0
नवी दिल्ली - संपूर्ण कर्जमुक्ती विधेयक आणि हमीभाव विधेयक २०१८ या स्वाभिमानी पक्षाच्या राजू शेट्टी यांनी लोकसभेत मांडलेल्या खासगी विधेयकाला पाठिंबा देत देशातील बहुतांश विरोधी पक्षांनी किसान मुक्ती मोर्चाला आपला पाठिंबा दिला. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या छत्राखाली गुरुवारपासून दिल्लीत दाखल झालेल्या देशभरातील शेतकऱ्यांचा किसान मुक्ती मोर्चा आज संसदेवर पोहोचला.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियोजनानुसार पोलिसांच्या सूचनेनुसार संसद मार्गावर त्याचे सभेत रूपांतर झाले. त्या वेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार, लोकतांत्रिक जनता दलाचे शरद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासह तृणमूल काँग्रेस, तेलगू देसम या पक्षांच्या प्रतिनिधींनी यास पाठिंबा जाहीर केला.
सततची नैसर्गिक आपत्ती आणि सरकारची शेतकरीविरोधी धोरणे यामुळे देशातील शेतकरी अडचणीत सापडला असल्याने देशातील शेती व शेतकरी संकटातून काढण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती आणि हमीभावाची गॅरंटी हे कायदे मंजूर करावेत आणि त्यासाठी संसदेचे विशेष सत्र बोलवावे या मागणीसाठी हा किसान मुक्ती मोर्चा काढण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून देशभरातील शेतकऱ्यांशी व तज्ज्ञांशी चर्चा करून हे कायदे तयार करण्यात आले असून ते मंजूर करणे हाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील एकमेव उपाय असल्याचे खा. शेट्टी यांनी या वेळी मांडले. 
शेतकरी हिताचा विचार करून यातील एकेक कलम आखले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी या वेळी मांडले.

सध्या ज्यांच्या हाती देशाचा कारभार आहे त्यांना शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नसल्याची टीका त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर केली. पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार असताना यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली तेव्हा पंतप्रधान मनमोहनसिंग थेट त्या गावात पोहोचले, आत्महत्येमागील कारणे जाणून घेतली आणि देशातील शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले याचे स्मरण त्यांनी करून दिले.

आता पुन्हा एखदा ही वेळ आली असून, शेतकऱ्यांच्या हिताचे हे कायदे केले नाही तर सरकार बदलण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
Political Parties supported Kisan Morcha in Delhi

Post a Comment

 
Top