स्पोर्ट्स डेस्क - ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 7 बाद 191 झाली आहे. भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी पहिल्याच चेंडूवर संपुष्टात आला. मोहम्मद शमी पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने भारताचा पहिला डाव 250 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी करत भारताला सामन्यात पिछेहाट होण्यापासून रोखले.
ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर इशांतने फिंचला बाद केले. त्यानंतर अश्विनने एकापाठोपाठ हॅरीस, ख्वाजा आणि मार्शला बाद करत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. त्यानंतर बुमराहने हँड्सकोंबला बाद करत चांगली भागीदारी मोडून काढली. त्यापाठोपाठ इशांतनेही पेनला बाद करत कांगारुंना आणखी एक धक्का दिला. त्यानंतर बुमराहने कमिन्सला बाद करता सातवी विकेट मिळवून दिली.
पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता न आल्याने भारताची डावात पिछेहाट होणार असे वाटत होते. पण गोलंदाजांनी भारताला पुन्हा एकदा पुनरागमनाची संधी निर्माण करून दिली आहे. ऑस्ट्रेलिया अजूनही 59 धावांनी पिछाडीवर आहे. तसेच त्यांचे ७ फलंदाज तंबूत परतले आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशी लवकर विकेट मिळवून कांगारुंना पुन्हा आव्हान देण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

Post a Comment