0
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या कसोटीसाठी एका मुलाला संघाचा पंधरावा खेळाडू म्हणून दिली संधी

मेलबर्न - अॅडिलेडमध्ये राहणारा आर्ची शिलर ३ महिन्यांचा असताना त्याच्या हृदयाचा व्हॉल्व्ह खराब असल्याचे कळले. मेलबर्नमध्ये ७ तास शस्त्रक्रिया चालली. सहा महिन्यांनी दुसरी शस्त्रक्रिया करावी लागली. मागील वर्षी डिसेंबरमध्ये प्रकृती बिघडली. तो वाचणे अशक्य असल्याचे डॉक्टरांनी म्हटले, पण तिसरी ओपन हार्ट सर्जरीही त्याने झेलली. असा हा ७ वर्षांचा आर्ची बॉक्सिंग डेला (२६ डिसेंबर) भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार असेल. मेलबर्नच्या यारा पार्कमध्ये फॅमिली डे फंक्शनमध्ये याची घोषणा करण्यात आली. प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी तो मेलबर्न कसोटीत संघात सामील होणार असल्याचे या महिन्याच्या सुरुवातीला त्याला सांगितले होते. वाढदिवसाची भेट म्हणून तो कसोटी सामन्यात टीम पॅनसोबत उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे.

क्रिकेटचे वेड असणाऱ्या आर्चीला हृदयरोग असल्याने नियमित शाळेत जाता आले नाही. यामुळे त्याचे जास्त मित्र नाहीत. त्याचे मन रमावे म्हणून पालकांनी त्याला खेळात रमवण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटमध्ये त्याने फिरकीपटू म्हणून प्रशिक्षण घेतले. पण इतर मुलांप्रमाणे तो अधिक धावू शकत नाही. एके दिवशी तू काय बनू इच्छितो, असा प्रश्न त्याच्या वडिलांनी त्याला विचारला. आर्ची म्हणाला की मी क्रिकेट संघाचा कर्णधार बनणार आहे. त्यानंतर वडिलांनी "मेक अ विश' फाउंडेशनमध्ये जाऊन आर्चीची इच्छा नोंदवली. ही बाब क्रिकेट ऑस्ट्रेलियापर्यंत (सीए) पोहोचली. सीएने प्रशिक्षक जस्टीन लँगरला याबद्दल सांगितले. त्या वेळी ऑस्ट्रेलियन संघ यूएईमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळत होता. लँगर यांनी फोन करून आर्चीला भारताविरुद्धच्या मालिकेतील एका सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा तो हिस्सा असेल, असे आश्वासन दिले. तेव्हा आर्चीने भारतीय कर्णधार विराट कोहलीला फिरकी गोलंदाजी करून बाद करणार असल्याचे म्हटले होते. आर्ची या सामन्यात खेळणार तर नाही, पण त्याच्या हीरोसोबत सराव करण्याची आणि ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळणार आहे. टॉससाठी कर्णधार टीम पॅनसोबत तो मैदानावर दिसण्याची शक्यता आहे.
7 year old Archie in Australia cricket team

Post a Comment

 
Top