0
औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५६० पदे कंत्राटी पद्धतीने भरली जातील

मुंबई- दुष्काळग्रस्त १५ जिल्ह्यांतील तरुण-तरुणींसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ ४,२४२ चालक-वाहक पदांची भरती करणार आहे. भरतीत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी दिली. ही भरती औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांत होईल.

दिवाकर रावते म्हणाले, राज्यात यंदा दुष्काळ पडला. दुष्काळाच्या झळांनी त्रस्त असलेल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. यावर्षी दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या १५ जिल्ह्यांमधील युवकांच्या हाताला काम मिळावे, त्यांना रोजगार मिळावा या हेतूने एसटी महामंडळाने दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील तरुण-तरुणींना चालक तथा वाहक पदाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना एसटीचा मोफत प्रवास पास देण्याचा निर्णयही महामंडळाने यापूर्वीच घेतला आहे, अशी माहितीही परिवहन मंत्र्यांनी या वेळी दिली.

मराठवाड्यातील औरंगाबादसह इतर जिल्ह्यांचा समावेश :
दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची माहिती देताना रावते म्हणाले, ही भरती औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या पंधरा जिल्ह्यांत होईल. परंतु यापैकी ११ जिल्ह्यात ४ हजार २४२ पदांच्या जागा आहेत. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यात चालक तथा वाहक पदांच्या रिक्त जागा नाहीत. असे असले तरी या चार दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी या जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येऊन त्यांना ज्या जिल्ह्यांमध्ये जागा रिक्त आहेत तिथे नियुक्त्या दिल्या जातील. तसेच ज्या वेळी या चार जिल्ह्यात चालक तथा वाहक पदाच्या जागा रिक्त होतील तेव्हा या उमेदवारांना पुन्हा त्यांच्या जिल्ह्यात नियुक्ती देण्यात येईल.

संबंधित जिल्ह्यात एकाच दिवशी परीक्षा
संबंधित जिल्ह्यात एकाच दिवशी चालक तथा वाहक पदाच्या परीक्षा घेतल्या जातील. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील तरुण उर्वरित ११ ठिकाणी कुठेही एका ठिकाणी परीक्षेस उपस्थित राहू शकतील. या भरतीशिवाय उर्वरित जिल्ह्यांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाईल, असेही ते म्हणाले.

औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५६० पदे
औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५६० पदे एस.टी महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना या व्यतिरिक्त औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबवावयाच्या शहर वाहतूक योजनेसाठी १५ हजार रुपयांच्या ठोक रकमेवर कंत्राटी पद्धतीने काम करण्याचा विकल्पही स्वीकारता येईल, अशी माहितीही रावते यांनी दिली.

मराठा अारक्षण, शुल्क सवलतीचा लाभ
या भरतीमध्ये इतर आरक्षणाबरोबर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय ही एसटी महामंडळाने घेतला अाहे. ही भरती दुष्काळग्रस्त भागासाठी असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त उमेदवारांना या पदांच्या परीक्षा शुल्कात ५० टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे, असा निर्णयही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केला.
'ST' Mega recruitment in drought-hit districts

Post a Comment

 
Top