0
 • नागपूर - राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान किंवा धनिक लाेक, राजकारण्यांच्या मदतीवर अवलंबून न राहता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वयंपूर्ण व्हावे आणि महामंडळाच्याच पैशातूनच त्याचे आयोजन केले जावे, या उद्देशाने १८ वर्षांपूवी स्थापन करण्यात आलेला 'महाकोष' अजूनही रिताच असल्याचे दिसते. त्यामुळे संमेलन स्वबळावर आयोजित करण्याची संकल्पना धुसर होत चालली आहे. दरम्यान, साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी या विषयावर थेट बोलायचे टाळत महामंडळाने निधी संकलनाची मोहीम हाती घेण्याचे आवाहन केले.
  या महाकाेषात पाच कोटी रुपये जमा करून त्या रकमेच्या व्याजातून दरवर्षी साहित्य संमेलन घेण्याचे ठरवण्यात आले हाेते. मात्र, गेल्या १८ वर्षांत महामंडळाच्या 'महाकोषात' केवळ २५ टक्केच रक्कम म्हणजे सुमारे एक कोटी ३५ लाख रुपये जमा झालेले अाहेत. या संदर्भात प्रकाशक, लेखक, महामंडळाशी संपर्क साधला असता निधी संकलनाच्या मुद्याला बगल देत सर्वांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानली. गेल्या काही वर्षांत संमेलन अायाेजनाचा खर्च काेट्यवधींच्या घरात जात अाहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही अनुदान २५ लाखांवरून ५० लाख केले अाहे. तरीही ही रक्कम अपुरी पडते. म्हणूनच आगामी संमेलनात काटकसरीचा अवलंब करण्याचे अायाेजकांनी ठरवले अाहे. तरीही या संमेलनाचा खर्च २ काेटी ४० लाखांवर जाऊ शकताे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात अाहे. या पार्श्वभूमीवर महाकोषाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
  धनिकांची मानसिकता बदलली : जाेशी 
  यासंदर्भात अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांच्याशी संपर्क साधला असता आपल्यासह अनेक प्रकाशकांनी महाकोषात प्रकाशक म्हणून नव्हे, पण वैयक्तिक मदत केली, असे सांगितले. साहित्य महामंडळाने या विषयाला परत एकदा चालना दिल्यास निधी संकलन होईल, अशी अाशाही व्यक्त केली. दुसरीकडे, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी महाकोषात निधी जमा करण्याचे आमचे आवाहन कायम असल्याचे सांगितले. पूर्वी सांस्कृतिक उपक्रमांना मदत करणे हे धनिकांना आपले कर्तव्य वाटत होते. आता धनिकांची मानसिकता बदलली असून त्यांना साहित्यकारण महत्त्वाचे वाटत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राज्यातील ११ कोटी जनतेने प्रत्येकी एक रुपया जमा केला तरी महामंडळाच्या काेषात ११ कोटी रुपये जमा होतील, असे जोशी म्हणाले.
  १९५८ मध्ये कवी अनिल यांनी मांडली कल्पना : मराठी साहित्य संमेलन स्वयंपूर्ण व्हावे व त्याच्या आयोजनासाठी अशा प्रकारचा निधी असावा, अशी मूळ कल्पना १९५८ मध्ये मालवण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात आत्माराम रावजी देशपांडे अर्थात कवी अनिल यांनी मांडली होती.Yavatmal marathi sahitya sammelan news
  बाळासाहेब ठाकरेंनी हिणवल्याने बापटांनी 'स्वाभिमान' जागवला 
  मुंबई येथे १९९९ मध्ये झालेल्या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक वसंत बापट यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणावर प्रतिक्रिया म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांची 'बैल' म्हणून संभावना केली हाेती. तसेच संमेलनाचा उल्लेख 'बैलांचा बाजार' असा केला होता. ठाकरे यांच्या या वक्तव्याचा बापट यांनी समारोपीय भाषणात तिखट समाचार घेतला. तसेच लेखक व साहित्यिकांनी पैशांसाठी इतके लाचार होऊन स्वाभिमान गहाण टाकू नये, यासाठी स्वत: पैसे गोळा करायचे आणि त्याच्या व्याजातून संमेलने घ्यायची, अशी 'महाकोष' तयार करण्याची संकल्पना मांडली हाेती. महाकोषातील पैशांच्या व्याजातून संमेलन घेता येईल इतके व्याज होईपर्यंत, या निधीला हात लावायचा नाही आणि किमान १ कोटी रुपये उभे करून दाखवायचे, असे या वेळी ठरले होते. यासाठी अ. भा. साहित्य महामंडळाच्या घटनेत दुरुस्तीही करण्यात आली. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झालेला नाही.
