0
चिकोडी उपविभागातील तब्बल 19 ठिकाणी चोरी केलेल्या आंतरजिल्हा चोरटय़ांच्या टोळीला जेरबंद करण्यात चिकोडी पोलिसांना ऐन दिवाळी सणात यश आले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 17 लाख 21 हजार 762 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संजू रावसाहेब शिरगावे (वय 21 रा. चिंचणी, ता. चिकोडी), अनिल कल्लाप्पा बोरगावे (वय 22 रा. शमनेवाडी, ता. चिकोडी), रफिक हुसेनसाब संगोळी (वय 32 रा. अम्मीनभावी, ता. धारवाड), मुस्ताक हुसेनसाब संगोळी (वय 28 रा. अम्मीनभावी, ता. धारवाड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिकोडी उपविभागात जवळपास 19 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्याचा तपास सुरू होता. या विविध ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी गुप्तता पाळून खबऱयांमार्फत चोरटय़ांवर नजर ठेवण्यात आली होती. विविध माहितीच्या आधारे संजू, अनिल, रफिक, मुस्ताक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता विविध ठिकाणी झालेल्या चोरींमध्ये त्यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसी खाक्या दाखविल्यावर कबुली
पण त्यांच्याकडून कोणतीच माहिती उघड होत नसल्याने अखेर पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांच्याकडून चोरीची कबुली देण्यात आली. 300 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2 लाख 97 हजार 800 रुपयांची रोकड, 45 घरगुती गॅस सिलिंडर, कॅमेरे, इनव्हर्टर बॅटरीज, स्पिकर सेट, मोबाईल्स यासह चोरीसाठी वापरण्यात आलेली कार व चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व मुद्देमालाची रक्कम 17 लाख 21 हजार 762 रुपये होते.
मध्यान्ह आहारातील सिलींडरची चोरी
अटक करण्यात आलेल्या चौघांनी 19 ठिकाणच्या चोऱयांमध्ये आपलाच हात असल्याचे सांगून चिकोडी तालुक्यातील बेळकूड येथील सिद्धेश्वर अर्बन सोसायटीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम, नागरमुन्नोळी, बंबलवाड, बेळकूड, उमराणी, हिरेकुडी, चिंचणी, जैनापूर, कब्बूर, नवलिहाळ, पट्टणकुडी व कुप्पानवाडी गावातील शाळांच्या मध्यान्ह आहाराच्या खोलीतील स्वयंपाक गॅस सिलिंडर, कडधान्य, दुचाकी व बॅटरीज चोरल्याचे सांगितले.
सदर कारवाई बेळगाव जिल्हा पोलीसप्रमुख सुधीरकुमार रेड्डी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रवींद गडादी यांच्या मार्गदर्शनाखाली एएसपी मिथुनकुमार यांच्या नेतृत्वाखाली सीपीआय मल्लनगौडा नायकर, सदलग्याचे पोलीस उपनिरीक्षक संगमेश दिडगीनहाळ, उपनिरीक्षक संगमेश होसमनी, एएसआय डी. बी. कोतवाल, आर. एस. मुडलगी, बी. बी. जिरली, आर. एस. पुजेरी, एस. ए. जमकोळी, एस. एच. इरगार, एस. एस. आरभावी, एस. व्ही. कित्तूर, जी. एस. कांबळे, बी. एन. माळेद, एम. एम. करगुप्पी, पी. बी. गायकवाड, के. ए. वाळके यांच्यासह कर्मचाऱयांनी केली.

Post a Comment

 
Top