्यापारयुद्ध आणि सायबर हल्ल्यात सहभागी होउन नव्या युद्धांच्या शक्यतांना जन्म देत आहेत. दशकभरापूर्वीपासून बिघडायला सुरु झालेली ही परिस्थिती आजही सुधारण्याचे नाव घेत नाहीये, आणि समस्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चाललीये. आजुबाजूला कचऱ्याचे डोंगर उभे रहात असताना संबंध मानवजात एका विचित्र परिस्थितीपाशी येऊन ठेपली आहे. इथून पुढे एक प्रजाती म्हणून आपण नेमके काय करायला हवे, याच्या शक्याशक्यतांवर विचार करणाऱ्या काही महत्त्वांच्या विचारवंतापैकी एक महत्त्वाचे नाव, म्हणजे युवाल नोह हरारी यांचे!
आपल्या ‘सेपिअन्स’ या पुस्तकातून जगभरातल्या मानवजातीचा संकीर्ण इतिहास हरारी यांनी उलगडून दाखविला. या पुस्तकाच्या एक कोटींहून अधिक प्रती विक्री झाली. जगभरातल्या पन्नासहून अधिक भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले. या पुस्तकाच्या लोकप्रियतेपेक्षा त्यात व्यक्त झालेल्या विचारांशी सहमत होणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड मोठी आहे. सेपीअन्स हे पुस्तक माणसाच्या संकीर्ण इतिहासावर प्रकाश टाकते, तर त्यानंतर हरारी यांचे दुसरे पुस्तक "होमो डेउस' हे माणसाच्या संभाव्य भविष्याविषयी भाष्य करते. माणसाच्या इतिहास आणि भविष्य या दोन्ही विषयांवर भाष्य केल्यानंतर युवाल हरारी यांचे अलिकडेच प्रसिद्ध झालेले तिसरे पुस्तक ‘ट्वेंटी वन लेसन्स फॉर द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी' हे सध्या जगभरात चर्चेचा विषय बनले असून त्यात विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे याचा उलटसुलट चर्चा अनेक माध्यमांमधून चालल्या आहेत.
युवाल हरारी हे स्वतः जगातल्या विविध देशांमध्ये जाऊन या समस्यांसदर्भात लोकजागृती करीत आहेत. वरवर पहाता ते आपल्या पुस्तकांच्या प्रचारासाठी हे करीत आहे, असे एखाद्याला वाटू शकते, पण या पुस्तकाचा विषय मानवजातीचा भूत-भविष्य आणि वर्तमान असेल तर हरारी हे सबंध मानवजातीची काळजी करीत आहे, हे नक्की. हे जग नेमके कसे चालते यासंबधी वैज्ञानिक संशोधने आणि प्रबंध गेल्या काही वर्षांत अतिशय वेगाने प्रसिद्ध होत आहेत. याचबरोबर माणसाने पृथ्वीवर चालविलेला एकूण संहार कुठल्या पातळ्यांवर आणि कितपत विनाशकारी आहे, याची अधिकृत आकडेवारी आणि बातम्या अगदी रोज प्रसिद्ध होत असतात. या संशोधनांकडे आणि बातम्यांकडे नियमित नजर टाकल्यास माणसाची प्रजाती भयंकराच्या दारात उभी आहे, याची कुणालाही खात्री होईल. किंबहुना, या खात्रीनंतर लवकरच मानवजात पृथ्वीवरुन नष्ट होईल अशी प्रलयंकारी शक्यता अनेकजण वर्तवू लागले आहेत. मात्र, हरारी यांनी माणसाबद्दल असलेली आपली आस्था अद्याप सोडलेली नसून माणसे ज्याप्रमाणे कमालीची मूर्ख असतात, त्याचप्रमाणे ती कमालीची हुशारही असतात, हे ऐतिहासिक सत्य उलगडून दाखविले आहे. माणसाच्या हुशारीवर हरारी यांचा अद्यापही विश्वास असल्याने ते सभोवतालच्या परिस्थितीकडे जगबुडी म्हणून न पहाता बेसावधपणातून आलेली परिस्थिती म्हणून पहातात.
