0
भारत समर्थक विक्रमसिंघे यांच्याकडे देशाची सूत्रे शक्य, आज शपथ घेणार

कोलंबो- श्रीलंकेचे वादग्रस्त पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी अखेर शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्याच्या ५१ व्या दिवशी राजीनामा दिला. ते सर्वात अल्पकालीन पंतप्रधान ठरले. राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी २६ ऑक्टोबर रोजी रानिल विक्रमसिंघे यांना हटवून त्यांची नियुक्ती केली होती. पदावरून हटवण्यात आलेले रानिल विक्रमसिंघे आता रविवारी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतील.

सर्वोच्च न्यायालयाने सिरिसेना यांनी केलेली नियुक्ती घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट केल्यानंतर सिरिसेना यांनी आपला निर्णय स्थगित केला. युनायटेड पीपल्स फ्रीडम अलायन्सच्या (यूपीएफए) सदस्यांना त्यांनी राजीनाम्याची माहिती दिली. राजपक्षे यांची २६ ऑक्टोबर रोजी ही वादग्रस्त नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी सिरिसेना यांनी रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदावरून हटवले होते. त्यामुळे देशातील लोकशाहीवर अस्थिरतेचे संकट ओढवले होते. मात्र शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने ७३ वर्षीय राजपक्षे यांना पंतप्रधानपदावर राहू देण्यास नकार दिला. आता देशातील राजकीय अस्थैर्य संपुष्टात येईल. विक्रमसिंघे हे भारत समर्थक व चीनविरोधी असल्याचे मानले जाते. त्यांच्या नेतृत्वाचा भारताला फायदा होऊ शकतो.

सुरुवात: विक्रमसिंघेंना पदावरून हटवले
याच वर्षी राष्ट्रपती सिरिसेना यांनी विक्रमसिंघे यांना पदावरून हटवून महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान पदावर नियुक्ती केली होती. सिरिसेना यांच्या या निर्णयावर राजकीय क्षेत्रातून प्रचंड टीका तसेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. राष्ट्रपतींकडे पंतप्रधानांना हटवण्याचे अधिकार नाहीत, असा दावा विक्रमसिंघे यांनी केला होता. मला खासदारांचा पाठिंबा आहे. बहुमत आहे. त्यानंतर राजपक्षे यांनी सत्तेवर असल्याचा दावा करून पेच वाढवला होता. देशाला संघर्षाची स्थितीत जाऊ द्यायची इच्छा नव्हती. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला, असे सिरिसेना यांनी म्हटले होते. हा वाद देशभरात वाढला.

निवाडा : संसद भंग करणे कोर्टाने ठरवले बेकायदा
राष्ट्रपती सिरिसेना यांनी १० नोव्हेंबर रोजी संसदेला विसर्जित केल्याचे जाहीर केले. त्यास विक्रमसिंघे व त्यांच्या समर्थकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती सिरिसेना यांचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिला होता. नियोजित कालावधीच्या दोन वर्षे अगोदर निवडणूक घेण्याचा निर्णयदेखील बेकायदा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. तत्पूर्वीही एका न्यायालयाने राजपक्षे यांच्या पंतप्रधान पदावरील नियुक्तीस रोखले होते. संसदेतही राजपक्षे यांच्या विरोधात दोन वेळा अविश्वास प्रस्ताव पारित केला गेला. बुधवारी विक्रमसिंघे यांना पंतप्रधान मानून संसदेत त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.

त्रिकोणी रणनीती : राजपक्षे, विक्रमसिंघे, सिरिसेना
राजपक्षे २००५ ते २०१५ पर्यंत श्रीलंकेचे राष्ट्रपती होते. विशेष म्हणजे राजपक्षे यांच्या सरकारमध्ये सिरिसेना मंत्री पदावर होते. सिरिसेना यांनी २०१५ मध्ये विक्रमसिंघे यांच्यासोबत आघाडी केली. दोघांनी निवडणुकीत राजपक्षे यांना पराभूत केले. सिरिसेना व विक्रमसिंघे यांच्या पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले होते. नंतर दोघांतील संबंध बिघडले. सिरिसेना यांनी विक्रमसिंघे यांना पंतप्रधान पदावरून हटवले. विक्रमसिंघे यांनी बँकेचे बाँड विकावे म्हणजे ११०० कोटी रुपयांची हानी झाली, असे सिरिसेना यांनी सांगितले. एक कॅबिनेट मंत्री माझ्या हत्येचा कट करत असल्याचा आरोप विक्रमसिंघे यांनी केला होता.The country's formula now is run by India's supporters Vikramsinghe

Post a comment

 
Top