0
 • Kasab is a symbol of our weakness against terrorism;meera borvankar
  २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई हल्ल्याला १० वर्षे पूर्ण झाली. या घटनेनंतर इतका मोठा हल्ला तर झाला नाही, पण २६-११ च्या कटू आठवणी प्रत्येकाच्या मनात आहेत. हल्ल्यात १६० पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले. १५ पोलिस कर्मचारी-अधिकारी आणि २ एनएसजी कमांडो शहीद झाले. यात मुंबई एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एसीपी अशोक कामटे आणि एन्काउंंटर स्पेशालिस्ट विजय साळस्कर यांचा समावेश होता. हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला फाशीवर चढवताना तेथे आयपीएस मीरा चढ्ढा-बोरवणकर हजर होत्या आणि तिन्ही शूर शहीद अधिकारी मीरा यांचे सहकारी होते. हल्ल्याला १० वर्षे झाली. या पार्श्वभूमीवर साहस आणि हौतात्म्याची कथा मीरा यांच्या लेखणीतून...
  त्या दिवशी मी दिल्लीत होते. भाचीच्या लग्न सोहळ्यात थकल्यानंतर गाढ झोपेत असताना भावाने उठवले व तुम्ही हेमंत करकरे यांना ओळखता का? असा प्रश्न विचारला. मी हो म्हणताच हेमंत यांनी जगाचा निरोप घेतल्याचे भावाने सांगितले. यावर माझा विश्वासच बसत नव्हता. एक दिवस आधी सायंकाळी मुंबईच्या कुलाब्यात २ गटांमध्ये हाणामारीची बातमी मिळाली होती आणि लगेच हेमंत यांच्याबद्दल कळले. मी सुटी रद्द करून पुण्याच्या सीआयडी मुख्यालयात पोहोचले. तोपर्यंत हेमंत यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले नव्हते.

  हेमंत यांना मी २० वर्षांपासून ओळखत होते. ते पूर्वी काॅर्पोरेट क्षेत्रात नोकरी करायचे. नंतर लोकांच्या सेवेसाठी पोलिस विभागात दाखल झाले. लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मदत करण्यासह हेमंत यांचे संवाद कौशल्य गजबचे होते. मी मुंबई गुन्हे शाखेची सहआयुक्त असताना एके दिवशी ते माझ्या चेंबरमध्ये आले व एटीएसचे नेतृत्व करण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांना रिपोर्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  एका फाशीची प्रक्रिया टीमला पिळवटून टाकते 
  लोक मला विचारतात, कसाबला फाशी देताना तुमच्या मनात काय विचार होते? लोकांना वाटते, त्या वेळी मला खूप मोठेपणा वाटत असेल. असे काही नव्हते. एखाद्याला फासावर लटकावणे ही अत्यंत क्लिष्ट कायदेशीर प्रक्रिया असते. ही प्रक्रिया तुम्हाला, तुमच्या टीमला पिळवटून टाकते.
  एका मोठ्या कामासाठी परदेशात तैनात असताना ते एटीएसमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे ऐकून मी अचंभित झाले. पण त्यांना नेमके काय करायचे आहे ते त्यांच्या लक्षात आले होते. अशोक कामटेही असेच अधिकारी होते. मी चार्ज घेण्यापूर्वी अशोक हे साताऱ्यातील पोलिस प्रमुख होते. ते एक तरुण, तडफदार अधिकारी असल्याचे मी ऐकून होते. अवैध दारू आणि जुगाराविरोधात ते कडक कारवाईत ते करायचे. सोलापूरमध्ये तर त्यांची एका हिरोप्रमाणे प्रतिमा होती. चुकीचे काम केल्यास मोठ्यातल्या मोठ्या नेत्यांनाही ते सोडायचे नाही. एकदा तर अशोक यांनी मला पोलिस अधीक्षक म्हणून जेवणासाठी आमंत्रण दिले. जवळपास एका तासपर्यंत ते मला त्यांच्या जवळील खासगी हत्यारांचे कलेक्शन दाखवत होते. एका ध्येयाने ते झपाटलेले अधिकारी होते.

  विजय साळस्कर यांच्या सोबत तर मी ३ वर्षे मुंबई गुन्हे शाखेत काम केले. ते नेहमी दोन कारणांमुळे प्रसिद्ध होते. एकतर उत्तर पेहराव आणि दुसरे म्हणजे सर्वांशी प्रेमाने बोलणे. ते मुंबईतील सर्वात तडफदार अधिकारी आहेत, हे त्यांच्याकडे पाहून कळत नव्हते. विजय यांच्या माहितीचा स्रोत कमालीचा होता. त्यासाठी ते खूप संवेदनशीलही होते. विजय आणि त्यांच्या टीममध्ये कमालिची बाँडींग आणि एकमेकांबद्दल आदर होता.

  मुंबई हल्ल्यात आपण तिघांना गमावून बसलो. आमचे पोलिस कर्मचारी तर प्रचंड रागात होते. ते कसाबला मारून टाकू इच्छित होते. पण कसाब मार्फत पाकिस्तानचे अनेक कट समोर येणार होते, त्यामुळे सर्वांनी समजूतदारपणा दाखवला. माझ्यासाठी कसाब हा दहशतवादविरोधी आपल्या कमकुवत तयारीचा प्रतिक होता. असो, पण त्याच्या कर्माची फळे त्याने भोगली. जय हिंद...


Post a Comment

 
Top