0
गाळपात राजकारण केले तर गाठ आमच्याशी, उपाध्यक्षांनी स्वीकारले निवेदन

परळी- ऊस गाळपात भेदभाव केला जात असल्याच्या तक्रारी कानावर पडताच मंगळवारी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसह पांगरीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला अचानक भेट दिली. मुंडे दिसताच काही अधिकारी व कर्मचारी कारखान्यातून गायब झाले. अर्ध्या तासानंतर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव व काही संचालकांनी कारखान्यावर येऊन मुंडेंचे निवेदन स्वीकारले .

वैद्यनाथ कारखान्याकडून ऊस गाळपात भेदभाव केला जात असून प्रोग्राम बाजूला ठेवून भाजप कार्यकर्त्यांचाच ऊस आणला जात आहे . ज्यांनी रक्ताचे पाणी करून हा कारखाना उभारला त्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे व पंडित अण्णा मुंडे यांनी ऊस गाळपात कधीच भेदभाव केला नाही. सर्व सभासदांचा ऊस विना तक्रार गाळप केला होता. राजकारणापायी हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी, सभासदांच्या बाबतीत राजकारण आणले तर गाठ आमच्याशी अाहे, असा इशारा मुंडे यांनी दिला .वैद्यनाथ कारखान्यावर येण्यापूर्वी धनंजय यांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा १९ वा गळीत हंगाम ५ नोव्हेंबर२०१८ पासून सुरू झाला असून यंदा कमी पावसामुळे उसाला पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उस वाळू लागला आहे . वैद्यनाथ कारखान्याकडून आत्तापर्यंत पहिल्या प्रोग्राममधील १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंतचा ऊस गाळप सुरू आहे. ऊस गाळपाबाबत सभासद शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने अशा शेतकऱ्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली त्यानंतर सर्वच जण वैद्यनाथ कारखान्यावर गेले. मुंडे हे कारखान्यावर येणार असल्याची माहिती मिळताच कार्यकारी संचालक दीक्षितुलू यांच्यासह काही अधिकारी गायब झाले. कारखान्यावर जाण्यापूर्वी मुंडे यांनी सकाळी ११ वाजता गोपीनाथगडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतरच ते कारखान्यावर गेले. मुंडे निवेदन देण्यासाठी आले परंतु अर्धा तास निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीच उपस्थित नव्हते. अर्ध्या तासानंतर उपाध्यक्ष नामदेव आघाव व संचालक ज्ञानोबा मुंडे आले. त्यांनी मुंडे व शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. दरम्यान मुंडेंसोबत आलेले कार्यकर्ते कार्यकारी संचालक व कारखान्यातील अधिकाऱ्यांना फोन लावत होते. परंतु कोणी विवाह सोहळ्यात तर कोणी बाहेरगावी असल्याचे सांगत होते.

३१ दिवसांत १ लाख ५ हजार मेट्रिक टन गाळप
वैद्यनाथचा १९ वा गळीत हंगाम ५ नोव्हेंबर रोजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. मागील ३१ दिवसांत कारखान्याने १ लाख ५ हजार रु.चे गाळप करून ८४ हजार पोती साखर उत्पादित केली आहे.

राज्य व केंद्र सरकारला शेतकरी आणि दुष्काळाचं घेणं-देणं नाही
राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळी स्थितीत उपाययाेजना राबवण्यासाठी राज्य व केंद्र निष्क्रिय ठरत आहे. मात्र देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात भूमिपूजनांसाठी फिरत आहेत. यापूर्वी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक व इंदू मिल येथील डाॅ. आंबेडकर स्मारक उभारणीचे गाजावाजा करून भूमिपूजन केले. मात्र अद्यापपर्यंत प्रत्यक्षात एक इंचभरही काम पूर्ण झालेले नाही. आता पुन्हा पंतप्रधान मुंबई-पुण्यात येत आहेत. तीही कामे प्रलंबित राहण्याचा अनुभव नागरिकांना येणार आहे, अशी टीका मुंडे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषदेत केली. या वेळी प्रकाश साेळंके, अमरसिंह पंडित, राजेंद्र जगताप, पृथ्वीराज साठे, जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग साेनवणे, महिला आघाडीच्या रेखा फड, अशाेक डक, दिलीप भाेसले, उपस्थित हाेते.

बदनामी कराल तर खबरदार, प्रोग्रामनुसारच ऊस गाळप
वैद्यनाथ साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू असून कारखान्याच्या चेअरमन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अनंत अडचणींवर मात करून शेतकऱ्यांच्या काळजीपोटीच कारखाना पुन्हा पूर्ववत सुरू केला आहे. कारखाना शेतकऱ्यांचा असल्याने ऊस गाळपात भेदभाव केला जात नाही.सर्वाचा ऊस प्रोग्रामप्रमाणेच गाळप होत आहे. काहीतरी स्टंटबाजी करून कारखाना बदनाम करण्याचा प्रयत्न कराल तर ते सहन केले जाणार नाही, असे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी धनंजय मुंडे यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे . चेअरमन पंकजा मुंडे यांचा देशमुख टाकळी शिवारातील १७२ टन ऊसही प्रोग्रामप्रमाणेच गाळप झाला आहे .राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय मुंडे (५७ टन), नीळकंठ चाटे (३५७ टन), माणिक फड (६७ टन), राजाभाऊ पौळ(१५५ टन), अतुल मुंडे (६६४ टन) अशा अनेक कार्यकर्त्यांचा ऊस कारखान्याने गाळप केला आहे, असेही आघाव यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

 
Top