यंदाच्या या स्पर्धेत अव्वल मल्लांमध्ये किताबासाठी चुरस रंगण्याचे चित्र आहे.
जालना- राज्यातील प्रतिष्ठेच्या ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला क्रीडा प्रतिनिधी आज बुधवारपासून जालन्यात सुरुवात हाेत आहे. या स्पर्धेत डबल महाराष्ट्र केसरी हाेण्यासाठी पुण्याचा गत चॅम्पियन अभिजित कटके सज्ज झाला आहे. मात्र, त्याच्या शर्यतीमध्ये राज्यातील अव्वल दहा कुस्तीपटूंनी कंबर कसली आहे. त्यामुळे यंदाच्या या स्पर्धेत अव्वल मल्लांमध्ये किताबासाठी चुरस रंगण्याचे चित्र आहे. यासाठी बीडच्या अक्षय शिंदेसह पुण्याचा शिवराज राक्षे, साेलापूरचा गणेश जगताप सज्ज झाले आहेत.
ही स्पर्धा १९ ते २३ डिसेंबरदरम्यान जालन्यात आयाेजित करण्यात आली. आज काही गटातील वजने हाेती. या स्पर्धेत ८८० प्रतिभावंत कुस्तीपटूंनी आपला सहभाग नाेंदवला आहे. हे सर्व खेळाडू १० विविध वजन गटात आपले काैशल्य पणास लावणार आहेत. यासाठी खास चार मैदानेही तयार करण्यात आली. याचे उद्या गुरुवारी उदघाटन हाेईल व कुस्ती सामने रंगतील.
लाखाेंच्या बक्षिसांचा वर्षाव
यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या मल्लांवर लाखाेंच्या बक्षिसांचा वर्षाव हाेणार आहे. यात किताब विजेत्या कुस्तीपटूला दाेन लाख आणि चांदीची गदा (अडीच किलाे) देऊन गाैरवण्यात येईल. तसेच याच गटातील उपविजेता मल्ल हा एक लाखाच्या बक्षिसाचा मानकरी ठरेल. तसेच १० वजन गटांतील विजेत्यांनाही राेख बक्षीस देऊन यादरम्यान गाैरवण्यात येणार आहे
किताबासाठी १० प्रतिभावंतांचा दावा; शिवराज राक्षे, गणेश झाले सज्ज
यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकण्यासाठी राज्यातील ८८ मल्ल आपले कसब पणाला लावणार आहेत. यातील १० अव्वल कुस्तीपटू हे किताबासाठी आपला दावा ठाेकून आहेत. यामध्ये गत महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेसह पुणे जिल्ह्याच्या शिवराज राक्षे, साेलापूरच्या गणेश जगताप, माउली जमदाडे, मुंबईच्या समाधान पाटील, बीडच्या अक्षय शिंदे, काेल्हापूरच्या काैतुक ढापळे, बाला रफिक शेख, पुण्याच्या साईनाथ, तानाजी झुंझुर्डे,सांगलीच्या विजय गुराळ, समीर देसाई, नगरच्या विष्णू खाेसे आणि याेगेश पवारचा समावेश आहे. तसेच यजमान जालन्याच्या विलास डाेईफाेडेवर सर्वांची नजर असेल.
१६ वर्षांनंतर यजमानपद, विलासवर मदार
जालन्याला तब्बल १६ वर्षांनंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या यजमानपदाचा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे भव्य स्वरूपात स्पर्धा आयाेजन करण्यात आले. यापूर्वी २००२ मध्ये ही स्पर्धा झाली हाेती. दरम्यान, यजमान जालना जिल्ह्याची किताबाची मदार ही अव्वल मल्ल विलास डाेईफाेडेवर आहे. ताे आपल्या घरच्या मैदानावरील या स्पर्धेत केसरीच्या गटात आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
रिप्लेसाठी खास एलईडी :
कुस्ती स्पर्धेतील राेमांचक लढतीमध्ये क्षणाक्षणाला कलाटणी बसणाऱ्या घटना घडतात. त्यामुळे पंचांनाही पारदर्शक निर्णय देताना अडचणी निर्माण हाेतात. अशाच किचकट परिस्थितीवर मात करण्यासाठी आता त्या लढतीची रिप्ले पाहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्या त्या लढतीचा रिप्ले हा खास माेठ्या स्क्रीनच्या एलईडीवर पाहता येईल. यातून निकालातील पारदर्शकता जपण्याचे कार्यही हाेईल. त्यामुळे हा अत्याधुनिक तंत्र प्रणालीचा वापर निश्चितच राज्यातील कुस्तीसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे.
पंचांसाठी खास शिबिर :
स्पर्धेतील प्रत्येक कुस्तीचा निकाल पारदर्शक आणि नि:पक्षपणे देण्यात यावा, यावर कुस्तीगीर परिषदेचा भर असताे. यासाठी यंदा स्पर्धेच्या दाेन दिवसांपूर्वीच सहभागी पंचांच्या प्रशिक्षण शिबिराचे खास आयाेजन करण्यात आले हाेते. तांत्रिक चिटणीस दिनेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली याचे आयाेजन झाले. दरवर्षी या शिबिराचे आयाेजन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी केले जाते. मात्र, आता याच बदल करण्यात आला. यादरम्यान गुंड यांनी सहभागी पंचांना चित्रफितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
डिजिटल स्काेअर बाेर्ड :
यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामन्याचा निकाल हा उपस्थित चाहत्यांनाही पाहता येणार आहे. यासाठी खास डिजिटल स्काेअर बाेर्ड लावण्यात येणार अाहे. गत काही वर्षांपासून याचा वापर वाढला.

Post a Comment