0

जगभरातील साहित्य एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा मोठा प्रकल्प संचालक डॉ. धर्मराज वीर यांनी हाती घेतला आहे.


औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्र (केआरसी) अर्थात मध्यवर्ती ग्रंथालयाने संशोधन करणाऱ्यांसाठी संदर्भ ग्रंथांचे दालन नव्या पद्धतीने खुले करून दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यावर पीएचडी करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे दोन्ही युगपुरुषांचे जगभरातील साहित्य एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा मोठा प्रकल्प संचालक डॉ. धर्मराज वीर यांनी हाती घेतला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात महात्मा गांधींचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. जगातील १ कोटी ४४ लाख ७३ हजार ७०९ शोधप्रबंधांपैकी ५००९ ऑनलाइन शोधप्रबंध गांधींवर असून ते ग्रंथालयाच्या वेब पोर्टलवर उपलब्ध आहेत.

सर्वसाधारणपणे इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासनशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भाषाशास्त्र आदींसह मानव्य विद्या शाखेतील विविध विषयांतील देशभरातील संशोधकांनी बाबासाहेब आणि गांधींवर सर्वाधिक संशोधन केले आहे. या विद्यापीठातदेखील यापेक्षा वेगळे चित्र नाही. त्यामुळे डॉ. वीर यांनी दोन्ही महापुरुषांनी लिहिलेले अथवा त्यांच्यावर लिहिले गेलेले सर्व प्रकारचे ई-रिसोर्सेस उपलब्ध करून देण्याची मोहीम हाती घेतली आहे. महात्मा गांधी यांच्यावरील साहित्य उपलब्ध करून देण्यात त्यांना यश आले आहे. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांनी गांधींवरील काम पूर्ण केले. जगभरातील १ कोटी ४४ लाख ७३ हजार ७०९ पीएचडी शोधप्रबंधांपैकी ५००९ शोधप्रबंध महात्मा गांधी यांच्यावरील असून ते आता येथील संशोधकांना एका क्लिकवर पाहता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील जगभरात झालेले संशोधनही उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. ६ डिसेंबरपासून या कामाला प्रारंभ झाला असून १४ एप्रिल २०१९ पर्यंत म्हणजेच बाबासाहेबांच्या जयंतीपर्यंत हे काम पूर्ण होईल. या शोधप्रबंधांसह गांधींवरील १२ मराठी पुस्तके, हिंदी-२५, इंग्रजी-१५२, गुजराती भाषेतील १५ तर गांधींवर आणि गांधींनी लिहिलेली ५२ ग्रंथही वेब पोर्टलवर उपलब्ध करून दिले आहे. गांधींनी लिहिलेली ६ पुस्तके ऑडिओ स्वरूपात आहेत. 'माझे सत्याचे प्रयोग' आत्मकथाही अशाच स्वरूपात आहे. मॅन ऑफ द मिलेनियमसह काही सिनेमाही लिंक करून दिलेले आहेत.

गांधींवरील ओपन थिसिस सर्वाधिक उपलब्ध 
महात्मा गांधी यांच्यावर लिहिण्यात आलेल्या शोधप्रबंधांमध्ये सर्वाधिक २ हजार १२४ ओपन पीएचडी शोधप्रबंध असून, ते सध्या उपलब्ध आहेत. त्याशिवाय (ओएटीडी) ओपन अॅक्सेस थिसिस अँड डाटाबेसमध्ये ४७ लाख ११ हजार ९३० शोधप्रबंधांपैकी गांधींवरील २८ शोधप्रबंध ग्रंथालयाने शोधून त्याची लिंक वेब पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे. (एनडीएलटीडी) नेटवर्क डिजिटल लायब्ररी ऑफ थिसिस अँड डेझर्टेशनअंतर्गत जगात ५२ लाख २५ हजार ६०४ शोधप्रबंध उपलब्ध आहेत. त्यापैकी गांधींवरील शोधप्रबंध ६२१ असून तेही शोधले आहेत. शोधगंगा या संकेतस्थळावर २ लाख १० हजार ५४८ शोधप्रबंध असून त्यापैकी गांधींवरील १ हजार ३६४ शोधप्रबंध संशोधकांसाठी उपलब्ध आहे.

असे पाहा गांधींवरील साहित्य : 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या Bamu.ac.in या संकेतस्थळावरील होमपेजवर KRC क्लिक करावे. त्यानंतर E-Resourses ला क्लिक केले तर लिटरेचर ऑन महात्मा गांधी अशी लिंक ओपन होते. यामध्ये विविध लिंक दिलेल्या आहेत. आपल्याला हवे त्याप्रमाणे लिंकला टॅप करून माहिती घेता येईल.

आता बाबासाहेबांवरील संशोधन संकलित करू 
महात्मा गांधी यांच्यावर केलेली भाषणे, महात्मा गांधी यांनी केलेली भाषणे, त्यांनी स्वत: लिहिलेली पुस्तके, त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके, ई-बुक्स, ई-थिसिस, ऑडिओ बुक्स, चित्रपट आदींसह हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती भाषेतील सर्व ई-ग्रंथसंपदा एकत्र उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाबासाहेबांवरील साहित्य आम्ही १४ एप्रिलपर्यंत ऑनलाइन उपलब्ध करून देऊ. - डॉ. धर्मराज वीर, संचालक, ज्ञानस्रोत केंद्र KRC Central Liabrary in Aurangabd

Post a Comment

 
Top