0
15 फूट खोल तळघर, डोळ्यावर पट्टी

मुंबई - होय, मी तर तिला माफ केलेय... अखेर मी तिला शिक्षा देणारा कोण? शिक्षा देणाऱ्यापेक्षा माफ करणारा मोठा असतो... ती जिथे कुठे असेल तिथे तिने आनंदात राहावे हीच आता माझी प्रार्थना आहे. मला फसवण्यात आले आहे. पाकिस्तानविरोधात काही करावे, अशी माझी मुळीच इच्छा नव्हती. मी तिथे मुलीच्या मदतीसाठी धाव घेतली होती. घरचे लोक लग्नासाठी बळजबरी करत अाहेत, मला मदत कर, अशी विनवणी तिने केली होती. तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगात मदत करण्याचे मी निश्चित केले व तिथे पोहोचलो. मात्र, तिथे गेल्यावर माझी फसवणूक झाली. ज्या लोकांनी मार्ग दाखवला त्यांनीच त्यावर काटे अंथरलेले होते. अशा स्थितीत पाकिस्तानच्या अहाटमधील एका लॉजमधून अटक करण्यात आली तेव्हा भारतात पुन्हा परत जाणे कठीण असल्याची जाणीव झाली.

मला ठेवलेल्या अंधाऱ्या खोलीत दिवस की रात्र याची कोणतीच कल्पना येत नव्हती. जमिनीखाली १५ फूट खोल तळघरात डांबून ठेवले होते. ना पोटाला पुरेसे अन्न ना कोणती सुविधा होती. रात्रंदिवस पडून राहायचो व सुटकेसाठी प्रार्थना करायचो. यादरम्यान पाकिस्तानी अधिकारी कधीही येत व चौकशीसाठी घेऊन जात. मला आजही आठवते, हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत आठवडाभर चाैकशी करण्यात आली. संपूर्ण आठवडा उभा होतो.

जिथे कुठे नेले जाईल तिथे डोळ्यावर पट्टी बांधलेली असायची. थोडी हालचाल केली तरी मारहाण व्हायची. आठवडाभरानंतर पट्टी काढण्यात आली तेव्हा खरं सांगू, अधिकारी समाेर असतानाही मला धबधबा व पर्वत दिसत असल्याची अनुभूती होत होती. आठवडाभर झोप होऊ न शकल्यामुळे दृष्टिभ्रम झाला होता. दिवसामागून दिवस गेले, महिने उलटले, मात्र परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. अधिकाऱ्याने यायचे, बदडायचे अन् निघून जायचे. यात कोण्या कैद्याशी मैत्री नाही नि कोणाशी बोलणे. काय सांगू, याच्यामुळे आणखी त्रास सहन करावा लागला असता. नवा दिवस नव्या त्रासाने उगवत होता. ईदला थोडा दिलासा मिळे. तुरुंगाच्या कँटीनमध्ये शेवयांची खीर केली जायची, मात्र त्यानंतरचे दिवस नेहमीप्रमाणे कडवट असायचे.
मी निर्दोष आहे याची जाणीव पाक अधिकाऱ्यांनाही होती. तू आमच्या हातात आलेले एक चांगले फळ आहे. तू कोणताही गुन्हा केलेला नाहीस हे आम्हाला माहीत आहे. मात्र, तू एक हिंदुस्थानी आहेस, त्यामुळे तू इथे आहेस, असे अधिकारी बोलायचे. अशा बोलण्यातून धीर एकवटायचो. यावर मी त्यांना म्हणत असे, हाच तुमचा न्याय असेल तर माझ्यासाठी मदतीचा एखादा मार्गही असेल. सहा वर्षांत एक-एक दिवस, एक-एक क्षण घालवणे खडतर होते. मात्र, एक ना एक दिवस मी नक्की मायभूमीत, आईकडे परतेन, असा मला विश्वास होता.

असे असले तरी मी पाकिस्तानात वैध पद्धतीने जाण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानच्या उच्चायुक्ताकडे दहा महिने अधिकृतरीत्या व्हिसासाठी पाठपुरावा केला. व्हिसा मिळत नव्हता. यादरम्यान मला चिथावण्यात आले. व्हिसाच्या भानगडीत पडू नको, अफगाणिस्तानमार्गे ये, असे सांगण्यात आले. भावनेच्या भरात मी मेंदूऐवजी हृदयाची साद ऐकली आणि जे व्हायला नको होते ते झाले.

या सहा वर्षांत प्रार्थना करण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हते. सुटकेनंतर अटारी-वाघा सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने उभा होतो तेव्हा क्षणाक्षणाला माझी स्पंदने वाढत होती. दरवाजा उघडल्यानंतर समोर पाहतो तर माझी आई, पप्पा आणि भाऊ उभे असलेले दिसले. सहा वर्षांनंतर त्यांना डोळे भरून पाहत होतो. मी हा प्रसंग शब्दांत व्यक्त करू शकत नाही. सीमा पार करून भारतात पाऊल ठेवले तेव्हा मनावरील ओझे गळाले, बरे वाटले. माझ्या आयुष्यातील हा काळा अध्याय मी कधीही विसरू शकत नाही. मात्र, मला आई-वडील, भावासाठी आणि ज्यांनी माझ्यासोबत शिक्षा भोगली त्यांच्यासाठीही पुढे जायचे आहे. माझ्या भविष्यातील सोनेरी स्वप्ने मला खुणावत आहेत.

