- हिंगोली- सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे रोटी व्यवहार जमतो, परंतु बेटी व्यवहार जमत नाही, यामुळे प्रेम जडलेल्या मुलीची तिच्या घरच्यांनी लग्न करण्यास विरोध केल्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने भावी सासऱ्याचा गुप्ती आणि लाठ्या काठ्याचे वार करून निर्घृण खून केला. याबाबत सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथील कैलास माणिक शिंदे असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास शिंदे यांच्या मुलीसोबत गावातीलच सचिन नारायण सुरनर याचे प्रेम जडले होते. सचिन याने सदर मुलीशी लग्न करण्यासाठी त्याच्या घरच्यांना तयार केले. परंतु तरुण आणि तरुणी दोघेही एकाच जातीचे असले तरी या जातीत बेटी व्यवहार जमत नसल्यामुळे सदर मुलीच्या घरच्या लोकांनी बेटी व्यवहार जमत नाही आणि मुलगा चांगल्या स्वभावाचा नसल्याच्या कारणावरून त्याच्यासोबत सदर मुलीचे लग्न न लावण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या घरच्या लोकांनी लग्नासाठी विरोध केल्यामुळे संतप्त झालेल्या सचिन सुरनर याने ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गावातील मंदिराजवळ सदर मुलीचे वडील कैलास माणिक शिंदे यांच्यावर हल्ला केला. या वेळी त्याच्यासोबत त्याचा भाऊ किरण नारायण सुरनर, नितीन विश्वनाथ कवडे, विश्वनाथ नामदेव कवडे आणि गणेश नामदेव कवडे हे होते.
या सर्वांनी कैलास शिंदे यांच्यावर गुप्ती आणि लाठ्या काठ्यांनी हल्ला चढविला. या वेळी कैलास शिंदे यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांचा चुलत भाऊ भुजंगराव शिंदे यांना सुद्धा आरोपींनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबत सेनगाव पोलिस ठाण्यात मृताचा मुलगा अमोल कैलास शिंदे याने दिलेल्या फिर्यादीवरून पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर प्रकरणाचा तपास सेनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बी. आर. जाधव हे तपास करीत आहेत. सदर घटना दिवाळीत घडल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. सदर प्रकरणात आरोपींना पोलिसांनी अटक केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment