0
१५ लाखांची नोकरी सोडून नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार

नागपुर- कर्जबाजारीपणा, नैसर्गिक संकटांमुळे दीनवाणे झालेले शेतकरी आत्महत्या करीत असतानाच नागपुरचे राज मदनगर, अनिकेत शेटे व गोपाल शर्मा या उच्चशिक्षित युवकांनी दिग्गज कंपन्यांतील लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून अभिनव शेती करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

राज मदनकर- १५ लाखांची नोकरी सोडून नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार
राज मदनकर हा देशातून निवडलेल्या ५० जणांपैकी एक 'स्वच्छ भारत' दूत आहे. तो अमेरिकन बँकेत १५ लाखांच्या पॅकेजवर काम करत होता. मात्र, शेती करण्याच्या उद्देशाने नोकरीला रामराम ठोकला. नैसर्गिक शेती जैविकपेक्षाही किफायतशीर असल्याचे तो अभ्यासाअंती सांगतो. पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन स्वतः शेती सुरू केली. त्याच्यामुळेच गोपाल आणि अनिकेत प्रभावित झाले आहेत.

गोपाल शर्मा- २२ लाखांची नोकरी सोडली, गौ-आधारित अर्थव्यवस्थेत काम करणार
राजचे पाहून गोपाल शर्माही जनरल मोटर्समधील २२ लाख पॅकेजची नोकरी सोडून शेती करतोय. अपघातात जखमी गाईला घरी आणून गोपालने तिच्यावर एकदा उपचार केले. तिची सेवा करीतच त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीनिमित्त बंगळुरूला जावे लागणार असल्याने गाय एका गोशाळेला दान दिली. त्या गायीमुळे आपल्याला गौ-आधारित अर्थव्यवस्थेत योगदान द्यायचे, असे तो सांगतो.

अनिकेत शेटे- शेती करण्यासाठी १२ लाखांचे पॅकेज सोडून सहकुटुंब येतोय
दिल्लीत लार्सन अँड टुब्रोत कार्यरत अभियंता अनिकेत शेटेही राजीनामा देऊन येत्या हंगामापासून राजसोबत शेती करणार आहे. तो तर सहकुटुंब परत येतोय. १२ लाखांचे पॅकेज असलेल्या अनिकेतला शेतीच करायची होती. यवतमाळ जिल्ह्यातील बोरगावजवळ त्याची शेती आहे. 'युवर स्टोरी', "बेटर इंडिया' मासिकांत शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून शेती करण्याचा विचार पक्का होत गेल्याचे अनिकेतने सांगितले.

गौ-आधारित अर्थव्यवस्थेसाठी प्रयत्न

सध्या या मोहिमेत अशोक इंदुकुरी वाहतूक व्यवस्था व देशांतर्गत विक्री व्यवस्थेचे काम करीत आहे. आयुर्वेदाचार्य राम शर्मा मदत करीत आहेत, तर सोशल मीडियाचे काम राजेंद्र जिंदल करणार आहे. देशी बियाणे वाचवून लोकांना शुद्ध, सकस व नैसर्गिक अन्न पुरवणे, गौ-आधारित अर्थव्यवस्था उभी करणे व गावातून शहराकडे स्थानांतरित झालेल्या अल्पपगारी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना परत गावाकडे परत आणणे हा यामागील उद्देश असल्याचे मदनकर याने सांगितले.
Real life Three Idiots

Post a Comment

 
Top