0
विद्यमान खासदार राजू शेट्टी यांनी उसदराव्यतिरिक्त इतर प्रश्नाकडे कधीही लक्ष दिलेले नाही. कायद्यानुसार एफआरपी देणे बंधनकारक असताना यासाठी आंदोलन उभा करणे हा केवळ दिखावा आहे.  ग्रामीण भागातील शेतकऱयांच्या मनामध्ये खासदार शेट्टी यांच्याबद्दल सकारात्मकता आहे. हा मोठा गैरसमज असून राजू शेट्टी यांनी वारंवार केलेल्या उसदर आंदोलनाचे चघळून चघळून चिपाड झालेले आहे. त्यामुळे होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या माध्यमातून मतदारांना एक समर्थ पर्याय म्हणून उभे राहणार असल्याचे धैर्यशील माने यांनी सांगितले. इचलकरंजी येथे पत्रकार बैठकीवेळी ते बोलत होते.
  धैर्यशील माने पुढे म्हणाले, खासदार शेट्टींनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत खासदार शरद पवार यांच्याविरोधात राजकारण केले. मतदारांच्या मनात त्यांच्याविषयी विष कालवले. पण शरद पवार यांनी त्यांनाच जवळ करून घरच्या माणसांवर मात्र अन्याय केला. यासाठी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी ही जबाबदारी खांद्यावर दिली असून शिवसेनेशी पुर्णपणे एकरूप झालो आहे. आगामी काळात हातकणंगले लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा गड असेल असेही माने यांनी सांगितले. आतापर्यंत खासदार शेट्टींना कोणही प्रबळ विरोधक नाही अशी सर्वांची भावना होती. पण मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर फक्त दहा दिवसातच वातावरण बदलले आहे. आतापर्यंत मी लढणार असे म्हणत होतो पण आता मतदारच आपल्याला तुम लढो असे म्हणत असल्यामुळे एक समर्थ पर्याय म्हणूनच आपण जनतेसमोर जाणार असल्याचेही माने यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top