0
लातूर, 3 डिसेंबर : मुलीची छेड काढणाऱ्या 17 वर्षांच्या मुलाची नातेवाईकांनी हत्या केल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. सागर बालाजी मोमले असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. लातूरच्या रेणापूर तालुक्यातील तळणी इथं हा सर्व प्रकार घडला आहे. 
सागर मोमले हा तरूण शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलीची छेड काढत होता, असा आरोप संबंधित मुलीच्या नातेवाईकांचा होता. त्यानंतर या नातेवाईकांनी गावातील शाळेजवळ सागर मोमले याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सागरचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, सागर मोमले हा आमच्या मुलीची छेड काढत आहे, अशी तक्रार नातेवाईकांनी चाकूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी नोंदवली होती. पण तक्रार नोंदवल्यानंतर पीडित मुलीचे नातेवाईक शांत बसले नाहीत. 
पीडित मुलीच्या नातेवाईकांनी रात्री 8 च्या दरम्यान गावातीलच 'विद्या विकास' या शाळेजवळ सागर आला असता पीडित मुलीचे वडील, भाऊ, चुलते व इतर पाच जणांनी सागरला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सागरचा जागीच मृत्यू झाला आहे.
सागर मोमले या तरूणाने याआधीही अनेक तरूणींची छेड काढली आहे, असा आरोप मुलीच्या नातेवाईकांचा आहे. त्यावरूनच सागरवर 354 अन्वये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र मुलीच्या नातेवाईकांनी कायदा हातात घेत सागराच खून केला. त्यामुळे आता मुलीच्या नातेवाईकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

Post a Comment

 
Top