सातारा जिल्हा रिपाइं पक्षाचा हक्काचा शिलेदार मानले जाणारे श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड यांनी हजारो कार्यकर्त्यांसह लोकजनशक्ती पार्टीत प्रवेश केल्यामुळे सातारा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाला मोठा धक्का बसला असून रिपाइंला खिंडार पडल्याची चर्चा सुरू आहे. आगामी काळात रामविलास पासवानांच्या जनशक्ती पक्षाची ताकद आता रिपाइंला भिडणार असल्याने लोकजनशक्ती पक्षाचे वादळ घोंगावणार असल्याचे स्पष्ट संकेत गायकवाड यांनी प्रवेश करून दिले आहेत.
रिपाइं समितीच्या माध्यमातून जिह्यात विजयराव गायकवाड यांनी अनेक कामगारांचे प्रश्न सोडवत, तसेच अनेक कुटुंबं उध्वस्त होण्यापासून वाचवले आहेत. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये श्रमिक ब्रिगेडने सातारा जिह्यामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले होते. तसेच श्रमिक ब्रिगेडच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते विजयराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमिक ब्रिगेडमध्ये दाखल झाले होते. मात्र, जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड यांनी रिपाइंच्या अंतर्गत मनमानी मोगल शाही कारभाराला कंटाळून गायकवाड यांनी रिपाइंला ‘राम राम’ ठोकला असल्याचे बोलले जात आहे. गायकवाड यांनी सातारा जिह्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी भीमशक्ती, गोरगरीब जनता व मागासवर्गीय समाजाला खऱया अर्थाने न्याय देण्यासाठी लोकजनशक्ती पार्टीचा पर्याय निवडला असून सातारा जिह्यात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या शक्तीला बरोबर घेऊन आव्हान उभे करण्याचा प्रयत्न लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळे गायकवाड यांचा पक्षप्रवेश म्हणजे भविष्यात येणाऱया लोकसभा-विधानसभेला रिपाइंला हा मोठा झटका समजला जात आहे. तसेच लोकजनशक्तीच्या माध्यमातून पुन्हा एकदा तीच ताकद सातारा जिह्यामध्ये उभी करणार असल्याचं वचन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सर्वां समक्ष दिले आहे.
साताऱयातील रेस्ट हाऊस येथे लोकजनशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष शमीम हवा यांच्या अध्यक्षतेखाली गायकवाड यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी शमी हवा म्हणाले, केंद्रामध्ये भाजप सरकार सोबत आमचा पक्ष आहे. मात्र, स्थानिक पातळीवर जर भाजपच्या नेत्यांनी आमचा विचार केला नाही, तर येणाऱया लोकसभा-विधानसभांमध्ये आमचा स्वबळाचा नारा असेल. तसेच लोकजनशक्तीच्या माध्यमातून जिह्यातील सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही करत आहोत. हीच ताकद आता कायम ठेवण्याची जबाबदारी आम्ही विजयराव गायकवाड यांच्यावरती सोपवली आहे, त्यामुळे जिह्यात लोकजनशक्तीचा मोठा विस्तार होणार आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे, पुणे जिल्हाध्यक्ष संजय अल्लाड आदींसह लोक जनशक्तीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment