0
 • Revli drought tour newsपरळी - बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील चार गावातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी आलेल्या केंद्रीय पथकाने परळी तालुक्यातील रेवलीत दुपारी २.५० मिनिटांनी भेट देऊन दुष्काळाची केवळ २२ मिनिटांत पाहणी केली. रेवली गावाला भेट दिल्यानंतर हे पथक माजलगाव येथील शासकीय विश्रामगृहावर जेवणासाठी जाणार होते. परंतु अचानक दौऱ्यात बदल झाला. हे पथक परळी जवळील चेंबरी येथील विश्रामगृहावर जेवणासाठी गेले.जेवण आणि परळी येथील वैद्यनाथाचे दर्शन या दरम्यानच्या काळात पथकाचा जवळपास एक तास गेला. त्यामुळे या पथकाला वडवणी तालुक्यातील खडकी आणि बीड तालुक्यातील कांबी गावाला भेट देता आली नाही. परळीहून बीडकडे निघालेल्या या पथकाला जरूड गावाला जायला ५.४० वाजले. त्यामुळे जरूड गावातच पथकाला अंधार झाला आणि इथेच दौरा संपला.
  आपल्या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक येणार असल्याने सकाळी अकरा वाजल्यापासूनच परळी तालुक्यातील रेवली गावातील शेतकरी पथकाच्या प्रतीक्षेत होते. शेवटी दुपारी नियोजित वेळेत २.५० मिनिटांनी केंद्रीय पथक रेवली गावात आले. करपलेला कापूस , तुरीचे पीक दाखवण्यासाठी रेवली गावातील दीडशे शेतकरी सकाळी अकरा वाजल्यापासून ताटकळले होते. दुपारी आलिशान गाडीतून पथकातील अधिकारी खाली उतरले. खाली उतरून पायी चार पाऊले चालत दुष्काळाने उद्वस्त झालेल्या शेतात थांबले. दुपारी ३.१२ मिनिटांनी दुष्काळाची पाहणी करून हे पथक परळी येथील चेंबरी विश्रामगृहाकडे निघाले. चेंबरी विश्रामगृहावर दुपारी साडेतीन वाजता पोहोचल्यानंतर दुपारी सव्वाचार वाजेपर्यंत पथकातील अधिकाऱ्यांनी स्वादिष्ट भोजनाचा आनंद लुटला. त्यानंतर दुपारी सव्वाचार वाजता पथकातील अधिकाऱ्यांनी चेंबरी विश्रामगृह सोडले. चेेंबरी विश्रामगृहावरून हे पथक परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी गेले. वैद्यनाथ मंदिरात या पथकाने दुपारी साडेचार वाजता दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर हे पथक दुपारी साडेचार वाजता बीड तालुक्यातील जरूडच्या दिशेने निघाले. सायंकाळी बीड- परळी मार्गावरील जरूड फाट्यावर ५.४० वाजता हे पथक पोहोचले. अवघ्या वीस मिनिटांतच जरूड येथे अंधार झाल्याने येथेच दुष्काळी दौरा संपला.
  उस्मानाबाद | सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय दुष्काळ पथक न आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, निषेधार्थ मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोस्टर्स डकवली आहेत.
  मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी(दि.६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जिल्हा परिषद इमारतीच्या भिंतीवर पोस्टर्स लावण्यात आली.यासंदर्भात मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. अतिमागास म्हणून गणल्या गेलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला शासनाकडून मदतीची मोठी अपेक्षा असतानाही दुष्काळ पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. हे पथक अन्य जिल्ह्यात आले, मात्र उस्मानाबादला आले नाही.त्यामुळे मनसेने जागोजागी पथक दाखवा,बक्षीस मिळवा, अशा आशयाचे पोस्टर्स लावून शासनाचा निषेध केला आहे.दुष्काळाची दाहकता असूनही जिल्ह्यात शासनाकडून उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. चारा छावणी,पिण्याचे पाणी, रोजगार अशा अनेक समस्या कायम आहेत. या आंदोलनात सलीम आवटी, हेमंत पाठक, धर्मराज सावंत, सौरभ देशमुख,समीर शेख, मेहराज सय्यद, संजय पवार आदी सहभागी झाले होते.
  असाही होता पर्याय 
  रेवली गावाला दुपारी भेट देऊन दुष्काळाची पाहणी करणाऱ्या पथकाने जर दुपारी ३.१२ वाजता रेवली गाव सोडल्यांनतर तेलगाव मार्गे वडवणीला भेट दिली असती तर वडवणी येथील शासकीय विश्रामगृहावर जेवण करता आले असते. जेवणानंतर या पथकाला नियोजित खडकी गावालाही भेट देता असली असती. खडकीनंतर जरूड आणि जरूडनंतर कांबी गावालाही भेट देता आली असती.

Post a Comment

 
Top