0
लातूरमध्ये शिकवणी घ्यायची असेल तर पैसे द्यावेच लागतील, पैसे दिले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी दिली.

लातूर- लातुरात २५ लाखांच्या खंडणीस नकार देणाऱ्या खासगी शिकवणी चालकाला पळवून नेऊन मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी १८ दिवसांनी तक्रार आल्यानंतर २ काँग्रेस नगरसेवक व व्हीएस पँथर या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षावर गुन्हा दाखल झाला आहे. एका नगरसेवकाला अटक झाली.

लातुरात प्राध्यापक विजयसिंह हर्ष प्रतापसिंह परिहार व त्यांचे सहकारी प्राध्यापक राजीव तिवारी हे खासगी शिकवणी घेतात. त्यांनी २ दिवसांपूर्वी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, व्हीएस पँथर्स या संघटनेचा संस्थापक विनोद खटके, काँग्रेस नगरसेवक पुनीत पाटील, काँग्रेस नगरसेवक सचिन मस्के आणि इतर चार जणांनी खंडणीची मागणी केली.

१० डिसेंबर रोजी हे तिघे साथीदारांसह घरी आले. त्यांनी घराबाहेर बोलावून आपल्या सोबत नेले. अज्ञात स्थळी नेऊन मारहाण केली. ६ लाख ६६९ रुपये दिल्यानंतर हे प्रकरण संपले असे वाटत असतानाच हे तिघे पुन्हा २५ लाखांची खंडणी मागत होते. लातूरमध्ये शिकवणी घ्यायची असेल तर पैसे द्यावेच लागतील, पैसे दिले नाहीत तर जीवे मारू अशी धमकी दिली. तसेच अॅट्राॅसिटीत अडकवू अशीही धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नगरसेवक सचिन मस्के याला अटक केली. नगरसेवक पुनीत पाटील, विनोद खटके आणि इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

काँग्रेसचे मौन :
या प्रकरणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, व्यंकटेश पुरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांचे मोबाइल बंद होते. गेल्या काही महिन्यांपासून लातूरमध्ये खंडणीखोर वाढल्याचा आरोप काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी केला होता. पोलिसांनी कारवाई केली नाही तर आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र आता खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात काँग्रेसचेच दोन नगरसेवक अडकल्याने काँग्रेसने मौन बाळगले आहे.

खटकेने मागितले काँग्रेसचे तिकीट :
विनोद खटके व सचिन मस्के या दोघांनी काही वर्षांपूर्वी आपल्या नावातील आद्यक्षरांवरून व्हीएस पँथर नावाची संघटना स्थापन केली आहे. काँग्रेसशी जवळीक असलेल्या मस्के यांनी पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. तर विनोद खटके यांनी लोकसभेसाठी काँग्रेसचे तिकीट मागितले आहे. गेल्या वर्षी व्हीएस पँथरने अमित देशमुख व कन्हैयाकुमारच्या उपस्थितीत लातूरमध्ये संघटनेचे अधिवेशनही घेतले.

६ महिन्यांपूर्वीच झाला होता एका क्लासचालकाचा खून
सहा महिन्यांपूर्वीच लातूरमध्ये व्यावसायिक देवाणघेवाणीतून खासगी शिकवणी चालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, हा प्रकार १० तारखेला झाला तेव्हाच तक्रार का देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपण घाबरलो असल्यामुळे तक्रार द्यायला उशीर झाल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
Congress corporator arrested in latur for ransom to Private Class Owner

Post a Comment

 
Top