0
शिवम म्हणतो, मला ऑलराउंडर म्हणूनच आपली ओळख निर्माण करायची आहे.

मुंबई- मुंबईचा २५ वर्षीय शिवम दुबे कालपरवा कुणाच्या खिजगणतीत नव्हता. आज आयपीएलमध्ये २० लाख या पायाभूत किमतीवरून त्याच्यासाठी पाच कोटींपर्यंत बोली गेली आणि अचानक शिवम चर्चेत आला. त्याच्यावर राॅयल चॅलेंजर बंगळुरू संघाने पाच काेटींची बाेली लावली. तसेच जयदेवला ८ काेटीमध्ये राजस्थानने विकत घेतले.

खरंतर दोन दिवसांपूर्वी बडोद्याच्या स्वप्निल सिंगला पाच षटकार मारल्यापासून कोण हा शिवम दुबे? अशी आयपीएल लिलावासाठी जमलेल्या जाणकारांमध्ये चर्चा होती. अंधेरीत राहणाऱ्या शिवमच्या क्रिकेट स्वप्नपूर्तीची वाट त्या पाच षटकारांनी दृष्टीक्षेपात आणली. आयपीएलच्या या मोठ्या किमतीच्या लिलावात त्या पाच षटकारांचा प्रभाव मोठा असल्याचे शिवम दुबे म्हणत होता. बडोद्याच्या स्वप्निल सिंगला एकाच षटकात पाच षटकार मारल्यानंतर सिंगने नंतरचा चेंडू वाइड टाकला, नाहीतर तोही षटकार ठोकला असता असं शिवम आत्मविश्वासाने म्हणत होता.

पंडित म्हणत होते, 'स्वत:चा तबेला असल्याने वडील त्याला दूध व अन्य खुराकही देत होते. पण त्यावेळी शिडशिडीत बांधा नव्हता. वडिलांना तो 'ओव्हरवेट' होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितले.' आता उंचीही खूपच वाढली आहे. त्यावेळी मी व शिक्षक नीलेश त्याला मैदानावर फेऱ्या मारायला लावायचे.

गुरुमंत्र महत्त्वाचा :
प्रशिक्षक चंद्रकांत पंडित सरांनी मला दिलेला गुरुमंत्र अजूनही मी जपत आहे. शाळेत गोलंदाजांची कमतरता होती म्हणून त्यांनीच मला अधिक गोलंदाजी करण्याची संधी दिली. गाइल्स ढाल स्पर्धेत हंसराज मोरारजी हाय स्कूल तर्फे खेळताना मी सलग पाच सामन्यात ५-५ बळी मिळवले. मात्र फलंदाजीही माझी प्रथम आवड असल्याने त्यावरही लक्ष्य केंद्रित केले,असे शिवम म्हणाला.

शिवम म्हणतो, मला ऑलराउंडर म्हणूनच आपली ओळख निर्माण करायची आहे. आयपीएल हे माझे एकमेव लक्ष्य नाही. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून ठसा उमटवायचा आहे. आयपीएल हे त्या मार्गाचे प्रवेशद्वार आहे. माजी आमदार व खासदार रमेश दुबे यांचा शिवम पुतण्या. काकांनी आणि वडिलांनी मी क्रिकेटपटू व्हावे म्हणून खूपच मेहनत घेतली. त्यामुळेच येथवर पोहोचू शकलो, असे तो अभिमानाने सांगतो.

शिवमचे कुटुंब मूळचे बनारसचे. मुंबईत दुग्ध व्यवसायात दुबे कुटुंबीयांनी आपले नाव कमावले. मात्र शिवम या व्यवसायाशी समरस होऊ शकला नाही. क्रिकेट हाच त्याचा ध्यास आणि श्वास राहिला. शिवमच्या अंगातील रग व मेहनत घेण्याची वृत्ती पाहिली तर कपिलदेवची आठवण येते. त्याच्याचसारखी देहयष्टी, रांगडा स्वभाव आणि चेंडू फटकावण्यासाठी असलेली अंगातील प्रचंड ताकद,असेही प्रशिक्षक म्हणाले.

फटकेबाजी शैली सरस
शिवमचे मूळ प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, ज्यांनी विदर्भाला रणजी विजेते बनवण्याची किमया केली. ते म्हणत होते, शिवममध्ये नैसर्गिक गुणवत्ता आहे. हंसराज मोरारजी शाळेत खेळायचा. माझे प्रशिक्षण नेट ही तेथेच होते. सरावात यायचा तेव्हा गुबगुबीत होता. १२ वर्षांचा होता. पण त्यावेळी हा तो फटकेबाजी अशीच करायचा. अचूक टायमिंग साधायचा. शिवमचे वडील रमेश दुबे म्हणायचे, याला भरपूर सकस आहार देईन. मात्र त्याला तडाखेबाज फटकेबाजी करणारा खेळाडू तयार करा. शिवमकडे प्रचंड ताकद आहे. मात्र तो स्वैर फटकेबाजी करीत नाही. त्याच्याकडे फलंदाजीचे उत्तम तंत्रही आहे असेही पंडित म्हणाले.
special news about cricket player Shivam dubey

Post a comment

 
Top