0
शेतकरी वर्गात प्रशासनाच्या धिम्या कारभाराबाबत तीव्र नाराजी

नांदेड- पैनगंगा नदीपात्रात १५ दिवस बेमुदत आंदोलन केल्यानंतर मंजूर करण्यात आलेले २ दलघमी पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार यवतमाळचे पाणी गांजेगाव बंधाऱ्यापर्यंत पोहोचले, परंतु नांदेड जिल्ह्याचे मंजूर ७ दलघमी पाणी अद्याप बोरीच्या पुलापर्यंतही आले नसल्याने शेतकरी वर्गात प्रशासनाच्या धिम्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तत्काळ पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडून दिलासा द्यावा, अन्यथा नाइलाजास्तव शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसण्याची वेळ येईल, असा इशारा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी दिला आहे.

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदीकाठावरील गावकऱ्यांची कामधेनू आहे. या नदीमध्ये गेल्या ४ महिन्यांपासून पाणी नसल्यामुळे दोन्ही भागातील ९० गावच्या शेतकऱ्यांनी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन केले होते. आंदोलनाच्या १५ व्या दिवशी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी ७ दलघमी आणि यवतमाळच्या जिल्हाधिकारी यांनी ५ दलघमी पाणी सोडण्यास मंजुरीचे पात्र आंदोलनकर्त्यांना देऊन तशा सूचना इसापूरचे कार्यकारी अभियंता कुरुंदकर यांच्यापर्यंत आदेश पत्राने पोहोचवण्यात आले होते. यास जवळपास ९ दिवस लोटले असून, यवतमाळ जिल्ह्याचे पाणी पैनगंगा नदीच्या गांजेगाव पुलापुढे गेले असताना देखील नांदेड जिल्हाधिकारी यांनी मंजूर केलेले ७ दलघमी पाणी अद्यापही आंदोलन केलेल्या नदीपात्रात पोहोचले नाही. त्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी यांनी मंजुरीच्या दिलेल्या पत्रानुसार पाणी सोडण्यात कुचराई केली की काय किंवा पैनगंगा नदीपात्रात सोडण्यासाठीचे पाणी अन्यत्र वळवण्यात आले का? अशी शंका शेतकरी वर्गातून उपस्थित केली जात आहे. मराठवाड्याचे मंजूर पाणी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे सहस्रकुंडपर्यंत पोहोचवण्यात यावे अन्यथा नदीकाठावरील गावकऱ्यांना पुन्हा पाण्यासाठी वेगळे आंदोलन करावे लागणार आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया नदीकाठावरील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

पाणी पळसपूरपर्यंतही पोहोचलेच नाही
विदर्भाच्या भागातून पैनगंगा नदीपात्रात आलेले पाणी अजूनही पळसपूरपर्यंत पोहोचले नाही. दरम्यान गांजेगाव बंधाऱ्याखालील शेतकऱ्यांनी निवेदन देऊन गेट काढण्याची मागणी केल्याने गुरुवारी दुपारी दोन गेट उघडण्यात आले आहे. तथापि, पाणी न पोहोचल्याने पळसपूर, कोपरावासीयांना पुन्हा पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेता तत्काळ मराठवाड्याचे पाणी नदीपात्र सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
The 7 Dalgamic water released from Marathwada has not come in Penggang Dam

Post a Comment

 
Top