0
गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र व तामिळनाडूला महाराष्ट्रातून इथेनॉल पुरवठा होणार आहे.

 • पुणे- साखरेच्या किमती पडल्याने अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना इथेनॉलने यंदा दमदार हात दिला आहे. यंदाच्या १ डिसेंबर ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत महाराष्ट्रातून तब्बल ९३.५४ कोटी लिटर इथेनॉलची विक्री होणार आहे. या विक्रीतून महाराष्ट्राच्या साखर धंद्यात ४३ अब्ज रुपये येणार आहेत.
  एकाच राज्याकडून विक्री होणाऱ्या इथेनॉलच्या बाबतीत महाराष्ट्र देशातले क्रमांक एकचे राज्य ठरले. एवढेच नव्हे तर राज्याच्या इतिहासातली सर्वाधिक इथेनॉल विक्रीही यंदा होत आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्राने ४३.५६ कोटी लिटर इथेनॉल विक्रीचे करार तेल कंपन्यांसोबत केलेे. प्रत्यक्षात ३५.५० कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा महाराष्ट्राने केला होता. जून महिन्यात केंद्राने प्रथमच इथेनॉल खरेदीसाठीच्या किमती निश्चित केल्या. त्याचा मोठा फायदा साखर उद्योगाला होत अाहे.
  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या उत्पादित होणाऱ्या इथेनॉल खरेदीचे करार पेट्रोलियम कंपन्यांनी केले आहेत. थेट उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला सर्वाधिक ५९ रुपये १३ पैसे प्रतिलिटर असा भाव आहे. मात्र राज्यातले बहुतांश कारखाने साखर निर्मिती करणारे असल्याने थेट रसापासूनचे इथेनॉल उत्पादन कमी होते. थेट रसापासून तयार झालेले ६९ लाख लिटर इथेनॉल यंदा विकले जाणार आहे.
  'सी हेवी मोलँसिस'पासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. प्रती लिटर ४३.४६ रुपये दराने या प्रकारचे ६९ कोटी ३५ लाख लिटर इथेनॉल विकले जाणार आहे. तर २३ कोटी ५० लाख लिटर 'बी हेवी' इथेनॉल ५२.४३ रुपये दराने तेल कंपन्या विकत घेणार आहेत. या करारांमुळे इथेनॉल विक्रीतून येणाऱ्या पैशांमुळे साखर उद्योगाला यंदा दिलासा मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तेल कंपन्या पेट्रोलमध्ये ५ टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण करतात.
  खराब 'सहकारा'ला फटका
  इथेनॉल निर्मितीसाठी दहा हजार कोटींची योजना केंद्राकडून लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत. ही योजना लाभदायी असली तरी त्याचा लाभ महाराष्ट्रातल्या किती सहकारी साखर कारखान्यांना घेता येईल, यावर प्रश्नचिन्ह आहे. कारण केंद्राच्या मदतीमुळे व्याजात मोठी सवलत मिळणार असली तरी त्यासाठी आधी बँकांकडून कर्ज मिळवण्यासाठी कारखान्यांना पात्र व्हावे लागेल. मात्र राज्यातल्या बहुतेक सहकारी साखर कारखान्यांचे ताळेबंद खराब असल्याने कर्जासाठी बँका त्यांना दारात उभ्या करतील का, हा प्रश्न आहे.
  देशातले निम्मे इथेनॉल उत्पादन महाराष्ट्रात
  गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र व तामिळनाडूला महाराष्ट्रातून इथेनॉल पुरवठा होणार आहे. महाराष्ट्रातले ११७ इथेनॉल प्रकल्प असून त्यांची उत्पादन क्षमता १६४.१० कोटी लिटर आहे. या प्रकल्पांमध्ये सहकारी साखर कारखान्यांची संख्या ४० असून त्यांची इथेनॉल उत्पादन क्षमता ५०.१७ कोटी लिटर आहे. निव्वळ इथेनॉल उत्पादन घेणारे ४२ प्रकल्प राज्यात असून यातून ४५.९० कोटी लिटर इथेनॉल उत्पादन होते. देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता ३२९.५० कोटी लिटर आहे.
  ऊस शेतीचे भविष्य इथेनॉल उद्याेग असेल
  'कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन वाढवावे यासाठी ४,४०० कोटी रुपयांची केंद्राची योजना फायद्याची आहे. या योजनेत इथेनॉल उत्पादनासाठी बँका आर्थिक मदत करतील. त्यावरचे १३७५ कोटी व्याज सरकार भरेल. भविष्यात साखरेपेक्षाही इथेनॉल उत्पादन कारखान्यांसाठी फायद्याचे ठरेल. इथेनॉल उत्पादन हेच ऊस शेतीचे भवितव्य असणार आहे.' प्रकाश नाईकनवरे, एमडी, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ.Maharashtra's break record in sales of ethanol in India

Post a Comment

 
Top