0
२१ राज्यांत लसीकरण- देवी आणि पोलिओनंतर या आजारांच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक आरोग्य संघटनेचा पुढाकार
50 thousand children die every year due to gover rubella
 • औरंगाबाद- दरवर्षी गोवर विषाणूमुळे जगभरात १ लाख बालकांचा मृत्यू ओढवतो. त्यात एकट्या भारतात ५० हजार बालकांना जीव गमवावा लागतो. रुबेला विषाणूमुळे वारंवार गर्भपात होणे, मेलेले मूल जन्मणे असे प्रकार घडतात. तसेच भारतात जन्माला येणाऱ्या १ लाख मुलांत १५० मुल गतिमंद किंवा कोणत्या न कोणत्या आजारांनी बाधित होतात. त्यामुळे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम एवढ्या मोठ्या पातळीवर हाती घेण्यात आली आहे. देवी आणि पोलिओनंतर या आजारांच्या निर्मूलनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे समन्वयक डॉ. मुजिब सय्यद यांनी दिली. महाराष्ट्रात २७ नोव्हेंबरपासून ही मोहीम हाती घेण्यात आली. युद्धपातळीवर ही मोहीम का सुरू झाली, हे जाणून घेण्यासाठी दिव्य मराठी प्रतिनिधीने तज्ज्ञांशी संवाद साधला. यानंतर समोर आलेली कारणे पाहता या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित होते.
  रिअॅक्शन येणे स्वाभाविक :
  कोणत्याही नव्या प्रकल्पाबद्दल संभ्रम असतो. लोकांत भीती असते. मात्र, जेव्हा त्याचे फायदे दिसू लागतात तेव्हा यश मिळते. गोवर-रुबेला लसीकरणादरम्यान काही बालकांना रिअॅक्शन झाली. १३ लाख बालकांत ८ ते १० जणांना रिअॅक्शन येणे स्वाभाविक होते. मात्र, सर्व बालके सुरक्षित आहेत, असे डॉ. लाळे म्हणाले.
  गोवरचे दुष्परिणाम असे
  ९० टक्के मुलांना गोवर निघतो. ताप येतो, अंगावर पुरळ उठते, काही वर्षे या पुरळाचे डाग शरीरावर दिसतात. मात्र, साधारण ८ दिवसांत गोवर बरा होतो. त्यानंतर बालकांत अ जीवनसत्त्वाची कमतरता येते. यामुळे अंध्यत्व येते. याशिवाय न्यूमोनिया आणि डायरिया होतो. याशिवाय ६ वर्षांपर्यंतच्या काळात (सब अॅक्युट सब क्युलटिंग पॅन इन्सेप्लाटीस) हा मेंदूचा आजार होतो. यात बालकांचा मृत्यू होतो. जगभरात यामुळे दरवर्षी १ लाख बालके दगावतात. पण, त्यातील ५० हजार एकट्या भारतात मृत्युमुखी पडतात.
  मुलींत रुबेला विषाणूच्या बाधेचे प्रमाण अधिक
  रुबेला विषाणूचा बाधा विशेषत: मुलींमध्ये दिसून येते. मुलगी या विषाणूने बाधित असेल तर वारंवार गर्भपात होतो. अथवा बाळ मृत जन्माला येते. जर बाळ जन्माला आलेच तर त्यात अनेक दोष अढळतात. (कंटेनायटल रुबेला सिंड्रोम) हा आजार भारतात १ लाख बालकांत १५० जणांत दिसतो. यामुळे बाळ मतिमंद, बहिरे, हृदयाची झडप नसणे, छिद्र असणे, अंधत्व किंवा रक्ताचे आजारही दिसून येतात.
  शहरात २९ % लसीकरण
  शहरातील १२१ शाळांमध्य्ये लसीकरणाचे प्रमाण केवळ २९ टक्के आहे. ४ लाख ८१ हजार ६१६ पैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ९६८ बालकांना लस देण्यात आली. उर्दू माध्यमांच्या शाळा व अल्पसंख्याक भागात लसीकरणाला अफवांमुळे विरोध होत आहे. डॉ. शोहेब हाश्मी म्हणाले, ही लस पुण्यात तयार केली जाते व ७० देशांमध्ये पुरवठा केला जातो. लसीकरणामुळे कोणताही धोका होत नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाविलंब पाल्यांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
  मुस्लिम भागात लसीकरणासाठी एमआयएमचा पुढाकार
  लसीकरणाला काही भागातील प्रतिसाद अत्यल्प आहे. काही शाळांत १ टक्काच मुलांनी लस घेतली आहे. या भागातील प्रतिसाद वाढावा यासाठी महापौर, आयुक्तांनी एमआयएमची मदत घेण्याचे ठरवले. मंगळवारी आमदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते जमीर कादरी, गटनेते नासेर सिद्दिकी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना आवाहनही केले. स्थानिक डॉक्टरांशी चर्चा तसेच या विषयाचा अभ्यास केल्यानंतर आपण हे आवाहन करत असल्याचे इम्तियाज यांनी सांगितले.
  समूळ उच्चाटन हाच प्रमुख उद्देश
  देवी आणि पोलिओनंतर या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट जागतिक आरोग्य संघटनेने ठेवले आहे. भारतात पोलिओचा शेवटचा रुग्ण २०११ मध्ये अाढळला होता. त्याप्रमाणेच ही मोहीम यशस्वी करून बालमृत्यू आणि कायमचे आजारांना आळा घालायचा आहे. अफवांमुळे मोहिमेत काही अडथळे निर्माण झाले होते, पण, आता उद्दिष्टपूर्ती होण्याच्या मार्गावर आहे. - डॉ. मुजिब सय्यद, समन्वयक जागतिक आरोग्य संघटना
  पोलिओच्या तुलनेत तिप्पट मोठी मोहीम
  देशात आजवर सर्वात मोठी लसीकरण मोहीम म्हणून पल्स पोलिओकडे पाहिले जात होते. मात्र, गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण केले जात असल्याने ही मोहीम तिप्पट मोठी होती. अफवांमुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, यातून सर्व जण बाहेर पडले आहेत. प्रत्येक व्यक्ती दररोज २०० विद्यार्थ्यांना लसीकरण करत आहे.
  - डॉ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक
  २० दिवसांत ११. ७५ लाख बालकांना लस
  गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या वीस दिवसांतच औरंगाबाद विभागाने ११ लाख ७५ हजार ५१५ बालकांचे लसीकरण केले आहे. २६ लाख बालकांचे उद्दिष्ट असून महिनाअखेरीस २३ लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी व्यक्त केला. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४ लाख ५ हजार ९०० बालकांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते यांनी दिली. हे प्रमाण उद्दिष्टाच्या ५१ टक्के आहे, असेही ते म्हणाले. शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील बालकांना शासकीय, खासगी शाळा, अंगणवाडी तसेच शासकीय रुग्णालयात २७ नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लस दिली जात आहे. या मोहिमेत जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महानगरपालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत बालकांना लसीकरण केले जात आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील ७ लाख ९० हजार बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे.

Post a comment

 
Top