जगभरात चाललेल्या अंदाधुंदीच्या वातावरणातून प्रलयाच्या शक्यता वर्तवणारी एक मोठी पिढी गेल्या दोन दशकांपासून जगभरात अस्तित्वात आली असून जगबुडीवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वातावरण कमालीचे निराशेने भरलेले असून एकदाचा काय तो जगाच अंत होउन जाऊ देत अशा निष्कर्षाप्रतही काही लोक आले आहेत.या लोकांपैकी मीही एक. १९९९ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी इंटरनेट वापरायला शिकल्यानंतर जगभरातल्या शास्त्रज्ञांशी आणि संशोधकांशी निरनिराळ्या विषयांवर पत्रव्यवहार करण्याचा एक छंद मला लागला होता. याच काळात डिस्कवरी चॅनेलचे प्रबंधक किरण कर्णिक हे जागतिक दर्जाचे संशोधनात्मक कार्यक्रम आपल्या वाहिन्यांवर दाखवित होते. इंटरनेटवर विविध माहिती वाचण्याचा आणि इबुक्स डाउनलोड करुन ते अर्ध्या रात्रीत वाचून ठेवण्याचा मी आणि माझ्यासारख्या आणखी काही जणांनी सपाटा लावला होता. यातून ज्ञानात प्रचंड भर पडत होती तर जगाबद्दलचे कुतुहलही वाढत चालले होते. या सर्व अभ्यासाचा वेग इतका जास्त होता, की संथ वेगाने चालेल्या भारतीय शिक्षणपद्धतीला मी सोडचिठ्ठी दिली. शिक्षण पूर्ण न होऊ शकल्याने बदललेल्या जगात माझे काही विशेष अडले नाही, किंबहुना संकुचित पारंपारिक शिक्षणपद्धतीतून वेळीच काढता पाय घेतल्याने ज्ञानार्जनाचा मार्ग जास्त चांगल्या प्रकारे विस्तारला गेला. अलम दुनियेच्या विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याने रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या विविध संधी मला सहज मिळत गेल्या आणि एकाच वेळी माहिती आणि पैश्याने मी श्रीमंत झालो. २००८ च्या आर्थिक संकटानंतर ही परिस्थीती मात्र बरीचशी बदलली. आर्थिक गणीते विस्कळीत न होऊ देण्याचे कसब मला साधता आले असले तरी जगभरात चाललेल्या आर्थिक अंदाधुंदीचा आणि स्वार्थी भांडवलवाद्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करताना हे जग आता कधीच ताळ्यावर येणार नाही अशी भीतीही मला एकेकाळी वाटू लागली होती.
ही भीती पुढच्या काळात वेगाने खरी ठरत राहिली. पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत गेले. सोशल मीडिया फोफावल्यानंतर सत्यापासून लोकांनी फारकत घेतली, खोटे बोलणे पाप न रहाता, ती नव्या जगात यशस्वी होण्याची कला ठरली. आणि ज्या धर्मवाद, वंशवाद, जातीवाद आणि विषमतेला आटोक्यात आणण्यासाठी उभ्या जगाने अनेक दशके मेहनत घेतली त्यांचे प्रयत्न उलटून जग पुन्हा एकदा शाब्दिक आणि शारिरिक हिंसेकडे वळले. या हिंसेचा जगभरातल्या विभाजनवादी राजकारण्यांनी सत्तेत येण्यासाठी योग्य वापर करुन घेतला आणि नैतिकतेची जागा व्यवहारवादाने घेतली. प्रगत आणि स्वस्त तंत्रज्ञानाने लोकांना वेगाने मोबाइल आणि टीव्हीचे गुलाम बनवून टाकले. माणसे माणसांशी अधिकाधिक कनेक्ट होत असतानाच ती कनेक्ट नसतील तेव्हा कमालीच्या एकटेपणात राहू लागली. संवादांची संख्या आणि वेग प्रचंड वाढला असतानाच संवादातली सद््भावना आणि प्रेम मात्र पूर्णतः हरवले.
क्लायमेट चेंजमुळे शेतीचे मोठे नुकसान होऊ लागले आणि हार्ट अॅटॅक येऊन मरणाऱ्यांप्रमाणेच लंग्ज अॅटॅक म्हणजेच फुफ्फुसाचा अॅटॅक येऊन मरणाऱ्यांची संख्या वाढू लागली. २०१४ सालच्या हाडे गोठवून टाकणाऱ्या रोगट आणि ढगाळ हिवाळ्यात पहाटे प्रवास केल्याने माझ्या लहान भावाचा तडकाफडकी मृत्यु झाला आणि या भयंकर समस्यांचा राक्षस थेट माझ्या आयुष्याला छेदून गेला. आजुबाजूला जे काही चालले आहे, त्याची थेट किंमत द्यावी लागल्याने मी एकाच वेळी नैराश्यात गेलो आणि संतप्तही झालो. २०१५ मध्ये याच दैनिकात ‘फाफटपसारा' या सदरामधून मी सभोवतालच्या समस्या मांडीत राहिलो.
