0
ड्रायव्हर नशेत होता असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

नवापूर- गुजरातमधील एका खासगी काेचिंग क्लासेसची सहलीसाठी गेलेली बस दाेनशे फूट दरीत काेसळली. शनिवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात ७ विद्यार्थ्यांसह १० जणांचा मृत्यू झाला तर ६० जण जखमी झाले. मृतात पाच मुलींचा समावेश आहे.महाराष्ट्र- गुजरात सीमेवरील बर्डीपाडा (जि. डांग) परिसरात हा भीषण अपघात झाला. आसनक्षमता ३६ असताना या बसमध्ये ८७ जण बसवले हाेते. बसचालक नशेत गाडी चालवत असल्याचा जखमींचा आरोप आहे. ‘अंकल, बस सावकाश चालवा असे आम्ही सांगत होतो. परंतु त्यांनी ऐकले नाही,’ असे जखमी विद्यार्थी सांगत हाेते. या प्रकरणी बसचालक, मालक व क्लासेस चालकावर गुन्हा दाखल झाला.


याप्रकरणी बस चालक, मालक व गुरुकृपा ट्यूशन सेंटरचे संचालक यांच्यावर सुबीर (जि. डांग) पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसची क्षमता ३६ सीटची असताना त्यात १ली ते ८व्या वर्गात शिकणाऱ्या ५० मुला-मुलींसह ८७ जण होते. सर्व विद्यार्थ्यांना सुरत येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसचालक हा मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचा जखमींचा आरोप असून त्याच्यावरही सुरतमध्ये उपचार सुरू आहेत. गुजरातमधील अमरोली व छापराभाटा परिसरात राहणारे काही विद्यार्थी अमरोली येथील गुरुकृपा ट्यूशन सेंटरमध्ये शिकत आहेत. त्यांची सहल शबरीधाम, पंपासरोवर आणि महाल कँपला गेली होती. शबरीधाम, पंपासरोवर आणि महाल कँपवरून परत येत असताना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही बस महाल-बर्डीपाडा परिसरातील दोनशे फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात बसचा चक्काचूर झाला असून एका शिक्षिकेसह १० जण जागीच ठार झाले आहेत. अपघातस्थळी मोबाइल नेटवर्क नसल्यामुळे पोलिसांना अपघाताची माहिती खूप उशिरा मिळाली. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळू शकले नाहीत. मात्र, अपघाताची माहिती मिळताच आहवा आणि तापी जिल्ह्यातील आठ रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या. तसेच स्थानिकांनीही पोलिसांच्या मदतीने तत्काळ बचावकार्यास सुरुवात करून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना उपचारासाठी सुरत येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, मृतांवर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. बर्डीपाडा हा भाग नवापूर शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर आहे.
महाल-बर्डीपाडा वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला. एका वळणावर चालकाने वेगात वळवल्याने बस तीनदा उलटली आणि ती २०० फूट खोल दरीत जाऊन कोसळली. अपघात इतका भयंकर होता की, त्यात बसचे दोन्ही चाक सांगाड्यापासून वेगळे झाले. अपघातात बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
अंकल, बस सावकाश चालवा... 
जखमी झालेल्या मुलांनी बसचालक नशेत असल्याचा आरोप केला आहे. तो धोकेदायक वळणांवरही तब्बल अर्धा तासांपर्यंत भरधाव वेगाने गाडी चालवत होता. दरम्यान, “अंकल, बस सावकाश चालवा,’ असे आम्ही त्यांना सांगत होतो. परंतु त्यांनी ऐकले नाही, असे विद्यार्थ्यांनी सागितले. विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शिका म्हणून गेलेल्या १९ वर्षीय शिक्षिकेनेही यास दुजोरा दिला आहे.
मृतांत ७ विद्यार्थी, ३ पालक 
कृष्णा जिग्नेश पटेल (१०), ध्रुवी अल्केश जानी (१२), दीपाली मनीष पटेल (१०), दक्ष मनीष पटेल (१२), क्रिश हेमंत पटेल (१४), ध्रुवाजी पटेल (४), विधी तुषार पटेल (१४) हे ७ विद्यार्थी तर हेमाक्षी नववीत पटेल (४०), तुषा मुकेश पटेल (१९), श्रेया राणा (१९) हे पालक व मुलांचे नातेवाईक ठार झाले.school picnic bus fell into gorge killing 10 injuring 50 in Surat

Post a comment

 
Top