0
माजलगावजवळील टाकरवण फाट्यावर रात्री ८:१५ वाजता अपघात, सहकाऱ्यांची चाैकशी करून व्यापाऱ्यानेही साेडले प्राण

माजलगाव- गेवराईतील खरेदी-विक्री आटोपून कल्याण -विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरून माजलगाव -तेलगावमार्गे लातूरकडे निघालेल्या इंदूरच्या व्यापाऱ्याची कार महामार्गावरील टाकरवण फाट्यावर आली तेव्हा चालकाचा अचानक कारवरील ताबा सुटला. कारवर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी चालकाने ब्रेक दाबताच भरधाव कार रस्त्याच्या विरुद्ध बाजूने साइड पंख्याहून थेट रस्त्याच्या बाजूच्या टेकाडावरून हवेत जवळपास २० फूट उंच उडून महामार्गापासून १०० फूट लांब असलेल्या शेतातील झाडाच्या फांदीवर जोरात आदळली या अपघातात त्याच क्षणी झाडाची फांदी तुटून कारवर पडली आणि कारही खोडावर आदळल्याने कारचालक व मुनीम जागीच ठार झाले. तर दोघांच्या मृत्यूचा धक्का बसून व्यापाऱ्यानेही काही वेळातच प्राण सोडले.
इंदूर येथील कापड व्यापारी सुरेश परमानंद हरियानी (४८) हे रेडिमेड कपड्याचे व्यापारी असून ते व्यवसायानिमित्त मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर या जिल्ह्यात जातात. शुक्रवारी (१४ डिसेंबर) ते इंदूर येथून कार (एम. पी. ०९ पी. पी. ४६८३) ने सकाळी आठ वाजता गेवराईकडे निघाले, सायंकाळी ते गेवराईत पोहोचले. या वेळी त्यांच्यासमवेत कारमध्ये मुनीम हेमंत नंदकिशोर राजपूत (२२, रा.खंडवा, मध्य प्रदेश) चालक रोहित रामप्रसाद मीणा ( २१ रा. इंदूर) हे दोघे होते. सायंकाळी सात वाजता काही व्यापाऱ्यांना भेटून ते लातूरकडे निघाले तेंव्हा साडेसात वाजता गेवराईतच असताना सुरेश यांनी मुलगा दीपेशला फोन करून मी गेवराई येथून काम आटाेपून आता पुढे लातूरला जात आहे असे सांगितले. गेवराई-गढी-माजलगाव तेलगाव मार्गे राष्ट्रीय महामार्गावरून लातूरला निघाले तेंव्हा माजलगाव तालुक्यातील टाकरवण फाट्यावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार लिंबाच्या झाडावर आदळली. अपघातात कार चालक रोहित व हेमंत हे दोघे कारमध्ये दबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.व्यापारी हरियानी यांना लोकांनी बाहेर काढले. आपल्या सहकाऱ्यांची चाैकशी केल्यानंतर त्यांनीही प्राण साेडले. शनिवारी सकाळी दहा वाजता मृत हरियानी यांचे नातेवाईक आले. यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.

गावकऱ्यांनी घेतली धाव 
रात्री माेठा आवाज झाल्यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या गाड्या तसेच परिसरातील नागरिक मदतीला माेठ्या प्रमाणावर धावून आले. गाडीची अवस्था खूपच खराब असल्याने तसेच दाेघे फांदीखाली दबले असल्याने त्यांना काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र लाेकांना त्यांना बाहेर काढता येत नव्हते.
सामाजिक कामात लौकिक 
इंदूर येथील कापड व्यापारी सुरेश परमानंद हरियानी हे कापड व्यवसायासाेबतच सामाजिक कामे करत असत. इंदूर येथे मुस्कान ग्रुप या सामाजिक ग्रुपच्या माध्यमातून गरीब मुलींचे लग्न लावणे, अन्नदान, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे धार्मिक कार्य स्वखर्चातून करत असत. या सामाजिक कामात त्यांना मित्राची साथ मिळत होती. त्यांच्या मदत करण्याच्या स्वभावामुळे ते इंदूरमध्ये प्रसिद्ध हाेते.
वो दोनाे कहाँ है ... 
व्यापारी सुरेश हरियानी यांना लोकांनी जखमी अवस्थेत कारमधून बाहेर काढल्यानंतर त्यांनी सुरुवातीला वो दोनाे कहां है अशी विचारणा लोकांकडे केली तेंव्हा मदतीसाठी आलेल्या लोकांनी त्या दोघांचा दबून मृत्यू झाला असल्याचे सांगताच सुरेश हरियानी यांनीही काही वेळातच प्राण सोडले. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
पापा का माेबाइल आपके पास कैसे? 
अपघातातील ठार झालेल्या तिघांची ओळख पटत नसल्याने लाेकांनी सुरेश हरियानी यांचा मोबाइल तपासला तेव्हा त्यावर त्यांचा मुलगा दीपेश यांचा ८.२० मिनिटे ते ८.३५ च्या दरम्यान आलेले कॉल पाहिले. तेव्हा लोकांनी दीपेश यांना मोबाइल फोन करून हा मोबाइल नंबर कोणाचा आहे अशी विचारणा केली तेव्हा दीपेश याने मेरे पापा का मोबाइल आपके पास कैसे आया, अशी विचारणा केली तेंव्हा लोकांनी त्याला अपघाताची माहिती दिली. मुलगा दीपेश याने जालना व गेवराई येथील व्यापाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती सांगितली. व्यापारी अपघातस्थळी भेट देऊन ओळख पटवली. पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ नरके व काही पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन कारमधील मृतदेह बाहेर काढले.Car accident in Majalgoan, 2 people died

Post a comment

 
Top