0
परदेशी महिलेने फेसबुकच्या माध्यमातून स्वारगेट येथील एका व्यावसायिकास तब्बल 47 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी नायजेरियन तरुणाला उत्तरप्रदेश येथून अटक केली.
 उसेन जोशुआ ओगागा ओघेने (वय 26, रा. नोयडा, उत्तर प्रदेश, मुळ रा. नायजेरिया) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत हरनिश हिंमितलाल राघनपुरीया (वय 59, शंकरशेठ रोड, स्वारगेट) यांनी फिर्याद दिली आहे.
 मिळालेल्या माहितीनुसार, राघनपुरीया यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांची फेसबुकवर ऍलिशिया स्मिथ या अमेरिकन महिलेशी ओळख झाली. तिने भारतात येऊन रिअल ईस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष राघनपुरीया यांना दाखविले. त्यासाठी ती भारतात येणार होती. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर बरोबर आणलेले सोने कस्टम अधिकाऱयांनी पकडल्याचे सांगून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी राघनपुरीया यांना विविध मोबाइल क्रमांकावरून फोन करून वेगवेगळय़ा बँक खात्यांमध्ये रक्कम भरण्यास सांगून एकूण 47 लाख 7 हजार 800 रुपयांची फसवणूक केली आहे. जुलै 2018 ते 6 सप्टेंबर 2018 या कालावधीत ही घटना घडली.
 या प्रकरणी ओघेने याला न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयकुमार जाधव यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मतकर यांनी त्याला 6 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले.

Post a Comment

 
Top