शिक्षा पूर्ण करूनही अनेक कैदी पाकिस्तानच्या तुरुंगांमध्ये

हमीद अन्सारीच्या सुटकेमुळे भारत पाकिस्तानमधील कैद्यांच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या भारतातील विविध कारागृहांत ५९४ पाकिस्तानी कैदी असून पाकिस्तानी तुरुंगांत ४७२ भारतीय कैदी विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही बाजूंचे अनेक बंदी आपली शिक्षा पूर्ण केल्यानंतरही केवळ त्यांच्या 'नॅशनल आयडेंटिफिकेशन'ची प्रक्रियाच पूर्ण न होऊ शकल्याने अजूनही परक्या मुलखातील डिटेन्शन सेंटरमध्ये खितपत पडले आहेत.


मे २०१५ मध्ये कराची मध्यवर्ती कारागृहातून तीन वर्षांची शिक्षा भोगून 'भारत' नावाचा एक बंदी बाहेर पडणार होता. मात्र, साडेतीन वर्षांनंतरही तो तुरुंगातच आहे. कारण तो भारतीय आहे की नाही, हे ठरवणारी नॅशनल आयडेंटिफिकेशनची प्रक्रियाच पूर्ण होऊ शकली नाही. अवघ्या विशीत असलेला भारत हा मनोरुग्ण असल्याने त्याला स्वत:बद्दल किंवा स्वत:च्या कुटुंबाबद्दल कोणतीही माहिती संबंधित यंत्रणांना देता येत नाही, हा त्याच्या सुटकेतील सर्वात मोठा अडथळा आहे. पाकिस्तानातील संबंधित यंत्रणेनेच त्याला भारत हे नाव दिले आहे.


पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसी या संस्थेच्या वतीने नवी दिल्लीच्या इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये ३१ ऑगस्ट २०१८ रोजी आयोजित केलेल्या राऊंडटेबल कॉन्फरन्समध्ये लीगल एड सोसायटीच्या सदस्यांनी दिलेली ही माहिती चक्रावून टाकणारी आहे. मात्र, हे वास्तव असून ही केवळ भारतची कथा नाही, तर अशा पद्धतीने अनेक कैदी दोन्हीकडील तुरुंगांत खितपत पडले आहेत. भोपाळच्या डिटेन्शन सेंटरमध्ये असलेल्या इम्रानचीही साधारण हीच कथा आहे. आपल्या नात्यातील एका भारतीय महिलेशी लग्न करून चार वर्षे भारतात विनापरवाना राहिल्याचा इम्रानवर आरोप होता. बनावट पासपोर्ट बनवताना इम्रानला अटक करण्यात आली होती. भोपाळच्या कारागृहात १० वर्षांची शिक्षा पूर्ण करून इम्रान सहा महिन्यांपूर्वी तुरुंगातून सुटला. मात्र, मध्य प्रदेशमधील निवडणुकीच्या धामधुमीत त्याच्या नॅशनल आयडेंटिफिकेशनची प्रक्रियाच पूर्ण होऊ शकली नाही.

काय आहे नॅशनल आयडेंटिफिकेशन?
भारताच्या परराष्ट्र खात्यातील एका सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या एकमेकांच्या ताब्यात असलेल्या कैद्यांना कायदेशीर मदत मिळावी यासाठी दोन्ही देशांदरम्यान 'कौन्सिलर अॅक्सेस अॅग्रीमेंट' हा करार झालेला आहे. त्यानुसार परराष्ट्र मंत्रालय अशा कैद्यांना कायदेशीर लढ्यासाठीची मदत करत असते. मात्र, नॅशनल आयडेंटिफिकेशन हा मुद्दा सिटिझनशिप अॅक्टशी संबंधित असून तो केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अख्यत्यारीत येतो. ज्या कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली असेल, परंतु त्यांचे राष्ट्रीयत्व संशयास्पद आहे, अशा कैद्यांची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून केंद्रीय गृह मंत्रालयाकडे येते. मग केंद्रीय गृह मंत्रालय परक्या देशाच्या ताब्यात असलेल्या त्या कैद्याची माहिती संबंधित राज्य सरकारकडे पाठवते. राज्याच्या गृह खात्यातर्फे संबंधित कैद्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्याच्याशी संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाते. तो कैदी खरोखरच भारतीय आहे की नाही, याची खातरजमा केली जाते. तसा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला जातो. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून संबंधित कैद्याच्या सुटकेची प्रक्रिया राबवली जाते.


देशाच्या सुरक्षेचा मुद्दा असल्याने ही प्रक्रिया खूपच संवेदनशीलपणे हाताळली जाते. त्याला काळाचे बंधन नसते. एखाद्या कैद्याचा पासपोर्ट असेल तर त्या आधारे त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचणे सोपे जाते, मात्र कैदी जर मनोरुग्ण किंवा मूकबधिर असेल, तर माहितीअभावी आमचाही नाइलाज होतो, असेही हा अधिकारी म्हणाला.
hamid ansari Interview in divya marathi

Post a Comment

 
Top