२०१५ नंतर मी मर्यादीत उपजिवेकेचा मार्ग निवडला आणि उरलेला वेळ जास्तीत जास्त अभ्यासाला देण्याचे ठरविले. वैयक्तिक आयुष्यात झालेल्या हानीतून मन बरेचसे सावरले असले तरी बाह्यस्थिती मात्र बिघडतच राहिली आणि या सर्व परिस्थितीतून मानवप्रजाती आता फार काळ या ग्रहावर रहाणार नाही, या निष्कर्षाप्रत मी आलो. कमालीच्या सार्वजनिक नैराश्याच्या या काळात हरारी यांचे ‘सेपिअन्स’ हे पुस्तक बाजारात आले. हे पुस्तक बाजारात आल्यानंतर जगभरातल्या वाचकांचा इतिहासाकडे पहाण्याचा दृष्टिकोन अंतर्बाह्य पातळीवर बदलून गेला. संकुचित राष्ट्रसंकल्पना आणि अस्मितांची भेसळ वगळून हरारी यांनी सबंध मानवजातीचा दोन लाख वर्षांचा इतिहास निरपेक्षपणे सांगितला. इतकेच काय, पण राष्ट्रसंकल्पना आणि अस्मितांचा उदय नेमका का आणि कुठे होतो, याविषयीदेखील त्यांनी भाष्य केले. इतिहास हा प्रामाणिकपणे का लिहिला जात नाही, आणि तो कसा निष्ठुर असतो हेही त्यांनी जगाला पटवून दिले. सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर सेपिअन्स वाचताना माझ्या ज्ञात माहितीमुळे हे पुस्तक वाचणे मला तसे अतिशय सोपे गेले आणि याच वेळी आपल्या ज्ञात माहितीचा योग्य अर्थ कसा लावायचा हे कसबही मला मिळाले. संकल्पनाच्या आणि अस्मितांच्या जंजाळातून मुक्त झाल्याने जगाकडे अधिक निरपेक्षपणे दॄष्टिकोनातून पहाण्यास मी सुरुवात केली. 
हरारी म्हणतात, त्याप्रमाणे इतिहास हा केवळ काय घटना घडल्या याचा, फक्त अभ्यास नसून या घटनांनी नेमके काय ‘बदल' घडवून आणले यासंबधी आहे. या पृथ्वीवर असणाऱ्या अनेक प्राण्यांप्रमाणेच माणूस हादेखील एक प्राणीच आहे आणि एखाद्या प्राण्याप्रमाणे तोही चुका करु शकतो, समुहात येऊन चांगल्या गोष्टी घडवू शकतो किंवा सामुदायिक विनाशही घडवून आणू शकतो. या तथ्याला मान्य केल्यास हरारी हेदेखील एक माणूसच आहेत आणि माणूसप्राण्याला लागू पडणारे सर्व नियम त्यांनाही लागू पडतात. त्यांच्या एकूण लिखाणाकडे आणि बोलण्याकडे पहाताना आपल्यासारख्याच एका हाडामासाच्या प्राण्याने हे लिहिले आहे आणि तो आपल्याइतकाच सामान्य आहे, हे मूलभूत तथ्य मान्य केल्यास, हरारी हे कुणी गुरु, बुवा वा संत नाहीत आणि कुठल्याही माणसाप्रमाणेच एक माणूस आहेत, हे गमतीशीर सत्य आपल्या हाती लागते.
हाडामांसाने आणि शरीराने आपल्यासारख्याच असणाऱ्या युवाल हरारी या प्राण्याला प्रत्यक्ष भेटण्याचे आणि त्याच्याशी विस्तीर्ण चर्चा करण्याची संधी नुकतीच लाभली. हरारी यांच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसण्याचे भाग्य बिल गेटस, सॅम हॅरीस, आणि नॅटली पोर्टमन यांना लाभले आहे. याशिवाय इमॅन्युअल मॅकरॉन, बराक ओबामा सारख्या दिग्गज राष्ट्राध्यक्षांनीही हरारी यांच्या समोरच्या खुर्चीत बसून त्यांच्याशी चर्चा केली आहे. या महिन्याच्या सोळा तारखेला मुंबईत त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेल्या श्रोत्यांमुळे काही वेळ ट्राफिक जॅम झाले होते आणि मुंबई (बांद्रा) येथील हॉटेल ताज लँड्सच्या विस्तीर्ण लॉन्सवर खुर्च्या संपल्यानंतर लोक जमिनीवर बसून आणि अक्षरश: एका पायावर उभे राहून त्यांचे बोलणे शांतचित्ताने ऐकत होते.

