'३० डिसेंबर' पुस्तकातील कथा वाचून कुटुंबीयांनी घडवली भेट
कन्नूर- केरळचे नारायणन नांबियार (९०) व पत्नी सारदा (८६) यांची ७२ वर्षांनी भेट झाली. या दोघांचा विवाह १९४६ मध्ये झाला होता. त्याच वर्षी कन्नूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन झाले.
लग्नानंतर ८ महिन्यांत नारायणन व त्यांच्या वडिलांना तुरुंगवास झाला. ८ वर्षांनी ते तुरुंगातून सुटले तेव्हा कळले की, सारदाचे लग्न तिच्या घरच्यांनी दुसऱ्याच कोणाशी तरी लावून दिले आहे.
त्यानंतर नारायणन यांनीही दुसरे लग्न केले. आता त्यांना ७ मुले आहेत. नारायणन यांची पुतणी सांथाने या कथेवर ३० डिसेंबर नावाचे पुस्तक लिहिले. ते वाचून सारदाचा मुलगा भार्गवन यांनी सांथाची भेट घेतली. त्या दोघांची भेट घडवून आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुटुंबीयांनी कन्नूरच्या परसिनिकदावू गावात दोघांची भेट घडवली. यावेळी दोघांनी गतकाळातील आपली सुख-दु:खे सांगितली. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सारदाने नारायणन यांची भेट घेतली तेव्हा तिच्या नजरा जमिनीवर खिळल्या होत्या, तर नारायणन यांनी जेव्हा तिचा निरोप घेतला तेव्हा सारदाने फक्त खाली मान घालून होकार दिला.

Post a Comment