0
सातारा : 
अवकाळी पावसाने रायगाव फाटा येथील सेवा रस्त्यावर भयावह परिस्थिती निर्माण झाली. याला महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार व रिलायन्स कंपनी जबाबदार आहे. महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स कंपनीला हा शेवटचा अल्टिमेटम आहे. तातडीने आनेवाडी टोलनाका आणि सातारा तालुक्याच्या हद्दीतील महामार्गावरील खड्डे भरावेत, सेवा रस्त्यांची दुरुस्ती करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.पत्रकात म्हटले आहे की,  सहापदरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याने महामार्गाची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दुसरीकडे महामार्गालत तयार करण्यात आलेल्या सेवा रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मोठमोठे खड्डे, अरुंद आणि खचलेल्या सेवा रस्त्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे रायगाव फाटा येथे पुलाखाली पाणी साचल्याने सेवा रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

रायगाव फाटा येथे सेवा रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आणि लोकांना अतोनात हाल सहन करावे लागले. याचपध्दतीने लिंबखिंड येथून सातार्‍याकडे जाणार्‍या सेवा रस्त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे. पुलापासून ते विठ्ठल मंगलम कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. सेवारस्त्यावरील पथदिवे म्हणजे शोपीस बनले आहेत. वारंवार पत्रव्यवहार करूनही रिलायन्सने याची दखल घेतलेली नाही. कंपनीला आता शेवटचा अल्टीमेटम असेल. तातडीने सेवारस्त्यांची दुरुस्ती करा अन्यथा आनेवाडी टोलनाका येथे टोलबंद आंदोलन केले जाईल. 

Post a Comment

 
Top