जगभरातल्या अतिश्रीमंत आणि धनाढ्य अभिजनांना पैसे देऊनही हरारी यांना प्रत्यक्ष भेटायला मिळत नाही, मला स्वतःला त्यांचा एक पूर्ण तास वैयक्तिक पातळीवर गप्पा मारण्यासाठी मिळणे ही अशक्य कोटीतली गोष्ट कशी साधता आली, हे मराठी माध्यमातल्या अनेकांना पडलेले कोडे आहे. माझ्यासाठी मात्र हे अजिबात कोडे नाही. हरारी यांना भेटण्यापूर्वी माझा स्वतःचा अभ्यास आणि त्यानंतर हरारी यांच्या पुस्तकांतून त्याची केलेली निरपेक्ष पडताळणी ही वास्तवाच्या अगदी जवळ जाणारी आहे.
मी माझा अहं, आणि हरारी व त्यांचा अहं या भ्रमात न पडता आम्ही दोघेही एकाच प्रजातीचे जीव आहोत, दोघांचाही उगम चिम्पँझीसदृष्य माकडापासून झालेला आहे, आणि या प्रजातीचे जे काही भविष्य आहे, तेच आम्हा दोघांचेही आहे हे आम्हा दोघांनाही पूर्णतः मान्य आहे. ही एक गोष्ट मान्य केल्यानंतर युवाल हरारी यांना मानवप्रजातीच्या भविष्याविषयी वाटणारी काळजी आणि मला वाटणारी काळजी हे दोन्ही सारख्याच पातळीवर येतात. ही काळजी वाटण्याची माझी कारणे आणि हरारी यांची कारणेही तशी जवळपास सारखीच आहेत आणि मानवजातीच्या भविष्याविषयी काळजी करणाऱ्या इतर अनेकांचीही कारणे जवळजवळ अशीच आहेत. त्यामुळे इतर अनेकांना दुर्मिळ वाटणारी ही भेट हरारी वा माझ्यासाठी अतिदुर्मिळ अजिबात नव्हती. ज्या सहजतेने दोन मासे वा दोन चिमण्या वा दोन फुलपाखरे एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतात, तितक्याच सहजतेने आम्ही एकमेकांच्या संपर्कात आलो आणि आमच्या प्रजातींच्या भविष्याची उलटसुलट चर्चा केली. मी केवळ एक सेपीअन आहे दुसरा कुणी नाही, ही जाणीव करुन देणाऱ्या डेव्हिड अॅरटेनबरो आजोबा आणि ‘बीबीसी’चे मात्र इथे आभार मानायला हवे. या चर्चेसाठी माझ्या अकलेची किमान पातळीवर काही ओळख उपलब्ध असणे, मात्र अत्यावश्यक होते, मानववंशशास्त्रावर सातत्याने लिखाण करणारा एक माणूस ही माझी ओळख प्रामुख्याने दैनिक दिव्य मराठी आणि आणखी एका अग्रणी मराठी दैनिकाने करुन दिली होती. या भेटीस जाताना मी दिव्य मराठी - रसिक पुरवणी आणि तिचे थोरले भावंडं ‘दैनिक भास्कर' यांच्यातर्फे गेलो होतो. पण याहीपेक्षा महत्त्वाची ओळख म्हणजे, मी या दैनिकाचे वाचक आणि इतर कुणाही सामान्य माणसाचा प्रतिनिधी म्हणून गेलो होतो. आजकाल फक्त सामान्य माणसांच्या प्रतिनिधीला बहुतांश ठिकाणी गांभीर्याने घेतले जात नाही. मात्र, एक सामान्य लोकांचा लेखक म्हणून युवाल हरारी या सामान्य माणसास कुठलाही सामन्य माणूस सहजपणे भेटू शकतो, हे सत्य या भेटीत प्रस्थापित झाले...
'Sapian' The Name Harare article by Rahul Bansode

Post a Comment

 
Top