प्रेमप्रकरणातून बहिणीबरोबर विवाह केल्याने सुमीत वाघमारे या तरुणाची हत्या झाली होती.
- बीड- प्रेमप्रकरणातून बहिणीबरोबर विवाह केल्याने सुमीत वाघमारे या तरुणाची मेहुण्याने मित्राच्या मदतीने भररस्त्यात हत्या केल्याची घटना १९ डिसेंबर रोजी घडली होती. या कटात आतेभावांनी सहभाग नोंदवल्याचे तपासात स्पष्ट झाले. घटनेच्या सहा दिवसांनंतर मंगळवारी पोलिसांनी यातील फरार मुख्य आरोपी बालाजी लांडगे, संकेत वाघ यांच्यासह कटात सहभागी गजानन रवींद्र क्षीरसागर याच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.अभियांत्रिकीचा विद्यार्थी असलेला सुमीत वाघमारेने वर्गातीलच भाग्यश्री लांडगेसोबत प्रेमसंबंधातून दोन महिन्यांपूर्वी विवाह केला होता. भाग्यश्रीच्या घरून या विवाहाला विरोध हाेता. १९ डिसेंबर रोजी अभियांत्रिकीचा पेपर देऊन भाग्यश्री आणि सुमीत महाविद्यालयाबाहेर पडल्यानंतर भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगेने मित्र संकेत वाघच्या मदतीने सुमीतवर हल्ला केला. भाग्यश्रीसमोरच त्याच्यावर शस्त्राने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर फरार झालेल्या बालाजी व संकेतला ६ दिवसांनंतर मंगळवारी बीड पोलिसांनी अमरावती शहरातील बडनेरा रेल्वेस्थानकावरून अटक केली. हा पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वात आधी कृष्णा रवींद्र क्षीरसागरला अटक केली होती. मंगळवारी गजानन रवींद्र क्षीरसागर या कृष्णाच्या भावालाही ताब्यात घेतले होते.हत्या करण्यात आलेल्या सुमीतला न्याय देण्यासाठी त्याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, भाग्यश्रीचे पुनर्वसन करून वाघमारे कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याच्या मागणीसाठी बुधवारी सुमीत वाघमारेच्या कुटुंबीयांसह विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यात सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, अशोक तांगडे, अजय सरवदे, पुष्पा तुरूकमाने, अरुणा आठवले, गोपीनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर कवठेकर, लखन शिनगारे, धम्मानंद वाघमारे आदींचा सहभाग होता.
Post a Comment