0
अतिरेक्यांसोबतच्या चकमकीत एका जवानाला वीरमरण, दोन गंभीर जखमी

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शनिवारी तीन अतिरेक्यांचा खात्मा केला. चकमकीत एक जवान शहीद, तर दोन गंभीररीत्या जखमी झाले. अतिरेक्यांना टिपल्याने संतप्त झालेल्या स्थानिकांनी सुरक्षा दलांना घेरले. त्यांना पांगवण्यासाठी केलेल्या कारवाईत ७ नागरिकांचा मृत्यू झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पुलवामात संचारबंदी लागू केली आहे. सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. अफवांवर नियंत्रण आणण्यासाठी पुलवामात मोबाइल व इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. खोऱ्यात रेल्वे सेवाही बंद होत्या. ७ नागरिकांच्या मृत्यूच्या विरोधात फुटीरवाद्यांनी शनिवारपासून तीन दिवसांच्या बंदची घोषणा केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्करातील पळपुटा जवान जहूर अहमद ठोकर याच्यासह तीन अतिरेकी पुलवामाच्या सिरनू गावात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहीम राबवण्यात आली.

ठोकर हा याच गावाचा रहिवासी हाेता. त्याच्याविरुद्ध चकमक सुरू झाल्याचे कळताच स्थानिकांचा मोठा जमाव सुरक्षा दलाच्या कामात अडचणी आणू लागला. जवानांनी फक्त २५ मिनिटांत तिन्ही अतिरेक्यांना टिपले. मात्र त्यांना चकमकीच्या ठिकाणाहून बाहेर पडले कठीण झाले. घोषणाबाजी करत जमाव लष्कराच्या वाहनांवर चढला. इशाऱ्यासाठी हवेत गोळीबार केल्यानंतरही लोक उतरले नाहीत. जमावाला पांगवण्यासाठी जवानांना लोकांवर पॅलेट्स व गोळीबार करावा लागला. यात सात जणांचा मृत्यू झाला. वृत्तांनुसार, या संघर्षात ३५ पेक्षा जास्त लोक जखमी आहेत.

मृत अतिरेक्यांत भारतीय लष्कराचा पळपुटा जवान जहूरचा समावेश
ठार अतिरेक्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. त्याचे नाव जहूर अहमद ठोकर असे आहे. तो उत्तर काश्मीरच्या बारामुल्लातील लष्कराच्या गंटमुलास्थित छावणीतून गेल्या वर्षी जुलैत पळून गेला होता. सर्व्हिस रायफल व ३ मॅगझिनसोबत फरार झालेला ठोकर अतिरेकी संघटनेत सहभागी झाला होता. पुलवामातील अनेक हत्यांत त्याचे नाव आले होते. इतर २ अतिरेक्यांची अद्याप ओळख पटली नाही.

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या: कुठवर आपल्या तरुणांच्या शवपेट्यांना खांदा देत राहायचे
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, 'आपण कुठवर आपल्या तरुणाईच्या शवपेट्यांना खांदा देत राहू? कोणताही देश आपल्या लोकांची हत्या करून युद्ध जिंकू शकत नाही. मी या हत्यांचा निषेध करते.' दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, 'राज्यपालांना फक्त एकच काम आहे. ते म्हणजे, लोकांच्या सुरक्षेवर ध्यान देणे आणि खोऱ्यात शांतता प्रस्थापित करणे. मात्र, दुर्दैवाने प्रशासन तेही करण्यात अपयशी ठरत आहे.'
मोहीम फत्ते करून परतताना जवान.
7 terrorists killed by Indian Army in Kashmir

Post a comment

 
Top