0
मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यांनतर काँग्रेसने कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्‍हणून जाहीर केले. आज, शुक्रवारी कमलनाथ हे राजभवन येथे जाऊन राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते सरकार स्‍थापनेचा दावा करतील.

दरम्यान, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री निवडीवरून निर्माण झालेला पेच अखेर गुरुवारी रात्री सुटला. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची निवड करण्यात आली. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही एक ट्विट करून कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. कमलनाथ यांचा शनिवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशात कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्यालाच मुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. त्यामुळे नेता निवडीत पेच निर्माण झाला होता.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन्ही राज्यांतील नेत्यांची स्वतंत्र बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहमती होऊ शकली नव्हती. राहुल गांधी व सोनिया गांधी यांनी दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे व एकत्रितपणेही चर्चा केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांना भोपाळमध्ये परतण्यास सांगण्यात आले.  दरम्यान, भोपाळमध्ये परतल्यानंतर पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात कमलनाथ व शिंदे यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदाबाबत घोषणा केली. यात कमलनाथ हे पुढचे मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाले. त्याचवेळी राज्यात उपमुख्यमंत्रिपद नसेल, असेही जाहीर करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील नेता निवडीवर दिल्लीत विचारमंथन सुरू असतानाच तिकडे भोपाळमध्ये शिंदे आणि कमलनाथ यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोर जोरदार शक्‍तिप्रदर्शन करीत आपल्याच गटाला मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी आग्रही मागणी केली. कमलनाथ मुख्यमंत्री झाल्याचे पोस्टरही त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी लावले. दुसरीकडे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे छायाचित्र घेऊन एम. पी. के सी. एम. महाराज, अशी घोषणाबाजी केली.

काँग्रेसला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रिपद कमलनाथ यांच्याकडेच जाणार, अशी अटकळ बांधली जात  असतानाच निकालाच्या दिवशीच स्वतः शिंदे यांनी आपण मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे नेतेपदावरून तिढा निर्माण झाला होता.
 

Post a comment

 
Top