पाेलिस पथक जळगावात मालेगाव छावणी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा कसून तपास
जळगाव- जळगाव जिल्ह्यातून बनावट पावत्यांचा वापर करून सुमारे ५० लाखांच्या वाळूचा उपसा करून तिची वाहतूक करण्यात अाली हाेती. मालेगाव येथे हे वाळूचे १० ट्रक जप्त केल्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारातून हे ट्रक वाळूमाफियांनी पळवून नेले हाेते. या प्रकरणी शनिवारी (दि.२९) मालेगाव छावणी पोलिस ठाण्याचे पथक जळगावात दाखल झाले. पथकाने खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांचा लेखी जबाब घेतला. वाळूमाफियांनी सादर केलेल्या २४ पावत्या बनावट असल्याचा जबाब चव्हाण यांनी दिला आहे.
मार्च २०१८मध्ये अमळनेर तालुक्यातील खापरखेडा येथील गटातून उपसा करून वाळूची वाहतूक सुरू होती. नाशिक जिल्ह्यात वाळू पाठवली जात असताना मालेगावचे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी १० ट्रक अडवले होते. हे ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात उभे असताना वाळू तस्करांनी रात्रभरातून पळवून नेले. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. तहसीलदार देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मालेगावच्या छावणी पोलिस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पळवून नेलेले ट्रक पुन्हा जप्त केले होते.
दरम्यान, या घटनेनंतर जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन पदाधिकारी नीलेश सुधाकर पाटील व रमेश कटाळे यांनी अपर जिल्हाधिकारी राऊत यांची भेट घेऊन ट्रक सोडवण्यासाठी प्रयत्न केले. यात पाटील यांनी राऊत यांना धमकी दिली होती. त्यानंतर नीलेश पाटील व कटाळे यांची नावे गुन्ह्यात वाढवण्यात आली होती. दोघांनी सादर केलेल्या पावत्या बनावट असल्याच्या संशयावरुन त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचे कलम लावण्यात आले. पाटील व कटाळे यांनी सादर केलेल्या पावत्या खऱ्या आहेत की बनावट? याची चौकशी करण्यासाठी शनिवारी छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले यांचे पथक जळगावात दाखल झाले. त्यांनी खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांचा जबाब घेतला. या पावत्या बनावट आहेत. कलर झेरॉक्सवरून त्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या क्रमांकाच्या खऱ्या पावत्यांवरून जानेवारी २०१८मध्येच वाळू उपसा झाला असल्याचा जबाब चव्हाण यांनी दिला आहे. चव्हाण यांचा जबाब घेऊन पथक पुन्हा मालेगाव येथे परतले आहे. या पावत्या कशा व कुठे तयार झाल्या? या तपासाचे अाव्हान अाहे.

Post a Comment