0
निवासस्थानांतील अस्वच्छतेमुळे डास वाढल्यानेच मुलीचा मृत्यू ओढवल्याचा आरोप

औरंगाबाद- शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या निवासस्थानांतील कर्मचारी साईनाथ कीर्तीकर यांच्या १४ वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे शुक्रवारी (१४ डिसेंबर) मृत्यू झाला. निवासस्थानांतील अस्वच्छतेमुळे डास वाढल्यानेच मुलीचा मृत्यू ओढवल्याचा आरोप संतप्त कर्मचाऱ्यांनी केला आहे.

घाटीच्या कर्मचारी निवासस्थानांतील बी २ इमारतीतील ८ क्रमांकाच्या निवासस्थानात राहणारे साईनाथ यांची मुलगी शीतल कीर्तीकर हिला गुरुवारी घाटीच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. साईनाथ घाटीच्या बाह्यरुग्ण विभागात अस्थिव्यंगोपचार विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या तीन मुलींपैकी शीतल मधली मुलगी होती. ती बेगमपुऱ्यातील ज्ञानेश्वर विद्यालयात शिकत होती. तिच्यावर बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


स्वच्छ पाण्यावर होतात डेंग्यूचे डास :

दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे डेंग्यू होऊन मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला असला तरी प्रत्यक्षात डेंग्यूचे डास हे स्वच्छ आणि न झाकलेल्या पाण्यात वाढतात. पण, घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. यू. झिने यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच कर्मचारी निवासस्थानाच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

स्वर्गरथ नेण्यासाठी तोडले खांब :
घाटीचे मागचे गेट बंद करण्यात आले आहे. शीतलच्या अंत्यसंस्काराचा स्वर्गरथ त्याच गेटमधून न्यावा, अशी मागणी करत नातेवाइकांनी मागचे खांब जेसीबीने तोडायला लावले. स्वर्गरथ रवाना झाला.

भावनिक वातावरणाचा घेतला फायदा :
निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे बेगमपुऱ्याकडून घाटीत जाणारा रस्ता खांब टाकून गेल्या महिन्यात बंद करण्यात आला होता. यास अनेक कर्मचाऱ्यांचा विरोध होता. मात्र, डेंग्यूमुळे मुलीचा मृत्यू होताच प्रशासनावर खापर फोडत, कर्मचाऱ्यांनी स्वर्गरथ येथूनच जाईल, असा पवित्रा घेत हे खांब काढून टाकले. यामुळे नवी समस्या उभी राहिली आहे.


अन्य दोन रहिवाशांना झाली लागण, उपचार सुरू
याच इमारतीत राहणाऱ्या २० वर्षीय विजय सुरडकर या तरुणालाही डेंग्यूची लागण झाली होती. मात्र, तो पूर्णपणे बरा झाला आहे. सुधाकर दांडगे यांची मुलगी जयश्री हिलादेखील गेल्या आठवड्यात डेंग्यू झाला होता. याच इमारतीत राहणाऱ्या फरिया शेख रिझवी आणि शेख नसरीनही यांच्यावरही डेंग्यूच्या लक्षणांसाठी उपचार सुरू आहेत.14-year-old girl's death due to dengue

Post a comment

 
Top