0
युवकाच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटात चाकूचे तसेच धारदार शस्त्राचे वार करुन आरोपी झाले होते पसार

जालना- अनैतिक संबंधाच्या संशयावरून गावातील एका युवकाचा खून करून तिघेजण पसार झाले. मात्र पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास करत तिघांना अटक केली. जालना तालुक्यातील वरखेड गावात शनिवारी पहाटे हा खून झाला होता. तुषार विश्वनाथ खाडे असे या घटनेतील मृताचे नाव आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ९ तासांत पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे.

तालुक्यातील वरखेड-सेवली रोडवर असलेल्या नळकांडी पुलामध्ये एक मृतदेह असल्याची माहिती शनिवारी पहाटेच गावात पसरली. त्यानुसार ग्रामस्थांची तेथे मोठी गर्दी झाली. हा मृतदेह गावातीलच तुषार विश्वनाथ खाडे (२५, वरखेड, ता.जालना) याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटात चाकूचे तसेच धारदार शस्त्राचे वार करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार, परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सी.डी.शेवगण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तर पोलिस अधीक्षक एस.चैतन्य यांनी आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय राजेंद्रसिंह गौर यांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली. या घटनेतील आरोपी बुलडाणा जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या दिशेने पोलिस रवाना झाले. मात्र आरोपी काही तासांत त्यांची जागा बदलत असल्याने पोलिसही आरोपींच्या मागावर होते. त्यानुसार मच्छिंद्र ऊर्फ बाळू मारुती खाडे (२४) व राहुल भास्कर खाडे (२५) या दोन आरोपींना जालना एमआयडीसीतून ताब्यात घेण्यात आले, तर नितीन भास्कर खाडे (२८) या आरोपीस वरखेड येथून ताब्यात घेण्यात आले. एसपी एस.चैतन्य, एएसपी समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय राजेंद्रसिंह गौर, पीएसआय जयसिंग परदेशी, कैलास कुरेवाड, कृष्णा तंगे, प्रशांत देशमुख, तुकाराम राठोड, समाधान तेलंग्रे, रंजित वैराळ, सागर बाविस्कर, किरण मोरे, परमेश्वर धुमाळ, विलास चेके यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.on suspicion of immoral relations, Youth murder, 3 accused arrested

Post a comment

 
Top