चंदिगड - पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे आयोजित करतारपूर साहिब कॉरिडॉरच्या कोनशिला समारंभाला पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे पाकिस्तानचे निमंत्रण नाकारले. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी त्याची सबब स्पष्ट केली.
ते म्हणाले, पंजाबमध्ये होणारे दहशतवादी हल्ले व पाकिस्तानच्या सैन्याच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद होत आहेत. ही गोष्ट मला या कार्यक्रमात सहभागी होण्याची नैतिक परवानगी देत नाही. दुसरीकडे कॅप्टन अमरिंदर सरकारमधील स्थानिक स्वराज्य संस्था मंत्री नवजोतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारले आहे. बुधवारी होऊ घातलेल्या या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिद्धू यांनी कुरेशी यांना पत्र पाठवून परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी मागितली आहे. या निर्णयामुळे लोकांची मने खुली होतील, असे सिद्धू यांनी सांगितले.
तत्पूर्वी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही नियोजित कार्यक्रमांचा हवाला देत निमंत्रण नाकारले. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर व हरदीप पुरी कार्यक्रमास हजेरी लावतील.
पाकिस्तानचा मीडिया म्हणाला- भारताने काश्मीरचे संबंधही सुधारले पाहिजेत
‘डॉन’ ने लिहिले- भारत व पाकिस्तानच्या संबंधात सकारात्मक बदल झाला आहे. भारत आपल्या क्षेत्रातील करतारपूर साहिब कॉरिडॉर तयार करण्यास तयार झाला आहे. रेडिआे पाकिस्तानने म्हटले की, पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारतातील नेत्यांना करतारपूर साहिब कॉरिडॉर काेनशिलेसाठी निमंत्रण पाठवले आहे. आता काश्मीर प्रश्नीही सुधारणा व्हावी.
भारतात उपराष्ट्रपती नायडूंच्या हस्ते आरंभ
भारतात पंजाबमधील गुरुदासपूरच्या डेरा बाबा नानकपासून पाकिस्तानच्या सीमेपर्यंत करतारपूर साहिब कॉरिडॉर तयार करणार आहे. देशाच्या क्षेत्रात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते कोनशिला पूजन होईल. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हजर राहतील.
बर्लिनची भिंत कोसळेल असे कुणास वाटलेही नसावे
बर्लिनची भिंत कोसळेल, असे कुणास वाटलेही नसावे. गुरु नानक देवजींच्या आशीर्वादाने कॉरिडॉर सर्वांना जोडेल.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सुरुवात करणे चांगले
कॉरिडॉर तयार करण्यात अनेक अडचणी आहेत. पण सुरुवात चांगली असते. यश मिळेल, अशी आशा आहे.
मनमोहनसिंग, माजी पंतप्रधान
Post a Comment