0
चोरट्यांचा हैदोस बोरसे ब्रदर्सच्या ऑफिसातील तिजोरी फोडली; पाच कंपन्यांची होती रोकड

धुळे- महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेतून पोलिसांनी पूर्ण उसंत घेतलेली नसताना देवपुरातील बोरसे ब्रदर्समधील साडेचाैदा लाखांची चोरी आणि साक्री रोडवर वॉचमनला बांधून ठेवून ६७ हजार रुपये लुटल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. बोरसे ब्रदर्सच्या कार्यालयातील रोकड अवघ्या दहा मिनिटांत तिघांनी लांबवली. तर साक्री रोडवर सुमारे अर्धातास दरोडेखोरांचा धिंगाणा सुरू होता. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या दोन्ही घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर बोट उठवले जाते आहे.

देवपुरातील आनंदनगर परिसरात प्लॉट न. २३ या ठिकाणी बाेरसे ब्रदर्स कार्यालय आहे. सुमीत बोरसे हे या कार्यालयाचे कामकाज पाहतात. सकाळी नेहमीप्रमाणे कामाला सुरुवात करण्यापूर्वी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे समाेर आले. तर तिजोरीमधील साडेपंधरा लाखांची रोकड ही चोरीस गेली होती. यामुळे लागलीच पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी कार्यालयाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर मोटारसायकलवरून आलेले तिघे चोरटे यांना टिपले आहे. अवघ्या दहा मिनिटांत त्यांनी ही रोकड लांबवल्याचे स्पष्ट झाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, डीवायएसपी सचिन हिरे, एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, पश्चिम देवपूर पाेलिस ठाण्याचे अधिकारी सतीश गोराडे यांनी संपूर्ण इमारतीची पाहणी केली. शिवाय सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले. चोरीस गेलेली रक्कम पाच कंपनीच्या व्यवहारातील होती. घटनेबद्दल पश्चिम देवपूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस या चोरीच्या तपासात गुंतले असताना साक्री रोडला लागून असलेल्या जयभवानी ट्रेडर्स या ठिकाणी दरोड्याचा प्रकार समोर आला. या दुकानाचे मालक ओम अग्रवाल हे कुटुंबासह जालना या ठिकाणी गेले असल्यामुळे त्यांनी दुकान व घराच्या सुरक्षेची जबाबदारी राखणदार हिंमतसिंग पावरा यांना सोपवली होती. पावरा हे दुकानाजवळ झोपले असताना पहाटे चार दरोडेखोर आले. त्यांनी रॉडच्या साहाय्याने पावरा यांना मारहाण केली. तसेच चाकू लावून त्यांना बांधण्यात आले. यानंतर घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. सुमारे अर्धातास दरोडेखोरांचा हैदोस सुरू होता. अग्रवाल यांच्या घरातून किमती वस्तू घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्रवाल यांनी धुळे गाठले. लुटीस गेलेल्या ऐवजाचा हिशेब करून त्यांनी धुळे शहर पाेलिस ठाणे गाठले. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिस करणार उलटतपास 
दोन्ही घटनेच्या सखोल तपासात पाेलिस गुंतले असले तरी या प्रकरणाचा उलट तपासही केला जाऊ शकतो. तिजोरीची चावी चोरट्यांना मिळाली कशी, केबिनमध्ये मोठी रक्कम असल्याचे चोरांना कसे काळले याचा पोलिस शोध घेत आहेत. तर थंडीचे दिवस वाढले असताना अग्रवाल यांचा घराची राखण करणाऱ्याने बाहेर अंथरुण का टाकले. त्यांनी प्रतिकार केला तर दरोडेखोरांनी किरकोळ मारहाण का केली. यासह अनेक प्रश्न पोलिसांनाही याबाबत पडले आहेत.

हा तर निष्काळजीपणा... 
बोरसे ब्रदर्स कार्यालयातील रोकड भरभक्कम तिजोरीत ठेवली होती. कदाचित चोरट्यांकडून ती फोडताही आली नसती; परंतु तिजोरीची चावीही याच केबिनमध्ये असलेल्या ड्रावरमध्ये हाेती. चोरट्यांनी ती मिळवून सहजपणे रोकड लांबवली. शिवाय कार्यालयाबाहेर लावलेले सीसीटीव्ही ही जुने आहेत. त्यामुळे तिघे चोरटे त्यात दिसत असले तरी त्यांचे चेहरे मात्र सीसीटीव्हीला टिपता आले नाही. तर जयभवानी ट्रेडर्सचे मालक अग्रवाल यांनी मजबूत दरवाजावर मात्र तकलादू कुलूप ठाेकले होते. शिवाय किमती वस्तू व पैशांना बंॅकेत ठेवले असते तर ही वेळ टळली असती. या बाबी निव्वळ निष्काळजीपणाकडे अंगुलीनिर्देश करतात.

जॅक चोर, दरोडेखोरांच्या मागावर... 
बोरसे ब्रदर्स या ठिकाणी श्वान पथकातील जॅकला नेण्यात आले. तिजोरीच्या चावीचा त्याला गंध दिला. केबिनमध्ये फिरल्यानंतर जॅक खाली उतरला. यानंतर समोरच असलेल्या एका जागेपर्यंत नेले. या ठिकाणी मोटारसायकलच्या चाकांची चिन्हे पोलिसांना मिळाली आहेत. तर अग्रवाल यांच्या घरी दागिन्यांचे बॉक्स व छोटी पर्सचा गंध घेऊन जॅक मागील दरवाजापर्यंत गेला. यानंतर वर जाऊन त्याने माग दाखवला. शिवाय उडी घेऊन दरोडेखोर पसार झालेली जागा त्याने दर्शविली.

पाच कंपन्यांची राेकड 
पोलिसांच्या माहितीनुसार बोरसे ब्रदर्स कार्यालयात पाच कंपन्यांच्या व्यवहारातील साडेपंधरा लाखांची रोकड होती. त्यात दोन बांधकाम कंपनी, तर सॉफ्टवेअर, ल्युब्रिकंट ऑइल आणि एक पेट्रोल पंपची रक्कम हिशेब करून ठेवण्यात आली होती.

असे होते टोळके... 
बोरसे ब्रदर्स यांच्या कार्यालयात चोरी करणारे टोळके अंदाजे तिशीतील आहेत. त्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. शिवाय कानटोपी परिधान केली होती. नाइट व्हिजन नसलेल्या सीसीटीव्हीमुळे त्यांचे चेहरे ओळख पटलेली नाही. तर अग्रवाल यांच्या घरी आलेले दरोडेखोर अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील होते. त्यातील दोघांनी पावरा यांना चाकू लावला तर दोघांनी घरातून दागिने लांबवले. ते अधूनमधून मराठीमिश्रित हिंदी बोलत होते, अशी माहिती तपासातून पुढे आली.Ten lakh rupees stolen within minutes in Dhule

Post a Comment

 
Top