शहरातील मुख्य बाजारपेठेतील फुटपाथवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. येथील दुकानदार फुटपाथवर व्यवसाय करण्यासाठी फेरीवाल्यांकडून 800 ते 1000 रुपये दररोज हप्ता घेत आहे. व्यवसाय होवू दे अगर नाही होवू दे, फेरीवाल्यास दररोज दुकानादाराला हप्ता द्यावा लागत असल्याची चर्चा सुरु आहे. ज्याच्या दारात फेरीवाले त्या दुकानदाराची कमाई ठरलेली आहे. त्यामुळे अशा दुकानदारांकडून दारातील फेरीवाल्यावर कारवाई नको, रस्त्याच्या मध्यभागी बसणाऱयांवर कारवाई करा, अशी मागणी होत आहे. दुकानदारांचे ऐकून महापालिका प्रशासनाकडूनही याची अंमलबजावणी होते हे विशेष आहे.
कोल्हापूर शहरातील प्रत्येक चौकात, गल्लीबोळात अतिक्रमण वाढले आहे. एकही बाजारपेठ अशी नाही की तेथे फेरीवाल्यांचे अतिक्रमण झालेले नाही. महाद्वार रोड, ताराबाई रोड येथे फेरीवाल्यांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. नागरीकांना सुरक्षीत ये-जा करता यावी या उद्देशाने बांधण्यात आलेले फुटपाथही या फेरीवाल्यांन सोडलेले नाही. विशेष म्हणजे व्यापारी दुकानासमोरीला जागा फेरीवाल्यांना भाडय़ाने देत आहेत. ताराबाई रोड येथील महालक्ष्मी धर्मशाळा परिसरात दिवसा आठशे ते एक हजार हप्ता दुकानदार घेतल्याशिवाय फेरीवाल्यांना आपल्या दारात बसू देत नाही. गेल्या अनेक वर्षापासून हे चालत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाकडूनही फुटपाथवरील अतिक्रमणावर कारवाई करण्याकडे कानाडोळा होत आहे.

Post a Comment