0
ओएलएक्सवरील जाहिरातीला भुलून कार खरेदीसाठी बेंगळूरहून बेळगावला आलेल्या भावांना लुटण्यात आले आहे. शनिवारी बामणवाडीजवळ ही घटना घडली असून चौघा अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून 3 लाखाचा ऐवज लांबविला आहे.

या संबंधी उद्यमबाग पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील पुढील तपास करीत आहेत. चौकडीने केलेल्या मारहाणीत महम्मदशाबासअहमद व त्यांचा भाऊ महम्मदयासीनअहमद (दोघेही रा. चोळनायकनहळ्ळी, हेब्बाळ, बेंगळूर) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

ओएलएक्सवर कार विकायची आहे, अशी एक जाहिरात टाकण्यात आली होती. कार खरेदी करण्यासाठी म्हणून महम्मदशाबासअहमद यांनी त्या जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. कार खरेदी करण्यासाठी भामटय़ांनी त्यांना बेळगावला बोलाविले. यासाठी शनिवारी ते आपल्या मुलासह बेळगावात दाखल झाले. महम्मदशाबासअहमद यांनी भामटय़ांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. इंडिका कार घेऊन भामटे त्यांच्या जवळ पोहोचले. चला तुम्हाला कार दाखवितो, असे सांगून त्यांना इंडिकामधून बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमाजवळ असलेल्या एका आमराईत नेण्यात आले.

आमराईत कार पोहोचल्यानंतर चाकूचा धाक दाखवून कार खरेदी करण्यासाठी महम्मदशाबासअहमद व महम्मदयासीनअहमद यांनी आपल्या सोबत आणलेली 2 लाख 82 हजार 700 रुपये रोख रक्कम, 8 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, 1 हजार रुपये किमतीचे मनगटी घडय़ाळ, एक चांदीची अंगठी, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र असलेली पर्स हिसकावून घेवून त्यांनी पलायन केले. उद्यमबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

 
Top