26/11च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्ष होतायत. आजही नुसत्या आठवणींनी मनात भीती दाटून येते. पण तो भयावह क्षण अनुभवणारे अनेक जण आहेत. अभिनेत्री सोनाली खरे त्या दिवशी ताज रेस्टाॅरन्टमध्ये नवऱ्यासोबत होती. तिचा अनुभव वाचा तिच्याच शब्दात मुंबई, 24 नोव्हेंबर : 26/11ला 10 वर्ष होतायत. योगायोग असा की आताच काही दिवसांपूर्वी मी ताजमध्ये गेले होते. तेव्हा ताजमध्ये शिरताना फटाक्यांचा आवाज ऐकला आणि मनात आलं आत जाऊ की नको? म्हणजे आजही मनात ती भीती आहेच.त्यावेळी ताजमध्ये एक मागचा दरवाजा होता. नंतरच्या काळात तो बरीच वर्ष बंद होता. पण आता दोन दिवसांपूर्वी लग्नासाठी आत जाताना तो उघडा छोटा एन्टरन्स पाहिला. आणि मनात धास्ती वाटली. मला नाही वाटत, ती जाईल आता. मलाच नाही, तर माझ्या नवऱ्यालाही त्याक्षणी भीती वाटली. जे जे लोक त्या प्रसंगातून गेलेत, त्यांच्या मनात अजून ती भीती आहे.
त्यावेळी रात्रभर आम्ही ताजच्या रेस्टाॅरंटमध्ये अडकलो होतो. माझी 4 महिन्यांची मुलगी घरीच होती. ती एकटी होती. तीही आमच्या कामवालीसोबत होती. मी आईला फोन करत होते. सासूला फोन करत होते. आता बोलणं सोपं वाटतंय. पण ते आठवून आजही थरकाप उडतो.
आम्ही ताजच्या त्या रेस्टाॅरंटमध्ये बसलो होतो. दहा मिनिटं झाली आणि अचानक आवाज यायला लागले. लोक धावत जाताना दिसले. बरेचसे लोक आमच्याही रेस्टाॅरन्टमध्ये आले. ताजच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब रेस्टाॅरंटचे मोठे दरवाजे बंद केले. त्याला खूप ताकद लागत होती.
आम्हाला आधी वाटलं गँग असेल, त्यांचा गोळीबार सुरू असेल. पण आत आलेल्या लोकांनी सांगितलं की बरीच माणसं सुसाट गोळीबार करत सुटलेत. रेस्टाॅरंटमध्ये एक परदेशी व्यक्ती होता. त्याच्याकडे लॅपटाॅप होता. तेव्हा कळलं की हे काही गँगवाॅर वगैरे नाही. काही तरी भयंकर घडतेय. त्यावेळी आम्ही तिथे 35-40 जण होतो.
आम्ही एन्टरन्सजवळ होतो. एकदा वाटलं तिथून ताबडतोब बाहेर पडावं. पण बाहेर कोण कुठे असेल कळत नव्हतं. कारण आवाज येतच होते. त्या रेस्टाॅरन्टला लागून बार होता. त्या बारला जायचा दरवाजा बंद होता. एकदा वाटलं, तो दरवाजा उघडून बारमध्ये जाऊ आणि तिथून बाहेर पडू. पण अशा वेळी ताजमधल्या कर्मचाऱ्यांची माणुसकी दिसून आली. कारण माझा नवरा म्हणाला, मी दरवाज्याजवळ जातो, ओके असेल तर ग्रीन सिग्नल देतो. पण स्टाफ कोणालाच ही जोखीम घेऊ देत नव्हता. तिथे एक बुटकीशी मॅनेजर मुलगी होती. ती म्हणाली, जायचं असेल तर मी अगोदर पुढे जाईन.
माझ्या नवऱ्याचं म्हणणं होतं, इथेच बसून वाट बघत बसायचं आणि काही तरी होण्यापेक्षा आपण पुढे जाऊ. एक माणूसही आला. तो म्हणाला तुम्ही चेंबरमध्ये चला. पण का कोण जाणे, माझं एक इन्स्टिंग होतं. इथेच थांबावं. नवऱ्यानंही ऐकलं. आम्ही तिथंच थांबलो. तेव्हा घरून फोन येतंच होते. पण संजय जाधव, अंकुश चौधरी यांचेही फोन येत होते. तू कशी आहेस? विचारत होते. त्यातून खूप आधार वाटत होता.
फोनाफोनी तर सुरूच होती. माझ्या नवऱ्याची पोलिसांत ओळख होती. त्यांनी फोन करून आम्ही 40 जण अडकलोय हे सांगितलं. त्यानंतर ते आले, नाॅक केलं, दरवाजे उघडले, आम्ही पहिल्यांदा बाहेर पडलो.
त्या वेळी मी लाॅबीची परिस्थिती विसरूच शकत नाही. अगोदर समोर आला तो दरवाजाजवळचा सुरक्षा रक्षक. त्याची भेदक नजर मी विसरू शकत नाही. त्यांच्यामुळेच आम्ही जिवंत होतो. आज दुसरं आयुष्य आम्ही पाहतोय.
माझ्या 4 महिन्याच्या मुलीला ठेवून मी तासाभरासाठी बाहेर पडले होते. तिला त्यावेळी अंगावरचं दूध सुरू होतं. आम्हाला रात्रभर बाहेर राहावं लागलं. घरी जिवंत परतू की नाही या भीतीत. पण देवाची कृपा पहा ती रात्रभर उठलीच नाही. नाही तर तिनं रडून गोंधळ घातला असता.
परवाच आम्ही ताजमध्ये गेलो होतो, तेव्हा तीही बरोबर होती. फटाक्याच्या आवाजानं मी घाबरले तेव्हा तिनंच विचारलं काय झालं म्हणून. मग मी तिला म्हटलं की त्यावेळी आम्ही आत होतो, आठवतंय ना मी तुला सांगितलं होतं. तेव्हा ती म्हणाली, हो फारच भयंकर. पण अजून तेवढं गांभीर्य कळण्याएवढी ती मोठी नाहीय.
त्या घटनेनंतर ताजमध्ये जायची भीती वाटायची. पण ती भीती घालवण्यासाठी आम्ही मुद्दाम पुन्हा गेलो. तिथल्या कर्मचाऱ्यांना भेटलो. आजही भेटतो. त्या घटनेनं कर्मचारी आणि आमच्यात एक इमोशनल बाँड तयार झालाय, तो कायमचाच.
Post a Comment