शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
मुंबई- भीम आर्मी संघटनेचा नेता अॅड. चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावणची मुंबई पोलिसांनी रविवारी दुपारी नजरकैदेतून सुटका केली. त्यानंतर आझाद हा कार्यकर्त्यांसह पुण्याकडे जाण्यास रवाना झाला. त्याच्यासोबत मुंबई पोलिसांचा बंदोबस्त आहे. दरम्यान, मुंबई पोलिस रावणला पुण्याला नेत असताना काहीतरी घातपात करतील, असा आरोप या संघटनेचे राज्य प्रमुख अशोक कांबळे यांनी केला आहे.
शुक्रवारपासून पोलिसांनी रावणला मालाडमधील हाॅटेल मूनबाहेर पडण्यास मज्जाव करत परिसरात जमावबंदी लागू केली होती. त्याच्या मुंबईतील सभांनाही परवानगी नाकारली होती. २ जानेवारीपर्यंत भीम आर्मीला राज्यात सभा घेण्यावर बंदी घातली आहे. पुण्यातील जाहीर सभा व पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबतच्या कार्यक्रमासही पुणे पोलिसांनी २०१ व्या शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारली आहे. रावणबरोबर मुंबईतील ३५० कार्यकर्त्यांची पोलिसांनी सुटका केली. त्यांना रोज पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. १ जानेवारीला रावण कोरेगाव भीमातील जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे.
आठवलेंची उद्या ३ वा. पेरणे फाटा येथे अभिवादन सभा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने शौर्य दिनानिमित्त पेरणे फाटा येथे जाहीर अभिवादन सभेचे आयोजन केले आहे. १ जानेवारी रोजी दुुपारी ३ वाजता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येथे मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव म्हणाले, 'शौर्य दिवसाचे औचित्य साधून भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाजवळ दरवर्षी अभिवादन सभेचे आयोजन केले जाते. मात्र, गेल्या वर्षी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा ही अभिवादन सभा पेरणे फाटा टोलनाक्याजवळील परिसरात होणार आहे. येथे २० हजार स्क्वेअर फुटांचा मंडप घालण्यात आला आहे. पुण्यातून १०० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
कारवाईच्या धास्तीने स्थानिक तरुण गावाबाहेर
गेल्या वर्षी १ जानेवारी राेजी काेरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत २२ गुन्ह्यांत १५०० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र त्यापैकी केवळ १०४ जणांनाच अटक करण्यात पाेलिसांना यश आले आहे. या पार्श्वभूमीवर पाेलिसांनी यंदा कडेकाेट बंदाेबस्त ठेवला आहे. तसेच गुन्हे दाखल असलेल्या ५०० जणांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नाेटिसाही बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, यंदा काेरेगावात साेमवारी व मंगळवारी हाेणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीच्या गुन्ह्यातील संभाव्य कारवाई टाळण्यासाठी काेरेगाव भीमा, वढू तसेच सणसवाडी या गावांमधील अनेक तरुणांनी गावाबाहेर जाणे पसंत केले आहे.
'मागील वर्षी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने आपण अथवा आपले साथीदार यांच्याकडून काेणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेणार नाही याची दक्षता बाळगावी. जर आपल्याकडून अथवा आपले समर्थक कार्यकर्ते यांच्याकडून हेतुपूर्वक काेणतेही बेकायदेशीर कृत्य घडवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरून प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल,' असा इशारा नाेटिसीद्वारे प्रशासनाने दिला आहे.
यंदा काेरेगावात विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्य तसेच देशभरातील विविध ठिकाणांहून सुमारे दहा ते बारा लाख लाेक उपस्थित राहतील, असा प्रशासनाचा कयास आहे. त्या दृष्टीने आराेग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शाैचालय व्यवस्था, पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, या कामी महसूल अधिकारी आणि प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. जागाेजागी पाेलिस बंदाेबस्त तैनात असून लाेकप्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, पाेलीस पाटील यांनाही नियाेजनाबाबत सातत्याने सूचना दिल्या जात आहेत.
अनुयायांना टोलमाफी
१ जानेवारीला विजयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्या जनतेची भावना लक्षात घेऊन रामदास आठवलेंनी वाहनांना टोल माफ करण्याची मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांना टोल माफ होणार आहे.

Post a Comment