0
भुर्दंड १ जानेवारीपासून केबल पॅकेज आणि दर बदलणार, नियमित चॅनल्ससाठी ग्राहकांना दरमहा मोजावे लागणार ३५० ते ६०० रुपये

नाशिक- टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) लागू केलेल्या केबलच्या नव्या नियमानुसार आता नाशिक जिल्ह्यात केबल आणि डिशचे दर दरमहा तब्बल १५० ते ३०० रुपयांनी महागणार आहे. म्हणजे दरमहा नियमित चॅनल्ससाठी ३५० ते ६०० रुपये मोजावे लागतील. २९ डिसेंबरपासून सध्या सुरू असलेले चॅनल्सचे पॅकेज बंद होत नव्या नियमांच्या आधारे नवे पॅकेज सुरू होतील. यात शहर-ग्रामीण असा कुठलाही फरक न ठेवता सर्वांना सरसकट हे दर लागू करण्यात आले असून त्याला सर्वोच्च न्यायालयानेही मंजुरी दिल्याने या वाढलेल्या दरांचा बोजा ग्राहकांच्या माथी पडणार आहे.

नव्या वर्षात केबल, डिश, आयपी टीव्ही आणि हिट्स या सेवा क्षेत्रात मोठा बदल केंद्र शासनाने केला असून या बदलात टीव्ही चॅनल्सचे दर वाढवत त्याचा संपूर्ण बोजा हा ग्राहकांवर टाकला आहे. २९ डिसेंबरनंतर सध्याचे सुरू असलेले पॅकेज बंद होत असून नवीन पॅकेजनुसार ग्राहकांना १३० रुपयांचे बेसिक फ्री चॅनेल्सचे पॅकेज घेणे बंधनकारक आहे. तर पे चॅनल्ससाठी चॅनल्सच्या दरानुसार पैसे भरावे लागतील.

बेसिक पॅकमध्ये १०० चॅनल्स असून त्यात २६ चॅनल हे दूरदर्शनचे आहेत. त्यामुळे यातील बहुतांशी चॅनल्सला ग्राहकांकडून पसंतीच नसते. त्यामुळे पे चॅनल्सला ग्राहकांची पसंती असते. पण, एकच पे चॅनल घेण्यासाठीही ग्राहकांना बेसिक पॅक घेणे बंधनकारक आहे. म्हणजे १३० रुपये आणि पुढील जो पे चॅनेल ग्राहकास पसंत असेल त्याचा दर त्याला द्यावा लागेल. उदा. ग्राहकाला झी टीव्ही हे चॅनल घ्यावयाचे असेल तर त्याचे १९ रुपये स्वतंत्र आणि बेसिक पॅक १३० रुपये असे एकूण १४९ रुपये द्यावे लागतील. अशाप्रकारे जाे जितके पे चॅनल घेईल, त्यानुसार त्याला प्रत्येक चॅनलचे दर द्यावे लागतील. त्यासाठी शहर-ग्रामीण कुठलाही भेद ठेवलेला नाही. कॉलेजरोड येथे राहाणाऱ्या ग्राहकाला जितकी किंमत माेजावी लागेल तीच किंमत सुरगाणा या आदिवासी भागातील ग्राहकाला मोजावी लागणार असल्याने यात ग्राहकांना माेठा भुर्दंड बसणार आहे. शिवाय हे दर केबल असो कि डिश टीव्ही अशा सर्वांना समान ठेवले आहेत असे ट्रायने स्पष्ट केले आहे.

१९ रुपयांपेक्षा जास्त दर आकारल्यास गुन्हा

ट्रायने नव्या नियमानुसार प्रत्येक चॅनलची एमआरपी अर्थात उच्चतम किंमत निश्चित केली आहे. १९ रुपयांपेक्षा अधिक किंमत कुठल्याही चॅनलसाठी आकारण्यात आलेली नाही. त्यामुळे ब्रॉडकाॅस्टर्सने तसे केल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.

चॅनल्सच्या बुकेतून घातला जाऊ शकतो गोंधळ
प्रत्येक चॅनल्स कंपनीने आपापले बुके अर्थात चॅनल्स पॅकेज तयार केले आहेत. त्यानुसारही अनेकदा पसंतीचे चॅनल्स भिन्न दोन पॅकेजमध्ये समाविष्ट केल्याने ग्राहकांना हे दोन्ही पॅकेज घ्यावे लागू शकतात. त्यातून त्यांना वाढीव दर द्यावे लागण्याची शक्यताही अधिक आहे.

या चार चॅनल्सना दिली जाते पसंती
सध्या देशात फ्री चॅनल्सव्यतिरिक्त नागरिकांकडून नियमितपणे झी, कलर्स, स्टार आणि सोनी या ग्रुपच्या चॅनल्सला मागणी आहे. प्रत्येक ग्रुपचे चार ते पाच चॅनल्स हे नियमित बघितले जातात. म्हणजे १६ ते २० चॅनल्स कुठल्याही स्थितीत पाहिले जातात. त्यानुसारही सरासरी ३०० ते ४०० रुपये वाढणार आहेत.

असे वाढतील दर
सरासरी ग्राहकांचा कल पाहिल्यास प्रत्येक कुटुंबात १५ ते २० पे चॅनल नियमित बघितले जातात. शिवाय लहान मुलांसाठी कार्टून चॅनलही असतेच. त्याचेही दर वाढणार आहेत. म्हणजे एका चॅनलसाठी १७ किंवा १९ रुपये दराची आकारणी पाहता या पे चॅनलसाठी त्याला स्वतंत्र ३०० ते ४०० रुपये भरावे लागतील. त्यात १३० रुपयांचे बंधनकारक असलेल्या बेसिक पॅकचा दर लावल्यानंतर केबल किंवा डिश टीव्हींसाठी प्रतिमहा ४०० ते ६०० रुपये मोजावे लागतील. जीएसटी ग्राहकांकडून वसूल केला जाणार नसल्याचे स्पष्ट असले तरीही तो ग्राहकांकडून वसूल होण्याची शक्यता अधिक असल्याने त्याचीही १८ टक्के वाढ ग्राहकांनाच सोसावी लागेल.
Cable-dish prices in Nashik will be increased by Rs 150 to Rs 300

Post a comment

 
Top