थंडीचा कहर आणखी चार दिवस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
- भोपाळ- हिमालयीन राज्यांतील बर्फवृष्टीनंतर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान व गुुजरातमध्ये थंडीची लाट आहे. दिल्लीत थंडीने सात वर्षांचा विक्रम मोडला. देशाच्या राजधानीत पारा ४.७ अंशांवर पोहोचला. राजस्थानच्या सिकरमध्ये १३ वर्षांत पहिल्यांदाच सलग आठव्या दिवशीही पारा उणे २.८ अंशांवर होता. थंडीचा कहर आणखी चार दिवस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. धुक्यापासूनही एवढ्यात सुटका होणार नाही. पर्वतीय हवेमुळे गारठा आणखीनच वाढत जाणार आहे. काश्मीरमध्ये चिल्ले कलां (थंडीचा मोसम) सुरू झाला आहे. चिल्ले कलां ४० दिवसापर्यंत चालतो. अर्थात ३१ जानेवारी पर्यंत चालणार आहे. २० दिवस चिल्ले खुर्द व १० दिवस चिल्ले बच्चा हे ऋतूंचे टप्पे असतील. काश्मीरात १९८७ मध्ये तापमान शून्य ते उणे ९ अंश सेल्सियसपर्यंत निचांकी गेले होते. तेव्हा प्रसिद्ध दाल सरोवर अक्षरश: गोठले होते. शुक्रवारी श्रीनगरचा पारा उणे ४.९ अंश सेल्सियस होता. एक दिवसापूर्वी येथील तापमान उणे ४.४ अंश सेल्सियस होते.
कारगिल गारठले, उणे १५.१ अंश सेल्सियस
जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात थंड प्रदेश म्हणून लडाखमधील लेह क्षेत्राची शुक्रवारी नोंद झाली. येथे पारा उणे १२.७ अंश सेल्सियस असा नोंदवण्यात आला. त्याशिवाय कारगिलमध्ये पारा उणे १५.१ अंश नोंदण्यात आला. कुपवाडामध्ये पारा उणे ५.८ अंश, पहलगाममध्ये उणे ७.५ अंश, गुलमर्ग-उणे ६ अंश अशी नोंद झाली. आगामी आठवडा अधिक शुष्क राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
दिल्लीसह पाच राज्यांत दाट धुक्याची चादर
थंडीच्या लाटेबरोबरच दिल्ली महानगरावर दाट धुक्याची चादर पाहायला मिळू लागली आहे. त्यामुळे जवळचे देखील पाहणे कठीण झाले होते. स्थिती वाईट झाल्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. २२ डिसेंबर पर्यंत ऑरेंज अलर्ट राहणार आहे. दिल्लीशिवाय पंजाब, राजस्थान, हरियाणा व चंदीगडमध्ये अलर्ट राहणार आहे. धुक्याचा परिणाम चंदीगड, बिहार, सिक्किम, मप्रमध्ये दिसू शकेल.
Post a Comment