0
थरार रविवारी रात्री १० ते सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत बीड ते जालना मार्गावर चोरट्यांची दहशत

जालना- धारूरचा घाट प्रारंभ होण्यापूर्वी दोघे प्रवासी म्हणून ट्रकमध्ये बसले. घाटाच्या मधोमध आम्हाला उतरायचे आहे, असे सांगत ट्रक थांबवण्यास सांगितले. ट्रकपाठोपाठ आलेल्या स्कॉर्पिओमधून आणखी तिघे आले नि ते ट्रकच्या केबिनमध्ये घुसले. या पाच जणांनी ट्रकमधील दोन्ही चालकांवर बंदूक रोखून त्यांना बळजबरीने दारू पाजली. नंतर काठीने मारहाण करीत ट्रक तेलगावजवळ उभा करून ट्रकमधील सुमारे दहा लाख रुपये किमतीचा १७ टन कापूस दुसऱ्या वाहनात उतरवून घेतला. नंतर दरोडेखोरांनी हा ट्रक जालना जिल्ह्यातील मंठा रोडवरील उटवद पाटीजवळ आणून उभा करून सर्व जण पसार झाले. रविवारी रात्री १० ते सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत हा थरार सुरू होता. ट्रकचालक बिभीषण शंकर म्हस्के (औरंगपूर ता. केज), शेख इलियास (आडस, ता. केज) हे दोघे ट्रकचालक दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झाले आहेत.
बीड जिल्ह्यातील आडस या गावातील दोन शेतकऱ्यांचा कापूस गुजरातमध्ये विक्रीसाठी नेण्यात येत होता. बारा टायर्सच्या या ट्रकमध्ये (एमएच २० सीटी ११२५) मध्ये सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सतरा टन कापूस भरून चालक बिभीषण म्हस्के व शेख इलियास गुजरातच्या दिशेने निघाले होते. केज येथे त्यांनी ट्रकमध्ये डिझेल भरले. दरम्यान, रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हा ट्रक धारुरच्या घाटाच्या पायथ्याशी असताना दोघे जण प्रवासी म्हणून या ट्रकमध्ये बसले. ऐन घाटात पाठीमागून आलेल्या स्कॉर्पिओ वाहनाने हा ट्रक अडवण्यात आला. स्कॉर्पिओमधील तिघे जण ट्रकमध्ये बसले. चालत्या ट्रकमध्ये दरोडेखोरांनी ट्रकचालक म्हस्के व शेख इलियास यांच्यावर बंदूक रोखून त्यांना मारहाण करीत बळजबरीने दारू पाजली. दरोडेखोरांच्या मारहाणीत बिभीषण म्हस्के, शेख इलियास हे गंभीर जखमी झाले. तेलगावजवळ ट्रक थांबवून ट्रकमधील सर्व १७ टन कापूस दुसऱ्या ट्रकमध्ये उतरवून घेण्यात आला. त्यानंतर १२ चाकी ट्रक पाथरी, मानवतमार्गे आणून मंठा रोडवरील उटवद पाटीजवळील टोल नाक्याजवळ उभा करून चोरटे पसार झाले. यानंतर जखमी झालेल्या दोघांनी ही माहिती दूररध्वनीवरून संबंधितांसह पोलिसांना कळवली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले. नंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर जालन्याचे स्थानिक गुन्हे शाखा, विशेष कृती दल, मौजपुरी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
लांबचा पल्ला, दोन चालक: सायंकाळी ८ वाजेपर्यंत आडस गावात ट्रकमध्ये कापूस भरून दिला होता. यानंतर केजला ट्रकमध्ये डिझेल भरून हे वाहन गुजरातकडे रवाना केले. लांबचा प्रवास असल्यामुळे दोन चालक वाहनात बसवून दिले होते, असे शेतकरी विठ्ठल माने यांनी सांगितले.


गुजरातेत कापूस वाहतुकीचा दिला ठेका
शिवाजी शेंडगे, विठ्ठल माने या दोन शेतकऱ्यांचा हा कापूस होता. ट्रकमालकास ५७ रुपये प्रतिक्विंटल अशा दराने हा कापूस गुजरात येथे विक्रीसाठी पाठवण्यासाठी ठेका दिला होता. सुमारे दहा लाखापर्यंत या कापसाची किंमत होती, असे शेतकऱ्यांनी सांगितले.


गुन्हा धारुरमध्ये दाखल
धारुरच्या घाटात बंदुकीच्या धाकावर चालकांना मारहाण करून कापूस लुटल्याची माहिती आहे. या प्रकरणी धारुरच्या पोलिसांनी जबाब घेतला आहे. गुन्हाही तिकडेच नोंद करण्यात येईल. -निमीष मेहत्रे, सपोनि, मौजपुरी.Two passengers sat in truck and robbed two ton cotton

Post a Comment

 
Top