0

सुपा पोलिसांची कारवाई

नगर : आरोपींचा सिनेस्टाइल पाठलाग करत अपहरण झालेल्या व्यक्तीची सुपे (तालुका पारनेर) पोलिसांनी सुटका केली. त्याचबरोबर या प्रकरणातील पोलिसांना चकवा देत पसार झालेले आरोपीदेखील २४ तासांच्या आत गजाआड करण्यात आले. अपहरण केलेल्या व्यक्तीला सोडण्यासाठी आरोपींनी ८० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीदेखील या आरोपींनी संबंधितांना दिली होती.


शेवगाव येथील रमजान सलीम शेख यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले असल्याची तक्रार त्यांचे भाऊ शहाजान सलीम शेख यांनी पोलिसांकडे केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सुपे पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू केली.


आरोपींना अपहरण झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांशी बोलण्यात गुंतवून त्यांचा पाठलाग पोलिसांनी सुरू केला. आरोपी जसे जसे ठिकाण बदलत होते, त्याप्रमाणे पोलिसांनी पाठलाग केला. सुपे टोलनाक्याच्या पुढे संशयास्पद गाडी उभी दिसली.


अपहरण झालेली व्यक्ती याच गाडीत होती. पोलिसांनी त्या व्यक्तीची सुटका केली. परंतु आरोपींनी गाडी मागे घेत पुण्याच्या दिशेने धूम ठोकली. नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे आरोपींच्या गाडीचा अपघात झाला. अंधारात गाडी सोडून देत आरोपींनी पोबारा केला. 
दरम्यान, अपहरण झालेल्या व्यक्तीने आरोपींची नावे सांगितली. सुरेश विजय सातपुते (रा. पिंपळनेर, ता. पारनेर), गंगाधर संभाजी चत्तर (रा. लांजेवाडी, ता. पारनेर), भावड्या ऊर्फ दत्ता शिंदे (पूर्ण नाव माहिती नाही) अशी आरोपींची नावे आहेत. हे फरार झालेले आरोपी म्हसणे फाटा चौकात येत असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक मनीष कलवाणिया यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका करून आरोपींना २४ तासांच्या आत गजाआड केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.kidnapper arrested by police

Post a comment

 
Top