0
संधिसाधूपणा : उस्मानाबाद जि. प. च्या बांधकाम विभागाकडील साहित्य धूळ खात

उस्मानाबाद - दुष्काळही संधिसाधू व्यावसायिक राजकारण्यांसाठी एक सुवर्णसंधीच असते. असेच काहीसे चित्र १९७२ च्या दुष्काळात व आजच्या परिस्थितीतही दिसून येत आहे. १९७२ दुष्काळी परिस्थितीत लाेकांच्या हाताला काम देण्यासाठी तत्कालीन शासन व राजकारण्यांनी संधी साधून लाखो रुपयांचे साहित्य खरेदी करून राज्यभर वितरीत केले. परंतु, यातील हजारो टिकाव, फावडे, हातोड्या, पहारी असे साहित्य मागील ४६ वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या गोडाउनमध्ये गंजत पडले आहे.

उस्मानाबाद जिल्हा गेल्या दशकापासून सातत्याने दर दोन ते तीन वर्षांनी दुष्काळी परिस्थितीशी झुंजत आहे. दुष्काळी परिस्थितीत तात्पुरत्या उपाययोजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी या दुष्काळ निवारणावर मात्र नियोजनबद्ध व गांभीर्याने विचार न झाल्याने दुष्काळी परिस्थिती कायम आहे. विशेष म्हणजे या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी व शेतमजुरांची सर्वाधिक परवड होत असली तरी हा दुष्काळ अनेक संधिसाधूंसाठी पर्वणीच असल्याचे दिसून येते. यामध्ये सिंटेक्सच्या टाक्या, पाण्याचे हौद, चारा छावण्या, करण्यात येणारी विविध कामे, पाणी पुरवठ्यासाठीची टँकर लॉबी अशा एक ना अनेक घटकांना हा दुष्काळ एक पर्वणीच असतो. ही परिस्थिती आजची अथवा मागील काही वर्षातील नसून ती १९७२ च्या भीषण दुष्काळी परिस्थितीपासून चालत आल्याचे दिसून येते. १९७२ मध्ये पडलेल्या भयानक दुष्काळात अन्नधान्याबरोबर हाताला रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला होता. तेव्हा उस्मानाबादचे भूमिपुत्र कै. उद्धवदादा पाटील यांनी सभागृहात या भागातील लोकांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची मागणी केली. यातूनच रोजगार हमी योजना पुढे आली. परंतु, तेव्हाच्या व्यावहारिक चाणाक्षांनी या दुष्काळाचेही सोनं करून घेतलं. तेव्हा गावोगावी रोहयोंतर्गत कामे हाती घेण्यात येऊन कामावर येणाऱ्या नागरिकांना टिकाव, फावडे, हातोडे, लोखंडी टोपले, बादल्या, दगड घडवण्याच्या छन्नी शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत पुरवण्यात येत हाेते. त्यानुसार उस्मानाबाद जिल्हा परिषदेलाही त्यावेळी हजारोंच्या संख्येने वरील साहित्य पुरवण्यात आले. परंतु, हे साहित्य ना तेव्हा वापरात आले ना नंतरच्या ४६ वर्षात त्यामुळे आजही सदरचे लाखो रुपयांचे साहित्य जि. प. बांधकाम विभागाच्या गोडाउनमध्ये धूळखात पडले आहे.

हे साहित्य १९७२ च्या दुष्काळात मिळाल्याचे मला समजले
मी सदरील पदावर नव्यानेच रुजू झालो आहे. त्यामुळे याबाबत मलाही काही माहिती नव्हती. परंतु, माहिती घेतल्यानंतर सदरील साहित्य १९७२ च्या दुष्काळात राज्य शासनाकडून मिळाल्याचे समजले. तसेच रेकॉर्डलाही राज्य शासनाकडून मिळालेले साहित्य असे नमूद आहे. -के.एन. साठे, उपअभियंता, बांधकाम विभाग जि.प.-उस्मानाबाद

नोंदीनुसार साहित्याची संख्या
पहार ३५१
टिकाव ६०२७
खोरे ११४९०
टोपले ६२७
हातोडे हजारो
छन्नी हजारो

जिल्हा परिषदेतील नोंदीनुसार सर्व साहित्याची संख्या २५ हजारावर, पण अजूनही सुस्थितीत
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडील नोंदीनुसार सदरच्या सर्व साहित्याची एकत्रित संख्या २४९०५ इतकी आहे. परंतु, प्रत्यक्षात गोडाउनमध्ये पाहिल्यानंतर हा आकडा त्यापेक्षाही जास्त आहे असे दिसून येते. त्यामुळे याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच लक्ष देऊन या साहित्याची पुन्हा एकदा मोजदाद करून त्याचा योग्य त्या कारणासाठी विनियोग करण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज असून अन्यथा हे साहित्य आणखी काही वर्षानी भंगारात निघाल्यास नवल वाटू नये.

नवीन साहित्य, मात्र याकडे लक्षच नाही
मागील तीन ते चार वर्षापासून उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळाच्या निवारणार्थ प्रशासनासह पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना आदींच्या मार्फत गावोगावी कामे हाती घेण्यात आली. त्याकरिता मोठ्या या संस्था तसेच काही ठिकाणी प्रशासनाकडूनही या साहित्याची नव्याने खरेदी झाली. परंतु, जिल्हा परिषदेच्या गोडाउनमध्ये पडून असलेले हे हजारोंच्या संख्येचे साहित्य कोणाच्याच लक्षात कसे आले नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.
Osmanabad district Par. construction division Material issue

Post a Comment

 
Top