  निधी संकलनात केवळ प्रकाशकांकडूनच अपेक्षा का, लेखकांनीही याेगदान द्यायला हवे : अरुण जाखडे 
  महाकोषात निधी संकलनासाठी महामंडळाने किती प्रयत्न केले, असा सवाल अ. भा. मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांनी केला. शासन देत असलेले पैसेही लोकांचेच आहेत. त्याग करण्याची वेळ आली की सर्व रोख प्रकाशकांवर ठेवणे बरोबर नाही. पुस्तक िवक्रीतून लेखकांनाही पैसे मिळतात. मग लेखकांनी पैसे का देऊ नये? संमेलन साहित्यिकांचे आहे, प्रकाशकांचे आहे असे महामंडळ म्हणते. मग प्रकाशकांवर वेगवेगळे ताण का टाकता, असा सवाल त्यांनी केला. आतापर्यत आम्हाला महामंडळाने याबाबत काहीही सांगितले नाही. सरकारच्या मदतीशिवाय संमेलन घ्यायचे अशी स्पष्ट भूमिका महामंडळाने घ्यावी, मग पैशाचा पाऊस पडेल, असे जाखडे यांनी स्पष्ट केले.
  महामंडळाशी संलग्न संस्था लेखकांना अनादराची वागणूक देतात, एक रुपयाही देणार नाही : रवींद्र शाेभणे 
  महामंडळाच्या महाकोषात मी एक पैसाही आतापर्यंत जमा केलेला नाही व करणारही नाही, अशी भूमिका प्रसिद्ध लेखक व कादंबरीकार रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केली. अ. भा. मराठी साहित्य महामंडळ आणि महामंडळाशी संलग्न संस्था लेखकांना खूप अनादराची वागणूक देतात. मग लेखकांकडून अपेक्षा का ठेवतात, असा सवाल शोभणे यांनी केला. महामंडळ केवळ राजकारण करीत आहे. दोन वर्षांपूर्वी महामंडळाने आवाहन करून निधी संकलन केले. हा निधी कुठे गेला,े असा सवालही शोभणे यांनी केला. महामंडळाचे पदाधिकारी संमेलनस्थळी आठ-आठ दिवस मुक्काम करतात. त्यांचा पाहुणचार व आदरातिथ्यावरच पैसा खर्च होतो, याकडे शोभणे यांनी लक्ष वेधले.
  ज्यांना द्यायचे अाहेत ते अावाहनाला प्रतिसाद का देत नाहीत, आरोपबाजीतच आघाडीवर का : श्रीपाद जाेशी 
  साहित्य महामंडळाने डोंबिवली संमेलनावेळी गाळेधारक व प्रतिनिधींनाही प्रत्येक नोंदणी अर्जासोबत संमेलन निधीसाठी आवाहन केले होते. त्यालाही प्रतिसाद का दिला गेला नाही? असा सवाल महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला. प्रत्येक संमेलनावेळी महामंडळ पदाधिकाऱ्यांनी निधीसाठी अावाहन केलेले अाहे. मात्र ज्यांना काही द्यायचेच नाही, फक्त घ्यायचेच आहे ते आरोपबाजी करण्यात आघाडीवर असतात. ज्यांना खरोखरच काही देण्यात रुची आहे त्यांनी महामंडळाचे दर सहा महिन्यांनी अंकेक्षण करून घेतलेले अंकेक्षित व संमत हिशेब रितसर मार्गाने जरूर बघावेत. ज्यांना द्यायचेच नाही त्यांनी काही देऊ नये. पण निव्वळ वाचाळपणाही मग करू नये, असा टोला जोशींनी टीकाकारांना लगावला.

Post a Comment

 
Top