0
सिंधुदुर्ग दौऱयावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दुपारच्या सुमारास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र, पवार यांनी, राणे यांच्या निवासस्थानी मित्रत्वाच्या नात्याने आलो होतो, असे स्पष्ट करतानाच, या भेटीबाबत मीडियाला सांगण्यासारखे माझ्याजवळ तसेच राणेंजवळही काहीही नसल्याची मिश्कील टिपणी केली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे 2 व 3 डिसेंबर या दोन दिवसांसाठी सिंधुदुर्ग दौऱयावर होते. सोमवारी पवार हे राणेंची भेट घेणार असल्याचे वृत्त समजल्यानंतर राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी स्वाभिमान तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही गर्दी केली होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पवार यांचे येथे आगमन झाले. राणे यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी आमदार नीतेश राणेही उपस्थित होते.
वीस मिनिटे चर्चा
भेटीत पवार-राणे या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, आपण सिंधुदुर्ग दौऱयावर असून या कणकवलीतून जात असताना राणे यांचा भेटीला येण्याचा निरोप आला. त्यानुसार मी येथे आलो. राणेंना मित्रत्वाने भेटलो. राणे येथे आहेत, हे समजले असते तरीही मी त्यांना भेटण्यासाठी आलो असतो, असेही पवार म्हणाले. तसेच या भेटीबाबत तुम्ही पत्रकार बातमी करालच. मात्र, ‘गुप्त भेट झाली, दार बंद करून चर्चा झाली’, असे छापू नका, असेही हसत हसत पवार म्हणाले. तसेच या भेटीत मीडियाला सांगण्यासारखे आम्हा दोघांजवळही काहीही नसल्याचे ते म्हणाले.
स्वाभिमान, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित
याप्रसंगी पवार यांचे नातू योगेंद्र पवार, रोहीत पवार व पार्थ पवार तसेच सौ. नीलम राणे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व्हिक्टर डान्टस, नगरसेवक अबिद नाईक, जि. प. चे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, कणकवली सभापती सुजाता हळदिवे, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, अशोक सावंत, सुरेश सावंत, नगरसेवक  संजय कामतेकर, विराज भोसले, अभिजीत मुसळे, बंडू हर्णे, मेघा गांगण, किशोर राणे, पंकज पेडणेकर आदींसह स्वाभिमान व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

 
Top