0
प्रवासी वाहतूक करणाऱया वडाप व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी राधानगरी तालुक्यातील मजरे कासारावाडा येथे घडली. राजेंद्र रमेश वडर (वय 30, रा. कासारवाडा पाटणकर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
 मंगळवारी संध्याकाळी राजेंद्र वडर मोटार सायकलवरून कोल्हापूरकडून गावाकडे चालला होता तर मुदाळ तिट्टय़ांकडून प्रवाशी वाहतूक करणारी वडाप गाडी कोल्हापूरच्या दिशेने जात होती. मजरे कासारवाडा गावाजवळ दुचाकी व वडाप वाहनाची समोरासमोर धडक झाली. यामध्ये राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला. त्याची मोटार सायकल रस्त्याच्या मध्येच पडली होती तर मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकला गेला होता. मोटार सायकलला जोराची धडक बसल्याने गाडीचा चक्काचूर झाला होता. गवंडी काम करणाऱया राजेंद्रच्या  वडिलांचे तीन दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. तर वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
      अपघाताच्या घटनेनंतर नातेवाईकांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी फोडलेला हंबरडा साऱयांचे हृदय हेलावणारा होता. अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली होती.

Post a Comment

 
Top